कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली. २०१९ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ९ बलाढ्य संघांनी सहभाग घेतला होता. तब्बल २ वर्ष सुरू राहिलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला वहिला अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही तुल्यबळ संघामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना आजपासून (१८ जून) सुरू होणार आहे. यापूर्वी देखील कसोटी स्वरूपात अंतिम सामने खेळले गेले आहेत. या ऐतिहासिक सामन्यांतील लढत कशी झाली होती, या सामन्यात कुठल्या संघाने बाजी मारली होती? चला तर पाहुया…
तिरंगी कसोटी मालिका, १९१२
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांमध्ये १९१२ मध्ये तिरंगी कसोटी मालिकेचे आयोजन लंडनमध्ये करण्यात आले होते. या मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली होती.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा केल्या होत्या. यामध्ये हुब्सने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील फलंदाजांना सर्वबाद १११ धावा करता आल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघाकडून केलेवेने सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले होते. याव्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
तसेच दुसऱ्या डावात फालंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाकडून कर्णधार फ्रायने सर्वाधिक ७९ धावांचे योगदान दिले होते. याच खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली होती. इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियन संघासमोर ३१० धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना, मकार्टणेची ३० धावांची खेळी वगळता कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यातील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाला अवघ्या ६५ धावा करण्यात यश आले होते. हा सामना इंग्लंड संघाने २४४ धावांनी आपल्या नावावर करत, तिरंगी मालिका १९१२ चे जेतेपद पटकावले होते.
आशिया कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा, १९९९
आशिया कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना १२ मार्च ते १५ मार्च १९९९ मध्ये, श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये रंगला होता. या सामन्यातील पहिल्या डावात श्रीलंका संघाने फलंदाजी करताना, अरविंद डी सिल्वाने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली होती. तर पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना अर्शद खानने ५ गडी बाद केले होते.
प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाकडून फलंदाजी करताना इजाज अहमदने २११ धावांची तुफानी खेळी केली होती. तर इंजमाम ऊल हकने २०० धावांचे योगदान दिले होते. याच खेळीच्या जोरावर, पाकिस्तान संघाने ५९४ धावांचा डोंगर उभारला होता. मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. हशन तिलकरत्नेने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली होती. तर रसल आर्नोल्डने ३० धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात श्रीलंका संघाला सर्वबाद १८८ धावा केल्या होत्या. हा सामना पाकिस्तान संघाने १७५ धावांनी आपल्या नावावर केला होता.
आशिया कसोटी चॅम्पियनशीप २००२
आशिया कसोटी चषक २००२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. यावेळी श्रीलंकन संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करत १९९९ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला होता.
या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तान संघाकडून युनूस खानने सर्वाधिक ४६ धावांचे योगदान दिले होते. या डावात पाकिस्तान संघाला सर्वबाद २३४ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकन संघाकडून, कुमार संगकाराने ताबडतोड २३० धावांची खेळी केली होती. तर सनाथ जयसुर्याने ८८ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने ५२८ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना, पाकिस्तान संघाकडून इंजमाम उल हकने ९९ धावांची खेळी केलं होती. तर शाहिद आफ्रिदीने ७० धावांचे योगदान दिले होते. पाकिस्तान संघाला दुसऱ्या डावाच्या अखेर सर्वबाद ३२५ धावा करण्यात यश आले होते.
श्रीलंका संघाचा विजय या सामन्यात निश्चित होता. कारण, त्यांना विजय मिळवण्यासाठी अवघ्या ३२ धावा करायच्या होत्या. शेवटी कुमार संगकाराने नाबाद १४ आणि जयवर्धनेने नाबाद १२ धावांची खेळी करत, श्रीलंका संघाला या अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आपापसांत सराव सामने खेळणे निरुपयोगी, कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात न्यूझीलंडचेच पारडे जड’
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ‘हे’ भारतीय शिलेदार बलाढ्य न्यूझीलंडचा उडवतील धुव्वा!
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप फत्ते करण्यासाठी कर्णधार कोहलीने बनवला ‘हा’ मास्टरप्लॅन, वाचा