भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. रविवारी टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने सलग दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. तसेच जसप्रीत बुमराहपासून ते शिवम दुबे आणि हार्दिक पांड्यापर्यंत सर्वांनीच आपापले योगदान चोख बजावले आहे.
आता भारताला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनून इतिहास घडवायचा असेल, तर ८ मार्च रोजी होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचे आव्हान मोडीत काढावे लागेल. मात्र, या जेतेपदाच्या लढतीपूर्वी टीम इंडियाच्या काही त्रुटी जगासमोर आल्या आहेत, ज्यामुळे भारताच्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, ते येथे जाणून घ्या.
विशेषतः वरुण चक्रवर्ती सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे, ज्याने इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ४ ओव्हर्समध्ये ६४ धावा लुटवल्या. गेल्या चारही सामन्यात त्याने विकेट्स तर घेतल्या आहेत, पण प्रतिस्पर्धी फलंदाजांनी त्याला प्रचंड चोपले देखील आहे. वॉशिंग्टन सुंदरकडे एक फिरकी पर्याय आणि चक्रवर्तीचा बदली खेळाडू म्हणून पाहिले जाऊ शकते, परंतु टीम इंडियाचे व्यवस्थापन क्वचितच त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढेल. चक्रवर्ती सध्या या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स (१३) घेणारा गोलंदाज आहे, ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाही.
दुसरीकडे, व्यवस्थापनाने अभिषेक शर्मावरही सतत विश्वास दाखवला आहे आणि फायनलमध्येही त्याला नक्कीच संधी मिळेल. तसेच संजू सॅमसन आणि इशान किशन हे भारतीय फलंदाजीचा कणा बनले आहेत. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी सातत्याने छोट्या पण महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. गोलंदाजीच्या फळीतही कोणत्याही बदलाची शक्यता कमी आहे. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या हे वेगवान गोलंदाजीचे तीन पर्याय असतील, तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल फिरकीची धुरा सांभाळताना दिसू शकतात.






