आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यांना बुधवार (१० नोव्हेंबर) पासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आपला शेवटचा सामना नामिबिया संघाविरुद्ध खेळला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत नामिबिया संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू हाताला काळया रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले होते. काय होते यामागील नेमके कारण? चला जाणून घेऊया.
भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाला या स्पर्धेत विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नाही. त्यामुळे नामिबिया संघाविरुद्ध झालेला सामना हा भारतीय संघासाठी आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेतील शेवटचा सामना ठरला.
तसेच शनिवारी (५ नोव्हेंबर) अर्जुन पुरस्कार विजेते आणि प्रशिक्षक तारक सिन्हा यांचे निधन झाले होते. ज्यामुळे भारतीय संघातील खेळाडू हाताला काळया रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले होते.तारक सिन्हा यांनी भारतीय संघाला १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिले होते. ज्यामध्ये रिषभ पंतचा देखील समावेश आहे. तसेच हा सामना रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. तर विराट कोहलीसाठी देखील टी२० संघाचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. आता टी -२० संघाचे सूत्र रोहित शर्माच्या हाती सोपवले जाणार आहे. तर संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांना देण्यात आले आहे.
तसेच भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नामिबिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेविड विसेने सर्वाधिक २६ तर स्टीफन बार्डने २१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर नामिबिया संघाला २० षटक अखेर ८ बाद १३२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ५४ धावांचे योगदान दिले. हा सामना भारतीय संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.