प्रथमच आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. या लिलावात सहा फ्रेंचाईजींनी भाग घेतला. या सहा संघाने मिळून तब्बल 128 खेळाडूंवर बोली लावली. यामध्ये अनेक युवा तसेच अनुभवी खेळाडूंचा समावेश होता. त्याचवेळी यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जगभरात आपले नाव केलेला अष्टपैलू विजय पावले याला देखील संधी मिळाली. आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विजयला संधी मिळाल्याने टेनिस क्रिकेटच्या विश्वातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
विजय पावले हा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा असून आतापर्यंत त्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक विक्रमाची नोंद आहे. दुबई येथील शारजहा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी तो अनेक वेळा भारतीय संघाचा भाग राहिला आहे. वेगवान गोलंदाज म्हणून टेनिस विश्वात त्याने आपली वेगळी छाप पाडलीये.
टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमावले असले तरी त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात लेदर बॉल क्रिकेटने केली होती. सांगली जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व ही त्याने केले आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी त्याला मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून जाण्याची देखील सुवर्णसंधी मिळालेली.
टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार असलेला विजय आता एमपीएलमध्ये जेट सिंथेसिस यांच्या मालकीच्या रत्नागिरी जेट संघाचा भाग असेल. त्याच्यावर वीस हजारांची बोली लावत त्यांनी विश्वास दाखवला आहे. या संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेले अझीम काझी, निखिल नाईक, दिव्यांग हिंगणेकर व निकीत धुमाळ हे अनुभवी खेळाडू देखील सामील आहेत.
(Tennis Cricketer Vijay Pawale Bought By Ratnagiri Jets In MPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
केएस भरतचा मोठा खुलासा, WTC फायनलसाठी धोनीकडून IPL मध्येच घेतल्या आहेत टिप्स