भारताने मंगळवारी (१६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवला. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात १६४ धावाच करता आल्या. या विजयानंतर, भारतीय कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार एमएस धोनीच्या एका विक्रमाची बरोबरी केली.
विराट झाला दिग्गजांच्या पंक्तीत सामील
या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला. मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीमध्ये विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर असलेल्या धोनीची बरोबरी केली आहे.
मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळविण्याची कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याच्या नावे आहे. त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने मायदेशात सर्वाधिक ३० विजय मिळवले आहेत. त्यापाठोपाठ, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याचा क्रमांक लागतो. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियामध्ये २९ कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला होता.
या यादीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ व भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी यांचा क्रमांक लागतो. या दोघांनीही आपापल्या नेतृत्वात मायदेशात अनुक्रमे २२ व २१ कसोटी सामने जिंकण्याची किमया करून दाखविली होती. आता विराटनेही मायदेशात २१ कसोटी विजय मिळवले आहेत.
भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे विराट
सन २०१४ पासून भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा विराट भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आत्तापर्यंत ५८ सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून, त्यापैकी ३४ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. सोबतच, १४ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पहावे लागले. उर्वरित, १० सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारतीय संघाचा चेन्नई कसोटीत दिमाखदार विजय
भारतीय कर्णधाराने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहित शर्माने १६१ धावांची अफलातून खेळी केल्याने भारतीय संघ ३२९ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्यांचा पहिला डाव १३४ भावांवर गुंडाळला.
पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीनंतर भारतीय संघाने दुसर्या डावात अश्विनच्या शतकामुळे २८६ धावा फटकावल्या. इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान देण्यात आले. हे आव्हान इंग्लंड संघाला पार करण्यात अपयश आले आणि भारताने ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला. सामनावीर म्हणून एक शतक आणि आठ बळी मिळवणाऱ्या रविचंद्रन अश्विनची निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
“पंत पुढची १० वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवेल,” भारतीय दिग्गजाकडून कौतुकाची थाप
‘आम्ही मुळे कधीच काढून फेकली होती आता…’, अमिताभ बच्चन यांनी केले इंग्लंडला ट्रोल
Video: चेन्नई कसोटीत अश्विन अण्णाचा भन्नाट डान्स, प्रेक्षकांकडून शिट्ट्यांसह टाळ्यांचा कडकडाट






