१९९९ चा क्रिकेट विश्वचषक म्हणजे क्रिकेटचा चमचमता सोहळा होता. १९९२ मध्ये प्रथम रंगीत कपड्यात विश्वचषकाचे सामने खेळले गेले पण, १९९९ ला क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये १७ वर्षानंतर विश्वचषकाचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह वॉच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली. ऑस्ट्रेलियाच्या या दिमाखदार विजयाला अनेक बाजू होत्या. सर्व खेळाडूंनी आपले १००% योगदान दिले होते. मात्र, चातुर्याने केलेली संघनिवड सर्वाधिक फायदेशीर ठरली. कसोटीत वेगवान गोलंदाजी ही ऑस्ट्रेलियाची, ताकद असली तरी, इंग्लंडमधील परिस्थितीसाठी दर्जेदार अष्टपैलू ऑस्ट्रेलियन संघात होते आणि त्याच अष्टपैलू खेळाडूंनी विश्वविजयात मोलाची भूमिका बजावली. त्या अष्टपैलू खेळाडूंपैकी, असा एक खेळाडू होता ज्याने संघाला एक परिपूर्ण खेळाडू व मानसिकदृष्टया कणखर, अनुभवी इसम म्हणून स्थैर्य दिले. तो खेळाडू होता टॉम मूडी.
मूडी यांच्या विश्वचषक संघात समावेशाची कहाणी काहीशी रोचक होती. स्थानिक शेफील्ड शील्ड स्पर्धेत खेळताना, मूडी यांना दुखापत झाली होती. त्यांना डॉक्टरांनी एका ठराविक काळापर्यंत विश्रांती घेण्यास सांगितले होते. अशातच, विश्वचषकासाठी १९ जणांच्या संभावित ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाली. त्याच दरम्यान, मूडी हे मैदानात परतले. स्थानिक स्पर्धांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला वाटले की, मूडी विश्वचषक संघात हवे. मात्र, नियमानुसार ते संघात निवडले जाऊ शकत नव्हते. कारण, संभावित खेळाडूंच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यांना संघात घेण्यासाठी, आयसीसीच्या विशेष परवानगीची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलिया क्रिकेट वेडा देश असला तरी, इतर खेळाडूंना डावलून, भूतकाळातील कामगिरीच्या आधारावर कोणाला संधी दिली जात नाही. पण, मूडी यांचे प्रकरण वेगळे होते.
१९८७ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे सदस्य असले तरी, त्यांना अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ऑस्ट्रेलिया कसोटी संघात नियमितपणे खेळायला न मिळाल्याने, त्यांनी आपला मोर्चा काउंटी क्रिकेटकडे वळवला होता. काउंटीमध्ये त्यांची कामगिरी, अतिशय दिमाखदार होती. फक्त खेळच नाहीतर मैदानावरील सभ्य वागणुकीने त्यांनी इंग्लिश प्रेक्षकांची मने जिंकलेली. एखाद्या स्थानिक खेळाडूप्रमाणे त्यांना तेथे मान मिळत. आजही इंग्लिश प्रेक्षक, मूडी यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वात सभ्य क्रिकेटपटू म्हणून नावजतात.
मूडी यांचा जन्म २ ऑक्टोबर १९६५ रोजी अॅडलेड येथे झाला होता. जेव्हा ते १३ वर्षांचे होता तेव्हा त्याचे क्रिकेटपटू असलेले वडील, पर्थमधील गिल्डफोर्ड ग्रामर स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून रूजू झाले आणि टॉम पर्थला स्थायिक झाले. मुख्याध्यापक म्हणून वडील असणे हे मुलासाठी फायदेशीर ठरते परंतु, अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये त्यांचे मन रमत. नैसर्गिकरित्या लाभलेली शारीरिक क्षमता व उंची यामुळे तो इतर मुलांपेक्षा काहीसा वरचढ ठरत.
टॉम यांचे दोन मोठे भाऊ देखील उत्तम क्रिकेटपटू होते. त्यामुळे टॉम यांना अधिक मेहनत करावी लागत. ही अधिकची केलेली मेहनतच, त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. वयाच्या अठराव्या वर्षी ते हेटन लायन्स या इंग्लंडमधील संघात निवडले गेले. डरहॅम कोस्ट लीग या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने, व्यवसायिक क्रिकेटपटू बनण्याचे त्यांनी पक्के केले.
१९८५-८६ च्या हंगामात, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून प्रथमश्रेणी पदार्पण केल्यानंतर, अवघ्या दोन वर्षात ते ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात सामील झाले. पहिले तीन सामने खेळल्यानंतर, किरकोळ दुखापतीमुळे त्यांना इतर सामन्यातून बाहेर बसावे लागले.
कारकीर्दीच्या सुरुवातीची काही वर्ष ते पूर्णवेळ फलंदाज या नात्याने खेळत. परंतु १९८९ च्या अॅशेस दौर्यासाठी जेव्हा ते इंग्लंडला आले तेव्हा, पुन्हा त्यांना राखीव म्हणून बराच वेळ बाकावर बसावे लागले. याच वेळी त्यांनी, मध्यमगती गोलंदाज करण्यास सुरुवात केली. ज्याचा फायदा त्यांना आगामी काळात झाला. त्यांनी गोलंदाजी करायला सुरुवात केली मात्र एका कसोटी गोलंदाजासाठी आवश्यक असा, वेग त्यांच्याकडे नसल्याने, त्यांनी नव्याने फलंदाजीकडे लक्ष देणे सुरू केले. न्यूझीलंडविरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या कसोटीत ६१ व श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेनच्या मैदानात १०६ धावांच्या खेळ्या त्यांच्या आत्मविश्वासासाठी आवश्यक होत्या. कसोटी संघातील जागेसाठी त्यांना अनेक खेळाडूंची स्पर्धा करावी लागत होती. दोन वर्षांनंतर त्यांनी पर्थमध्ये भारताविरुद्ध आणखी शतक केले आणि १९९२-९३ च्या श्रीलंका दौर्यावर देखील त्यांच्या बॅटमधून धावा निघाल्या . ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन प्रशिक्षक बॉब सिंपसन यांनी मूडी यांना सलामीवीराची जबाबदारी दिली. या नव्या भूमिकेत त्यांना, चांगली कामगिरी करता आली नाही व ते सहा डावात अवघ्या ७१ धावा करू शकले व त्यांच्या कसोटी कारकिर्दीची अखेर देखील तेथे झाली.
कसोटी कारकीर्द संपली तरी, ते ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचे नियमित सदस्य होते. १९९६ च्या विश्वचषक संघात देखील त्यांचा समावेश होता. मधल्या काळात ते इंग्लंडमध्ये वार्विकशायर व वॉरसेस्टरशायर या काउंटी संघांसाठी खेळले. १९९८ ची शेफील्ड शील्ड स्पर्धा त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली. मूडी यांना कप्तानी करायची मोजकीच संधी मिळाली, मात्र त्यात ते पूर्णपणे प्रभावशाली दिसले.
१९९९ विश्वचषकातील, ११७ धावा व ७ बळी हे त्यांचे आकडे पाहून आश्चर्य वाटणार नाही, मात्र संघातील त्यांची उपस्थिती व भूमिका कायमच एका वरिष्ठ खेळाडूची राहिली व त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला.
१९९९ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००५ मध्ये, श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक झाल्यावर त्यांनी २००७ विश्वचषकात श्रीलंकेला अंतिम फेरीपर्यंत नेले. ऑस्ट्रेलियातील स्थानिक संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यानंतर, २०१२ मध्ये आयपीएलमधील, सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक पद त्यांच्याकडे देण्यात आले. हैदराबादने २०१६ आयपीएल विजेतेपद मूडी यांच्याच मार्गदर्शनाखाली जिंकले. प्रशिक्षण देत असले तरी, मूडी हे अर्धवेळ समालोचक म्हणून देखील काम करतात.
क्रिकेट कारकीर्द दैदिप्यमान राहिली नसली तरी, एक दर्जेदार प्रशिक्षक म्हणून मूडी सर्व क्रिकेटजगताला परिचित आहेत.
वाचा- गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार