टीम इंडियाचा स्टार सलामी फलंदाज शिखर धवनने आज (24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने आज सकाळी एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘गब्बर’ या नावाने प्रसिद्ध असलेला धवन बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. डिसेंबर 2022 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. शिखरने 2010 मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते.
वास्तविक, डावखुऱ्या फलंदाजाची कारकीर्द चमकदार राहीली आहे. त्याने 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तर बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 5 आश्चर्यकारक विक्रमांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी धवनच्या शानदार कारकिर्दीत भर घातली.
पदार्पणाच्या कसोटीत आश्चर्यकारक कामगिरी
धवन हा पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज आहे. मार्च 2013 मध्ये त्याने पहिली कसोटी खेळली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने अवघ्या 85 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हा एक जागतिक विक्रम आहे, जो आजही कायम आहे. त्याने कसोटीत एकूण 7 शतके झळकावली. तो शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये खेळला होता.
मिस्टर आयसीसी
‘गब्बर’ने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जोरदार धुमाकूळ घातला. त्याने 2013 आणि 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोल्डन बॅट जिंकली होती. धवन हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने अवघ्या 10 सामन्यांमध्ये 701 धावा केल्या, ज्यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. एकूण यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेल (791) अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर विराट कोहली (11 वे स्थान) आणि सचिन तेंडलूकर (20 वे स्थान) या यादीत खूप मागे आहेत. कोहलीने 13 सामन्यात 529 धावा केल्या तर सचिनने 16 सामन्यात 441 धावा केल्या.
100व्या एकदिवसीय सामन्यात शतक
100 व्या वनडे सामन्यात शतक झळकावणारा धवन एकमेव भारतीय आहे. त्याने फेब्रुवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये धवनने 105 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. मात्र, टीम इंडियाला या सामन्यात पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
90+धावांचा विक्रम
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 90 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत धवन दुसऱ्या स्थानावर आहे. असे त्याने सात वेळा केले. त्याच्या पुढे महान फलंदाज सचिन आहे. सचिनने केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभरात सर्वाधिक 90 प्लस इनिंग खेळल्या. त्याने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 वेळा ही कामगिरी केली.
पहिल्या कसोटीत सर्वोच्च गुण
धवनने पहिल्या कसोटीत 137 चेंडूत 187 धावा केल्या होत्या. मोहाली येथे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 33 चौकार आणि दोन षटकार मारले. पदार्पणाच्या कसोटीत भारतीयाने खेळलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. धवनचा विक्रम 11 वर्षे टिकून आहे. यशस्वी जैस्वाल पदार्पणाच्या कसोटीत धवनचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला होता पण 17 धावांनी ती हुकली. त्याने जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 387 चेंडूत 171 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि एक षटकार लगावला.
हेही वाचा-
शिखर धवन ‘मिस्टर आयसीसी’ म्हणून का प्रसिद्ध, या तीन स्पर्धा देतात प्रत्यक्षात साक्ष!
PAK vs BAN; पाकिस्तानची नाचक्की! 15 रुपयांना नाही विकले तिकीट, आता चक्क मोफत प्रवेश!
ब्रेकिंग बातमी! भारतीय संघाच्या ‘गब्बरची’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती