---Advertisement---

किंग कोहली इज बॅक! आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट पुन्हा नंबर 1

On: बुधवार, जानेवारी 14, 2026 1:47 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील दुसरा वनडे सामना राजकोट येथे खेळला जात आहे. दरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 स्थान पटकावलं आहे. सातत्यपूर्ण धावा, मोठ्या सामन्यांतील प्रभावी खेळी आणि अनुभवाच्या जोरावर कोहलीने अव्वल क्रमांकावर पुनरागमन केलं आहे.

37 वर्षीय विराट कोहलीने आपल्या सहकारी रोहित शर्माला मागे टाकत हे अव्वल स्थान मिळवले आहे. ताज्या क्रमवारीनुसार कोहलीच्या खात्यात 12 गुणांची वाढ झाली असून तो 785 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माचे सहा गुण घसरले असून तो 781 वरून 775 गुणांसह खाली घसरला आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिचेलनेही मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठणाऱ्या मिचेलचे रेटिंग 784 असून तो कोहलीपेक्षा केवळ एका गुणाने मागे आहे.

विराट कोहलीने याआधी 2017 पासून सलग चार वर्षे वनडे फलंदाज क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्चस्व राखले होते. मात्र 2021 च्या सुरुवातीला पाकिस्तानचा बाबर आझम याने त्याला मागे टाकले. बाबरने पुढील चार वर्षे ही जागा आपल्याकडे कायम ठेवली होती. त्यानंतर 2025 मध्ये रोहित शर्माने पुन्हा एकदा भारताला अव्वल स्थानावर नेले होते.

आता कोहलीच्या दमदार पुनरागमनाने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वयाच्या 37 व्या वर्षीही सातत्य, फिटनेस आणि मानसिक ताकद यांच्या जोरावर सर्वोच्च स्थान मिळवणे ही कोहलीच्या महान कारकिर्दीची आणखी एक सुवर्णपान ठरते. वनडेंच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने पुन्हा एकदा ‘GOAT’ असल्याचे सिद्ध केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---