वनडे मालिकेची सुरुवात धमाकेदार विजयाने केल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली होती. ‘किंग कोहली’ने शानदार फलंदाजी करत 93 धावांची लाजवाब खेळी साकारली होती.
दुसरीकडे, कर्णधार शुभमन गिलच्या बॅटमधूनही अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली होती. गोलंदाजीमध्ये सिराज आणि हर्षित राणा यांची कामगिरी दमदार राहिली. याउलट, न्यूझीलंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. मात्र, राजकोटमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघात बदल होणे अटळ आहे. याचे कारण म्हणजे, वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला होता. दुखापतीमुळे सुंदर आता संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आयुष बदोनीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
सुंदरच्या जागी आयुष बदोनीला दुसऱ्या वनडेच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. आयुष बॅट आणि बॉल या दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर तो एक ‘फिनिशर’ म्हणूनही खूप प्रभावी ठरू शकतो. याच कारणामुळे आयुषचे पदार्पण निश्चित मानले जात आहे.
भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. वडोदरा येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी जोरदार झाली होती. न्यूझीलंडने दिलेले 301 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने 6 गडी गमावून एक ओव्हर राखून गाठले होते. विराट कोहलीचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले होते, त्याने 91 चेंडूत 93 धावांची दमदार खेळी केली होती. तसेच कर्णधार गिलने 56 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकांमध्ये केएल राहुलने 21 चेंडूत 29 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.






