---Advertisement---

आठवण ‘त्या’ निवडक कसोटी सामन्यांची, जेव्हा बलाढ्य विरोधकांना अस्मान दाखवत भारताने रोवले होते विजयी झेंडे

On: शुक्रवार, जानेवारी 29, 2021 8:17 PM
---Advertisement---

क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरी भारताला क्रिकेटवेड्या लोकांचा देश म्हणून संबोधले जाते. कोलकाताचे ईडन गार्डन स्टेडियम, मुंबईचे वानखेडे स्टेडियम, बेंरळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम ही भारत देशातील काही प्रसिद्ध क्रिकेट मैदाने आहेत. यात चेन्नईतील चेपॉक नावाने प्रसिद्ध एमए चिंदबरम स्टेडियमचीही गणना केली जाते. याच मैदानावर ५ ते ९ फेब्रुवारी आणि १३ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत भारत आणि इंग्लंड संघात कसोटी सामन्यांची लढत होणार आहे. हे दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने क्रिकेट रसिकांचे या कसोटी सामन्यांद्वारे पैसावसूल मनोरंजन होणार हे निश्चित आहे.

तत्पुर्वी या लेखात आम्ही चेन्नई स्टेडियमवर भारतीय संघाने मिळवलेल्या अविस्मरणीय विजयांचा आढावा घेतला आहे.

चला तर नजर टाकूया त्या सामन्यांवर…

भारत विरुद्ध इंग्लंड – १ डाव ७५ विकेट्स

१६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१६ दरम्यान भारत विरुद्ध संघात रोमहर्षक कसोटी सामना झाला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी मिळून पाहुण्या इंग्लंडच्या खेळाडूंना सळो की पळो करून सोडले होते. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात भारतापुढे ४७८ धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याच्या १४६ धावांचा यात मोठा वाटा होता.

तसे तर, भारतीय संघ ३-०च्या फरकाने मालिकेत आघाडीवर होता. परंतु मालिकेची केवळ सुरुवातच नव्हे शेवटही गोड करण्याचा उद्देश भारतीय खेळाडूंचा असावा. त्यानुसार इंग्लंडच्या ४७८ धावांचा पाठलाग करताना करूण नायर याने नाबाद त्रिशतक केले होते. तर सलामीवीर केएल राहुल यानेही १९९ धावांची झुंजार खेळी केली होती. अखेर ७५९ धावांचा भलामोठा स्कोर केल्यानंतर भारताने डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा आख्खा संघ २०७ धावांवर गारद झाला होता. ४८ धावांवर इंग्लंडच्या ७ फलंदाजांची त्याने विकेट काढली होती. यासह एका डाव अन् ७५ धावांनी भारताने विजयी पताका झळकावली होती.

या सामन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या खेळीचा आणि या सामन्याचा कोणत्याही क्रिकेट रसिकाला विसर पडणे अशक्य आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ विकेट्स

चेपॉक स्टेडियमवरील भारतीय संघाचा रोमहर्षक विजयांत, २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कसोटी सामन्याची आवर्जुन आठवण काढली जाते. २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या सामन्यात तत्कालिन कर्णधार धोनीने झुंजरा द्विशतक नोंदवले होते. त्याच्या या योगदानामुळे भारताने ८ विकेट्सने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात केली होती.

प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा तत्कालिन कर्णधार मिचेल क्लार्कने शतक करत भारतापुढे ३८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात धोनीने ६ षटकार आणि २४ चौकारांच्या मदतीने २२४ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. त्याला यशस्वी साथ देत विराट कोहलीनेही शतक झळकावले होते. यासह भारताला ५७२ धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. पुढे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघ २४१ धावांवरच गारद झाला आणि भारताला विजयासाठी अवघ्या ५० धावांचे आव्हान दिले. २ विकेट्सच्या नुकसानावर ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण करत भारताने अविस्मरणीय विजय साकारला होता.

भारत विरुद्ध इंग्लंड – १ डाव २२ धावा

१९व्या शतकाच्या शेवटी चेपॉक स्टेडियमवर यजमान भारताने पाहुण्या इंग्लंडला स्वप्नातही विसर न पडण्याजोग्या पराभवाचे तोंड दाखवले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर भारताच्या त्या ऐतिहासिक विजयाचा नायक ठरला होता.

११ ते १५ फेब्रुवारी १९९३ या कालावधीत झालेल्या या सामन्यात १६५ षटके फलंदाजी केल्यानंतर ५६० धावांवर पहिला डाव घोषित केला होता. ही भलीमोठी धावसंख्या उभारण्यात तेंडूलकर आणि नवजोत सिंग सिद्धू यांचे मोठा हात होता. या शिलेदारांनी  अनुक्रमे दिडशतकी आणि शतकी खेळी साकारल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाज व्यंकटपथी राजू, अनिल कुंबळे आणि राजेश चौहान यांनी चमकदार गोलंदाजी करत २८६ धावांवर इंग्लंडचा पहिला डाव संपवला होता आणि त्यांना फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले होते.

दुसऱ्या डावात इंग्लंडचे दिग्गज ख्रिस लेविस यांनी लढाऊ बाणा अंगिकारत शतकी खेळी केली होती. परंतु अनिल कुंबळेंच्या फिरकीमुळे लेविस यांची शतकी खेळी वाया गेली. ६४ धावांवर इंग्लंडच्या ६ फलंदाजांना तंबूत धाडत २५२ धावांवर कुंबळेंनी इंग्लंड संघाला रोखले होते. यासह एका डावाची आघाडी घेत २२ धावांनी भारताने तो सामना खिशात घातला होता.

याव्यतिरिक्तही भारताने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर काही अविस्मरणीय कसोटी विजय मिळवले आहेत.

संबंधित लेख-

एक असा गुजराती, ज्याच्या आजीच्या स्वप्नांनी भरलं पंखात बळ; आता इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणासाठी सज्ज

ऐकावं ते नवलंच! भारतातील ‘या’ दोन क्रिकेट स्टेडियममध्ये आहे गणपतीचे मंदिर

इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताविरुद्ध केलेल्या झुंजार खेळी, ज्यांचा क्रिकेट रसिकाला स्वप्नातही नाही पडणार विसर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---