जगभरातील सर्व टी20 लीगमध्ये इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) ही सर्वात लोकप्रिय टी20 लीग आहे. या लीगमध्ये अनेक मोठ-मोठे विक्रम नव्याने बनतात आणि मोडले जातात. तसेच आयपीएलच्या इतिहासात अनेक अशा विक्रमांची नोंद आहे, ज्यांवरती विश्वास ठेवणे देखील अवघड जाते.
असाच एक अनोखा विक्रम म्हणजे आयपीएलच्या (IPL) एका मोसमात तब्बल 1000 मिनिटे फलंदाजी करणे. या विक्रमाची विशेष बाब अशी की, हा विक्रम आतापर्यंत केवळ एकच फलंदाज करू शकला आहे आणि तो एकमेव फलंदाज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने आयपीएलच्या 2016 या मोसमात दमदार फलंदाजी करत एकूण 973 धावा केल्या होत्या.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ऑरेंज कॅप (Orange Cap) आणि मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता. यावेळी विराटने संपूर्ण मोसमात तब्बल 1013 मिनिट फलंदाजी केली होती. आतापर्यंत आयपीएलच्या संपूर्ण मोसमात कोणत्याही क्रिकेटपटूने फलंदाजी केलेले ते सर्वाधिक मिनिट आहेत.
विराटने 2016च्या 9व्या आयपीएल मोसमात आरसीबीकडून खेळताना एकूण 4 शतक केले होते. यातील पहिले शतक त्याने गुजरात लायन्सविरुद्ध 63 चेंडूत पूर्ण केले होते. त्यानंतर पुणे सुपरजायन्टविरुद्ध त्याने आपले दुसरे शतक ठोकले होते. यावेळी त्याने 58 चेंडूत 108 धावा केल्या होत्या.
तर, तिसरे शतक 55 चेंडूत 109 धावा करत पुन्हा गुजरातविरुद्ध केले होते. तसेच, 9व्या मोसमातील आपले शेवटचे आणि चौथे शतक विराटने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) करत सामना खिशात घातला होता.
एवढेच नव्हे तर, विराट हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 5412 धावा केलेल्या आहेत.