भारतात लवकरच देशांकर्गत क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राज्य संघ तयारीला लागले असून पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिशननेही (कॅब) नुकतेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यांनी भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला बंगाल क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून कायम केले आहे.
त्याचबरोबर राजकारणातून पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळलेल्या लक्ष्मी रतन शुक्लाची 23 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. बंगालचा माजी वेगवान गोलंदाज शिवशंकर पॉल यांना संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनविण्यात आले आहे. महिला क्रिकेटमध्ये रितुपर्णा रॉय या मुख्य प्रशिक्षिका असतील, तर चरणजित सिंग बंगालच्या वरिष्ठ संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
शुक्ला राजकारणातून सहा वर्षांनंतर पुन्हा क्रिकेटमध्ये परतला आहे. बंगालचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या शुक्लाने तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी 2016 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
शुक्ला हावडा येथून आमदार झाला होता आणि नंतर त्यानी राज्याचा क्रीडामंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. पण आता शुक्लाने क्रिकेटकडे येण्यासाठी राजकारणाला निरोप दिला आहे. क्रिकेटमधील आपला प्रशिक्षक म्हणून प्रवास सुरू करताना तो म्हणाला, ‘चला एकत्र काम करायला सुरुवात करूया. मी काम सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.’
नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिशननेही अनुभवी अरुण लाल यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून तर सौरसिश लाहिरी यांना वरिष्ठ संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केले आहे.
कॅबचे अध्यक्ष अभिषेक डालमिया यांनी निवेदनात म्हटले आहे की, “संघटनेच्या वतीने मी नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या सर्व माजी क्रिकेटपटूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की, येत्या देशांतर्गत क्रिकेट हंगामातील स्पर्धेत बंगाल क्रिकेटला उंचीवर पोहोचण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यास ते नक्कीच सक्षम असतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रदरली चॅलेंज! जेव्हा पंड्या बंधू जीममध्ये देतात एकमेकांना आव्हान, पाहा काय लागला निकाल
टी२० विश्वचषकासाठी बड्या खेळाडूने निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, धवनला दाखवला बाहेरचा रस्ता
प्रेयसी अथियाच्या भावासोबत चिल करताना दिसला राहुल; नेटकरी म्हणे, ‘भावजी-मेहुणे एकत्र’






