भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी20 मालिकेला 22 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. ज्यासाठी इंग्लंडने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. तर काल शनिवारी बीसीसीआयनेही भारतीय संघाची घोषणा केली. दोन्ही संघांकडे मजबूत फलंदाज आणि घातक गोलंदाज आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी ही मालिका रोमांचक असेल. दरम्यान, सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादववर असतील. ज्याच्याकडे 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर भारताच्या टी20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
गौतम गंभीरने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून मुख्य प्रशिक्षकपदाची सुरुवात केली. सूर्यकुमार यादवचा टी20 मध्ये कर्णधारपदाचा प्रवासही यापासूनच सुरू झाला. कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, सूर्यकुमारने आतापर्यंत एकूण 10 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाला फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. म्हणजे पूर्णवेळ कर्णधारपद मिळाल्यानंतर, सूर्यकुमारचा विजय-पराजय रेकॉर्ड 9-1 असा आहे. त्याआधीही सूर्यकुमार अनेक वेळा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. त्याने आतापर्यंत एकूण 17 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी संघाने 13 वेळा विजय मिळवला आहे. तर फक्त तीन वेळा संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
सूर्यकुमार यादवच्या वैयक्तिक कामगिरीवर नजर टाकली तर गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून त्याने 10 सामने खेळले आहेत. या 10 सामन्यांपैकी 9 डावांमध्ये त्याने 230 धावा केल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार हा एक आदर्श टी20 फलंदाज आहे. तो मैदानावर सर्वत्र फटके मारतो आणि सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतके (4) करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार इंग्लंडविरुद्ध त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील चौथी मालिका खेळणार आहे आणि तो निश्चितच टीम इंडियाला सलग चौथी टी20 मालिका जिंकण्यासाठी नेतृत्व करू इच्छितो.
टीम इंडियाचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी. बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल
हेही वाचा-
2024 च्या टी20 वर्ल्ड कपनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा कोणी केल्या? यादी आश्चर्यकरणारी!
मुंबई इंडियन्समध्ये निवड होताच आयसीसी स्पर्धेचं कर्णधारपद मिळालं, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किवी संघ जाहीर
IND vs ENG: गिल-पंतसह या 5 खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता, कारण गुलदस्त्यात!