---Advertisement---

MPL 2025: सातारा वॉरियर्स संघाच्या जर्सीचे लॉन्चिंग थाटामाटात

On: सोमवार, मे 19, 2025 8:37 PM
---Advertisement---

४ जून पासून पुण्यात रंगणार एमपीएल व डब्ल्यूएमपीएल स्पर्धेचा थरार!

सातारा जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढविण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करणार – रोहित पवार

सातारा, दिनांक १८ मे, २०२५ : आज ॲक्वा हॉल, सातारा क्लब येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. यावर्षी यंदाच्या तिसऱ्या हंगामात एक महत्त्वाचा टप्पा गाठत ‘सातारा वॉरियर्स’ या नव्या संघाचा एमपीएलमध्ये समावेश करण्यात आला असून, एमपीएल आता अधिक व्यापक आणि प्रतिस्पर्धात्मक बनली आहे. या संघाच्या सहमालकीत नामवंत उद्योगपती श्री. मनप्रीत सिंग उप्पल आणि पायाभूत सुविधा विकासात अग्रस्थानी असलेले श्री. गौरव गढोक यांचा समावेश आहे.

एमपीएल व डब्लूपीएल या फ्रेंचायसी टी-२० स्पर्धांमागची भूमिका, नवोदित खेळाडूंना मिळणारी संधी, संघमालकांची भूमिका, सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन करत असलेले काम या विषयांवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित दादा पवार यांनी यावेळी पत्रकारांना संबोधित केले.”

महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू निर्माण करण्यासाठी एमसीए सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी एमसीए सदैव कटिबद्ध असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सांगितले.”

या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव ॲड. कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य श्री. सुशील शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजिंक्य जोशी, सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी, सचिव इर्शाद बागवान, तसेच सातारा वॉरियर्स संघाचे संघमालक गौरव गढोक, ईशान उत्पल, संघाचे मॅनेजर आशिष सूर्यवंशी, संघातील खेळाडू पवन शाह, सौरभ नवले तसेच जिल्हा संघटनेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री. रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा आहे. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल हे केवळ स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. सर्व संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. येत्या ४ जूनपासून सुरू होणाऱ्या एमपीएल व डब्ल्यूएमपीएल या सामन्यांचा तुम्ही प्रत्यक्ष स्टेडियममध्ये येऊन अनुभव घ्यावा. तसेच आमच्या सर्व सोशल मीडिया हॅण्डल्सला फॉलो करावे, असे आवाहन मी तुम्हाला करतो. सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष निशांत गवळी व सचिव इर्शाद बागवान यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व कमिटी सातारा क्रिकेटच्या विकासासाठी स्वतः पुढाकार घेऊन उत्तम प्रयत्न करत आहेत, या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे. आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एमपीएल व डब्ल्यूएमपीएलच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून व पुढे जाऊन देशासाठी खेळतील.”

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरु करणार असून ही अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरु करण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्रात चार विभागीय अकादमी सुरु करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरमध्ये क्रिकेटसाठी जागा देण्यासाठी सकारात्मक असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा भविष्यात या जागेवर विभागीय अकादमी सुरू करण्याचा मानस आहे.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद सचिव ॲड. कमलेश पिसाळ म्हणाले की आज सातारा मधील अनेक महिला व पुरुष खेळाडू विविध वयोगटांसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. एमपीएल स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यांच्यासाठीही भविष्यात अनेक संधी निर्माण होणार आहेत. सातारा जिल्ह्यात अनेक गुणवान खेळाडू आहेत. त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची आवश्यकता होती. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत. सध्या सातारा जिल्ह्यातील दोन क्रिकेट मैदान आम्ही विकसित करत आहोत. भविष्यात आपल्याला सातारा जिल्हा क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल झालेले दिसतील, हा आम्हाला विश्वास आहे.

या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली.

या हंगामात एमपीएल मध्ये ६ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) व स्टार स्पोर्ट्स २ (Star Sports 2) या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

एमपीएल 2025 सहभागी संघ:

1. 4S पुणेरी बाप्पा

2. PBG कोल्हापूर टस्कर्स

3. रत्नागिरी जेट्स

4. ईगल नाशिक टायटन्स

5. सातारा वॉरियर्स

6. रायगड रॉयल्स

डब्लूएमपीएल 2025 सहभागी संघ-

1. पुणे वॉरियर्स

2. रत्नागिरी जेट्स

3. पुष्प सोलापूर

4. रायगड रॉयल्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---