आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलद्वारा (आयसीसी) आयोजित टी२० विश्वचषक २०२१ ची सुरुवात होण्यासाठी केवळ एका महिन्याचा कालावधी उरला आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेतील त्यांचा पहिलावहिला सामना पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. उभयंतांनी या महामुकाबल्यापूर्वी आपापले १५ सदस्यीय संघही जाहीर केले आहेत. परंतु त्यांच्या अंतिम एकादशविषयी सर्वांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
पाकिस्तान संघाने त्यांची टी२० लीग पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या अधिकाधिक खेळाडूंना टी२० विश्वचषकासाठी संधी दिली आहे. बाबर आझमकडेच या संघाचे नेतृत्त्वपद कायम असून विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद रिझवानचीही टी२० विश्वचषकासाठी निवड झाली आहे. या युवा प्रतिभाशाली शिलेदारावर संघाच्या यष्टीरक्षणाचीही जबाबदारी असेल.
तसेच अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिज यालाही या संघात जागा मिळाली आहे. तो युएईच्या मैदानावर गोलंदाजाच्या रुपातही उपयोगी ठरू शकतो. तसेच पाकिस्तानच्या या संघात वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचाही भरणा आहे.
अशात हा संघ पहिल्याच लढतीत भारताला टक्कर देण्यासाठी कोणत्या ११ खेळाडूंसह मैदानावर उतरेल? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही येथे केला आहे. चला तर नजर टाकूया, पाकिस्तानच्या टी२० विश्वचषकासाठीच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर
सलामी फलंदाजी
पाकिस्तान संघाकडून डावाची सुरुवात स्वत कर्णधार बाबर आझम करताना दिसू शकतो. त्याच्या जोडीला यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सलामीला उतरू शकतो. या जोडीने इंग्लंड दौऱ्यावरील टी२० मालिकेत सलामीला धमाकेदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्यांची जोडी भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० विश्वचषक सामन्यातही सलामीला उतरू शकते.
मधली फळी
सलामीवीरांनंतर तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद हाफिज फलंदाजीला येऊ शकतो. त्यानंतर २ युवा फलंदाजांना मधल्या फळीत जागा दिली जाऊ शकते. यामध्ये शोएब मकसूद आणि आजम खान यांचा समावेश आहे. हे शिलेदार आपल्या विस्फोटक फलंदाजीने सामन्याचा कायापालट करण्याची क्षमता राखतात. त्यामुळे संघाला मधल्या फळीत मजबूती मिळू शकते.
खालची फळी
आघाडीचे ५ फलंदाज माघारी परतल्यानंतर असिफ अली आणि फिरकी अष्टपैलू इमाद वसीम अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर अंतिम षटकात वेगाने धावा करण्याची जबाबदारी असेल. तसेच इमादला पावरप्लेमध्ये आपल्या गोलंदाजीनेही चांगली कामगिरी करावी लागेल.
गोलंदाजी विभाग
गोलंदाजी विभागात ३ प्रमुख वेगवान गोलंदाजांना जागा मिळू शकते. यामध्ये शाहिन आफ्रिदी, हसन अली आणि हारिस राउफ यांचा समावेश असेल. तर फिरकी गोलंदाजांमध्ये इमादव्यतिरिक्त शादाब खानवरही मोठी जबाबदारी असेल.
भारताविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यासाठी पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद हाफिज, शोएब मकसूद, आजम खान, असिफ अली, इमाद वसीम, शाहिन आफ्रिदी, हसन अली, हारिस राउफ, शादाब खान
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त ७ खेळाडूंनी केलंय टी२०मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व, चक्क २ मुंबईकरांचा आहे यात समावेश
बुडत्याचा पाय खोलात! टी२०चे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराटला बीसीसीआयकडून मिळणार आणखी एक दणका
‘तो’ देवदूतासारखा धावला, नाहीतर आज क्रिकेटर नव्हे पाणेपाणी विकणारा असतो; युवा शिलेदाराचा खुलासा