पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार सलमान बट्ट लवकर क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा पाऊल ठेवणार आहेत. परंतु ते आता खेळाडू म्हणून नाही तर क्रिकेट सामन्याचे रेफरी म्हणून या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमान यांनी पीसीबी ऑनलाइन लेवल 1च्या कोर्समध्ये सहभाग घेतला आहे. पीसीबीने सोमवारी (1 जून) या कोर्सची सुरुवात केली आहे. सर्व माजी पाकिस्तानी खेळाडूंना रोजगाराची संधी मिळवून देणे, हे यामागील पीसीबीचे उद्दिष्ट आहे. या कोर्समध्ये माजी वेगवान गोलंदाज अब्दुल रऊफ यांनीही आपला सहभाग नोंदवला आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र न्यूज इंटरनॅशनलमधील माहितीनुसार, पीसीबी सामना रेफरी कोर्ससाठी 350 लोकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या कोर्समध्ये सामना रेफरी संबंधित सर्व नियम व कायदे शिकवले जातील. यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर तंदुरुस्तीची परीक्षा घेतली जाईल. यानंतर मुलाखत घेतली जाईल. असे या कोर्सचे स्वरूप आहे.
हा कोर्स पास झाल्यानंतर सहभागी खेळाडूंना क्लब किंवा शालेय स्तरीय सामन्यांमध्ये पंच किंवा सामना रेफरी म्हणून काम करता येईल. या कोर्समध्ये सलमान बट्ट आणि अब्दुल रउफ यांच्या व्यतिरिक्त बिलाल आसिफ यांनीही सहभाग नोंदवला आहे.
पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बट्ट जर सामना पंच झाले तर सर्वत्र खळबळ माजेल. कारण सलमान बट्ट हे 2010 मध्ये सामना फिक्सिंगच्या गुन्ह्यामध्ये दोषी आढळले होते. लॉर्ड्स कसोटीमध्ये इंग्लंडविरुद्ध सलमान बट्ट, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ या खेळाडूंनी सामना फिक्सिंगचा गुन्हा केला होता. यावेळी सलमान बट्ट यांच्यावर आयसीसीने 10 वर्षाची बंदी घातली होती. त्याचबरोबर साउथवार्क क्राऊन कोर्टाने सलमान बट्ट यांना 30 महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा दिली होती.
सलमान बट्ट यांची कारकिर्द संपुष्टात येण्याअगोदर त्यांची तुला सईद अनवर यांच्याशी केली जात होती. त्यांनी पाकिस्तान संघासाठी 33 कसोटी आणि 78 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सलमान बट्ट यांच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 शतके आणि 27 अर्धशतकांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
झारखंडचा ‘हा’ खेळाडू सापडलाय आर्थिक संकटात, शेती करून भरतोय पोट
‘पुजारा खूप हळू खेळतो का?’, चाहत्याच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मन जिंकणारे उत्तर
“एक काळ असा होता की, भारत आणि पाकिस्तान मालिकेला प्रतिष्ठेच्या ऍशेसपेक्षा जास्त पाठिंबा मिळायचा”