शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात ५४ वा सामना पार पडला. हा दोन्ही संघांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना होता. या सामन्यात कोलकाताने तब्बल ८६ धावांनी विजय मिळत प्लेऑफमधील स्थान जवळजवळ पक्के केले आहे. यासह त्यांनी एक मोठा विक्रमही केला आहे.
या सामन्यात कोलकाता संघाने राजस्थानला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले होते. पण, या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघ १६.१ षटकात ८५ धावांवर सर्वबाद झाला. आयपीएलमध्ये कोलकाताने प्रतिस्पर्धी संघाला १०० धावांच्या आत सर्वबाद करण्याची सहावी वेळ होती.
त्यामुळे कोलकाताने आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिकवेळा १०० पेक्षा कमी धावांत सर्वबाद करणाऱ्या संघांच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांची बरोबरी केली आहे. या दोन संघांनीही आत्तापर्यंत प्रत्येकी ६ वेळा प्रतिस्पर्धी संघाला १०० धावांच्या आत सर्वबाद केले आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आहेत. त्यांनी ५ वेळा प्रतिस्पर्धी संघाला १०० धावांपेक्षा कमी धावांवर सर्वबाद केले आहे. तर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने हा कारनामा प्रत्येकी ३ वेळा केला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा प्रतिस्पर्धी संघाला १०० धावांच्या आत सर्वबाद करणारे संघ –
६ – कोलकाता नाईट रायडर्स
६ – मुंबई इंडियन्स
६ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
५ – चेन्नई सुपर किंग्स
३ – सनरायझर्स हैदराबाद
३ – राजस्थान रॉयल्स
२ – पंजाब किंग्स
१ – दिल्ली कॅपिटल्स
कोलकाताचा विजय
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताच्या शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी ७९ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. गिलने ५६ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने ३८ धावांची खेळी केली. अन्य खेळाडूंनीही छोटेखानी पण महत्त्वाच्या खेळी करत कोलकाताला २० षटकांत ४ बाद १७१ धावांपर्यंत पोहचवले.
त्यानंतर, १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी अक्षरश: कोलकाताच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. राजस्थानचा संघ १६.१ षटकात ८५ धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून केवळ राहुल तेवातियाने ४४ धावांची एकाकी झुंज दिली. तर, शिवम दुबेने १८ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने दोनआकडी धावसंख्या पार केली नाही.
कोलकाताकडून शिवम मावीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि लॉकी फर्ग्यूसनने ३ विकेट्स घेतल्या. तसेच, शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
विजय केकेआरचा, पण ट्रोल होतेय मुंबई इंडियन्स, सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट
मुंबईचं प्ले ऑफचं स्वप्न अजूनही होऊ शकत पूर्ण, पुढच्या सामन्यात करावी लागणार ‘ही’ गोष्ट
शफाली-जेमिमाच्या फटकेबाजीने जिंकले मन; मात्र, पावसाने सामना झाला रद्द