पार्ल। भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका संपली असून यजमानांनी या मालिकेत बाजी मारली. आता उभय संघात १९ जानेवारीपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. ही मालिका भारतीय संघाला केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली खेळायची आहे. दरम्यान, मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंचे फोटोशूट करण्यात आले असून त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
भारतीय संघाचे फोटोशूट
तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंचे वनडे संघाच्या जर्सीत फोटोशूट करण्यात आले आहे. या फोटोशूटची एक झलक बीसीसीआयने व्हिडिओच्या स्वरुपात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ‘हेडशॉट टाईम. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या शूटची एक झलक.’
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम कर्णधार केएल राहुल आणि त्यानंतर उपकर्णधार जसप्रीत बुमराह दिसतो. पण यापूर्वी बऱ्याचदा बीसीसीआयच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच दिसणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या व्हिडिओमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दिसून आला आहे.
विराट आता भारताकडून केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. त्याने नुकतेच १५ जानेवारी रोजी भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडले असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याच्याकडून वनडे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. तसेच त्याच्याआधीच त्याने टी२० कर्णधारपदही सोडले होते.
याशिवाय या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, शिखर धवन, युजवेंद्र चहल यांच्यासह जवळपास ४ वर्षांनी वनडे संघात पुनरागमन करणारा आर अश्विन हा देखील दिसून येत आहे. याबरोबरच युवा क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर आणि ऋतुराज गायकवाड हे देखील दिसत आहेत.
𝐇𝐞𝐚𝐝𝐬𝐡𝐨𝐭𝐬 𝐭𝐢𝐦𝐞 📸 📸
A snippet from #TeamIndia's headshots shoot ahead of the ODI series against South Africa. 👌 👌#SAvIND pic.twitter.com/gPHarEwKTV
— BCCI (@BCCI) January 18, 2022
केएल राहुल करणार नेतृत्त्व
विराटकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आल्याने ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. मात्र, रोहित दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले, तसेच बुमराहकडे प्रभारी उपकर्णधारपद सोपवण्यात आले.
अशी होणार आहे वनडे मालिका
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना १९ जानेवारी रोजी पार्ल येथे होणार असून याच ठिकाणी २१ जानेवारीला दुसरा वनडे सामना पार पडेल. त्यानंतर केपटाऊन येथे तिसरा आणि अखेरचा वनडे सामना २३ जानेवारीला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने केव्हा घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय? बुमराहने सांगितली ‘राज की बात’
केवळ ४० मिनीटांत झाले होते एबी डिविलियर्सचे वनडेमधील शतक; मोडले होते ‘हे’ विश्वविक्रम
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?