वर्ष १९८६ …फुटबॉल विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंड व अर्जेंटिना आमने सामने होते. हा असा सामना होता जो, कदाचित कोणत्याही फुटबॉल चाहता विसरला नसेल. या सामन्यात एक असा गोल नोंदविला गेला जो, फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात विवादित गोल ठरला. या एका गोलने इंग्लंडच्या विश्वविजेत्या होण्याच्या स्वप्नाचा चुराडा केला आणि दोन सामन्यांनंतर अर्जेंटिनाला विश्वविजेते बनवले. ‘हॅण्ड ऑफ गॉड’ नावाने साऱ्या क्रीडाविश्वात ‘कुप्रसिद्ध’ असणारा हा गोल करणारा खेळाडू होता अर्जेंटिनाचा कर्णधार दिएगो मॅराडोना.
‘हॅन्ड ऑफ गॉड’ ची कहाणी
मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या १९८६ फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात दोन बलाढ्य संघ आपसात भिडले. इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील हा सामना अत्यंत अटीतटीची होणार याची सर्वांना खात्री होती. पहिल्या हाफमध्ये कोणताही गोल झाला नाही. परंतु, दुसर्या हाफमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंडने प्रत्येकी एक गोल करून सामना रंगतदार बनवला होता. सामना संपण्यासाठी ६ मिनिटे शिल्लक असताना, मैदानावर असे काही घडले, ज्यानंतर इंग्लंडचे खेळाडू आणि करोडो चाहते ढसाढसा रडत होते.
असा झाला फुटबॉल इतिहासातील सर्वात विवादित गोल
अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी इंग्लंडच्या गोलक्षेत्रात धडक मारत चेंडू मॅराडोनाकडे दिला आणि त्याने तो त्वरित आपला जोडीदार हॉर्गे वाल्डोनाकडे सोपवला. मॅराडोनाने दिलेला पास वॉल्डोनाला सांभाळू शकला नाही. चेंडू वॉल्डोनाच्या आवाक्याबाहेर गेला आणि इंग्लंडचा मिडफिल्डर स्टीव्ह हॉजने त्यावर कब्जा केला. हॉज चेंडूला बाहेर मारून अर्जेटिनाला पेनल्टी कॉर्नर देऊ शकला असता. परंतु, त्याने चेंडू उंचावरून आपला गोलकीपर पीटर शिल्टनच्या दिशेने ढकलला. मॅराडोना विजेच्या वेगाने चेंडूपाशी गेला.
मॅराडोनाने चेंडूला हेडर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू डोक्याला लागण्याआधी मॅराडोनाच्या हाताला लागून इंग्लंडच्या गोलपोस्टमध्ये गेला. अर्जेंटिनाच्या खेळाडूंना काय घडले हे समजले नाही. चेंडूवर जाळीत गेला तरी अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी जल्लोष केला नव्हता. दुसरीकडे, इंग्लंडचे खेळाडू रेफ्री अली बिन नेसर यांच्याशी वाद घालताना सांगत होते की, चेंडू मॅराडोनाच्या हाताला लागला आहे. रेफ्रींनी इंग्लिश खेळाडूंचे म्हणणे ऐकले नाही आणि हा गोल असल्याचे जाहीर केले. रिप्लेमध्ये पाहिले तेव्हा, चेंडू मॅराडोनाच्या डोक्यापासून खूप दूर होता आणि हाताला लागून जाळीमध्ये गेला होता. रेफ्रींच्या नजरेतून ही गोष्ट सुटली होती. अखेरीस, अर्जेंटिनाने २-१ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली.
रेफ्रींनी दिले होते स्पष्टीकरण
मॅच रेफ्री बिन नेसर यांनी सामन्यानंतर स्पष्टीकरण दिले होते की,
“तो चेंडू मला स्पष्ट दिसला नव्हता. मी दुसरे रेफ्री डोकाव यांच्याकडे पाहिले. परंतु त्यांनी देखील हॅण्डबॉलचा इशारा केला नाही. अशा परिस्थितीत मी अर्जेंटिनाच्या बाजूने निर्णय दिला.”
मॅराडोना यांची ‘हॅण्ड ऑफ गॉड’ वरील प्रतिक्रिया
मॅरेडोना यांनी या गोलबद्दल म्हटले की,
“मी माझ्या संघसहकाऱ्यांची जल्लोषासाठी वाट पाहत होतो. पण, कोणीही आनंद साजरा करण्यासाठी आले नाही. मी ओरडून म्हटलो, मला मिठी मारा, नाहीतर रेफ्री गोल देणार नाही.”
यानंतर, २००५ मध्ये मॅराडोना यांनी या गोलविषयी कबुली देताना म्हटले होते, तो गोल हेडरने झाला नव्हता. मी मुद्दामहून माझा डावा हात समोर केला होता.”
या विजयानंतर अर्जेंटिनाने उपांत्य सामन्यात बेल्जियमला २-० ने पराभूत केले आणि अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीला पराभूत करून दुसऱ्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला.
वाचा –
दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या कारकिर्दीवर एक नजर…
ब्रेंकिंग ! महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन