दिल्ली। भारत विरुद्ध बांगलादेश संघात रविवारी(3 नोव्हेंबर) पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली.
दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेला हा सामना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासातील 1000 वा सामना होता. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी20 प्रकार चालू झाल्यानंतर 14 वर्षांनी 1000 वा सामना खेळवण्याचे भाग्य भारत आणि बांगलादेश संघांना मिळाले.
विशेष गोष्ट म्हणजे या 14 वर्षांमध्ये पहिले 500 टी20 सामने खेळण्यास 10 वर्षे 364 दिवसांचा कालावधी लागला. पण त्यापुढील 500 टी20 सामने केवळ 3 वर्षे 259 दिवसांच्या कालावधीत खेळवण्यात आले.
https://twitter.com/Maha_Sports/status/1190989823168790528
आंतरराष्ट्रीय टी20चा सर्वात पहिला सामना 17 फेब्रुवारीला 2005 ला ऑकलंड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला होता. त्यानंतर आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक सामने पाकिस्तानने खेळले आहेत. त्यांनी 147 टी20 सामने खेळले.
त्यांच्यापाठोपाठ श्रीलंका आणि न्यूझीलंड आहे. या दोन्ही देशांनी प्रत्येकी 123 टी20 सामने खेळले. तर त्यानंतर भारतीय संघाचा क्रमांक लागतो. भारताने 121 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 74 सामन्यात विजय मिळवला आहे.
या देशांना मिळाले आहे 1000 वा सामना खेळण्याचे भाग्य –
कसोटीमध्ये 1000 वा सामना 1984 ला हैद्राबाद येथे पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला होता. तर वनडेमधील 1000 वा सामना 1995 ला इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज संघात नॉटिंगघम येथे पार पडला.






