२४ वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताने २००७मध्ये टी-२०चा पहिला वाहिला विश्वचषक आपल्या नावे केला. त्याआधी भारताने १९८३मध्ये विश्वचषक जिंकल्याचे सेलिब्रेशन केले होते. २००७ मधील यश खरेच खास होते कारण या वर्षी भारताला फक्त विश्वचषकच नाही तर महेंद्रसिंग धोनीच्या रूपात एक अप्रतिम कर्णधारही मिळाला. त्यानंतर धोनीने ५० षटकांचा विश्वचषक आणि आयसीसीची टेस्ट मेसही जिंकून दिली.
२००७चा चा तो विश्वचषकात भारताच्या युवराज सिंगने प्रत्येक भारतीयाला एक अविस्मणीय क्षण दिला. तो म्हणजे त्याने स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले एका षटकात सहा षटकार. युवराजच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण होता. या सामन्यात युवराजने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वात जलद म्हणजे फक्त १२ चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला जो की अजूनही त्याच्याच नवे आहे.
त्यानंतर युवराजचे आयुष्य बदलले आणि त्याने २०११ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यात सिहांचा वाट उचलला. त्या स्पर्धेचा तो मानकरी ही ठरला. पण त्या स्पर्धेनंतर त्याला कॅन्सर झाला आहे असे कळले आणि त्याचे आयुष्य बदलून गेले. युवराजने त्यानंतरही आंतराष्ट्रीयमध्ये पुनरागमन केले पण आधी सारखा युवराज परत क्रिकेट प्रेमींना बघायला मिळाला नाही. आता चालू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया मालिकेतही युवराजला स्थान देण्यात आलेले नाही.
तर दुसऱ्या बाजूला युवराजने ज्याला ६ षटकार लगावले त्या स्टुअर्ट ब्रॉडचे ही आयुष्य बदलून गेले. २१ वर्षी स्टुअर्ट ब्रॉड तेव्हा खचला नाही आणि काही काळ वनडे आणि टी-२० मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो इंग्लंडच्या टेस्ट टीमचा प्रमुख गोलंदाज बनला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६३१ बळी घेतले आहेत. मागील १० वर्षात त्याने जगभरात चांगली कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे त्यावेळी स्टुअर्ट ब्रॉड एकही कसोटी सामना खेळला नव्हता परंतु आज ह्या गोलंदाजाच्या नावावर आज तब्बल १०९ कसोटी सामने आहेत. तेव्हा युवराज सिंग मात्र भारताकडून १९ कसोटी सामने खेळला होता. आज युवराजच्या नावावर केवळ ४० कसोटी सामने असून एक कसोटीपटू म्हणून ब्रॉड खूप पुढे निघून गेला.
त्यावेळी युवराज भारताकडून १०७ वनडे सामने खेळला होता तर ब्रॉड १६ वनडे सामने खेळला होता. पुढे जाऊन युवराजने भारताकडून एकूण ३०४ वनडे सामने खेळले तर ब्रॉडला केवळ १२१ वनडे सामन्यात इंग्लंडकडून भाग घेता आला. तो ब्रॉडचा केवळ ७ वा टी२० सामना होता तर युवराज सिंगचा केवळ ४था टी२० सामना होता. पुढे जाऊन ब्रॉडने ५६ टी२० तर युवराजने ५८ टी२० सामने खेळले.
आता ब्रॉड ३१ वर्षाचा आहे तरी सुद्धा तो उत्तम वेगाने गोलंदाजी करतो आणि फलंदाजांना त्रस्त करतो. आता ब्रॉड आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ११व्या क्रमांकावर आहे.