भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी विसरून नवीन सुरुवात केली आहे. टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने बलाढ्य न्यूझीलंड संघाला पराभूत केले आहे. हा विजय खास आहे, कारण विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी खेळाडू या मालिकेतून बाहेर आहेत. तसेच रोहित शर्माने नियमित टी२० संघाचा कर्णधार म्हणून आपली नवीन इनिंग सुरू केली आहे.
या सामन्यात युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. चला तर जाणून घेऊया भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील १० खास गोष्टी.
१)भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी२० सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.
२) कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात भुवनेश्वर कुमारला देखील संधी दिली होती. जो आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता, तर रोहित शर्माने व्यंकटेश अय्यरला देखील संधी दिली होती. हा त्याचा पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामना होता.
३) या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद १६४ धावा केल्या होत्या. यामध्ये मार्टिन गप्टीलने ७० आणि चॅपमनने ६३ धावांचे योगदान दिले होते.
४) भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने २३ आणि भुवनेश्वर कुमारने २४ धावा देत प्रत्येकी २ गडी बाद केले. ज्यावेळी न्यूझीलंड संघाने ११० धावा केल्या होत्या. त्यावेळी असे वाटू लागले होते की, न्यूझीलंड संघ १८० धावांचा पल्ला गाठेल. परंतु, आर अश्विनने एकाच षटकात दोन गडी बाद करत न्यूझीलंड संघाच्या रणनितीवर अंकुश लावला.
५) न्यूझीलंड संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती. भारतीय संघाने अवघ्या ५ षटकात ५० धावांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर केएल राहुल १५ धावा करत माघारी परतला होता.
६) केएल राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी ५९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा ४८ धावा करत धावबाद होऊन माघारी परतला होता. त्याने ३६ चेंडूंचा सामना केला होता.
७) रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली आणि भारतीय संघाला आव्हानाच्या जवळ पोहचवले. तो ६२ धावा करत माघारी परतला. ज्यावेळी तो बाद झाला त्यावेळी भारतीय संघाच्या धावा १४४ होत्या.
८) भारतीय संघ जेव्हा आव्हानाच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्यावेळी भारतीय संघाचे दोन फलंदाज लवकर माघारी परतले होते. श्रेयस अय्यर १९ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर पदार्पण करत असलेल्या व्यंकटेश अय्यरला देखील मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी मिळून भारतीय संघाला सामना जिंकून दिला.
९) सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने ६२ धावांची तुफानी खेळी केली. ही त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी होती. या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले होते.
१०) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांची येथे खेळला जाणार आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. दुसरीकडे रांचीमध्येच मालिका काबीज करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाची सुरु झाली २०२२ टी२० विश्वचषकाची तयारी? कर्णधार रोहित शर्माने दिले संकेत






