जेव्हा आपण इतिहासात डोकावून ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या महान खेळ्यांचा विचार करतो तेव्हा, एकाहून एक सरस खेळ्यांनी ही यादी लांबलचक होत जाते. ब्रॅडमन यांची ३३४, त्यानंतर, त्याच धावसंख्याची बरोबरी करणारी मार्क टेलर यांची नाबाद खेळी, हेडनचा वैयक्तिक ३८० धावांचा डोंगर, मायकेल क्लार्कची ३२९ धावांची सर्वांगसुंदर खेळी तर जेसन गिलेस्पीने नाईट वॉचमन म्हणून आल्यावर केलेले द्विशतक असो, या सर्व खेळ्या इतिहासात नोंद घेण्यासारख्या आहेत.
परंतु, जेव्हा आपण फलंदाजाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेची चाचणी घेणाऱ्या खेळ्यांकडे नजर टाकतो तेव्हा फक्त एकच ऑस्ट्रेलियन खेळाडू डोळ्यासमोर येतो. तो म्हणजे डीन जोन्स.
सप्टेंबर १९८६ मध्ये चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे झालेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी फक्त दोन कारणांसाठी लक्षात राहते. एक म्हणजे डीन जोन्स यांची २१० धावांची धैर्यपूर्ण खेळी व दुसरे म्हणजे ही तीच कसोटी होती, जी क्रिकेटच्या इतिहासात टाय होणारी अवघी दुसरी कसोटी होती.
भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियासाठी ती कसोटी अनेक कारणांमुळे महत्त्वपूर्ण होती. बॉब सिम्पसन हे राष्ट्रीय संघासह प्रशिक्षक म्हणून प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या बाहेर आले होते. सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलिया संघात बराच बदल घडवून आणला होता. पुढील वर्षी भारतातच होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन संघाची बांधणी सुरू होती. सिम्पसन यांच्यामुळे ऑस्ट्रेलियन संघात सकारात्मक वातावरण तयार झालेले. तर दुसरीकडे, दोन वर्षाच्या कालावधीनंतर, डीन जोन्स राष्ट्रीय संघात पुनरागमन करत होते. त्याहून महत्त्वपूर्ण म्हणजे, त्यांना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची होती. या मालिकेत चांगले प्रदर्शन करून ऑस्ट्रेलिया संघात स्थाननिश्चित करणे हे जोन्स यांचे लक्ष होते.
जोन्स यांना पुन्हा संघात सामील करून घेणे हा ऍलन बॉर्डर यांनी घेतलेला धाडसी निर्णय होता. मद्रास कसोटी जोन्स यांची अवघी तिसरी कसोटी ठरणार होती. आधीच्या दोन कसोटीत जोन्स यांनी ४८,५,१ व ११ धावा काढल्या होत्या. बॉर्डर यांच्यासह ग्रेग रिची, ग्रेग मॅथ्यूज व स्टीव वॉ हे सारे नवखे खेळाडू मधल्या फळीत होते. बॉर्डर यांच्यामते, या सर्वांमध्ये जोन्स हे महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला सर्वात्तम पर्याय होते.
सप्टेंबर महिन्यात मद्रासमधील उकाडा आपल्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचत. सामान्य भारतीय या उकाड्यामुळे हैराण होत, तिथे विदेशींची काय गणती ? अशा वातावरणात ऑस्ट्रेलियाला पाच दिवसांचा कसोटी सामना खेळायचा होता.
१८ सप्टेंबर रोजी ऍलन बॉर्डर व कपिल देव नाणेफेकीसाठी मैदानात उतरले. बॉर्डर यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. डेव्हिड बून व ज्योफ मार्श यांनी ४८ धावांची सलामी दिली. पहिल्याच दिवशी बून यांनी १२२ धावांची अप्रतिम खेळी साकारली. दिवसाचा खेळ संपायला काही षटके बाकी असताना, बून बाद झाले. त्यांनी जोन्स यांच्यासमवेत दुसऱ्या गड्यासाठी १५८ धावांची भागीदारी रचली होती. पहिल्या दिवसाअखेर जोन्स ५६ तर नाईट वॉचमन रे ब्राईट एका धावेवर नाबाद होते.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील कहाणी एकदम वेगळी होती. आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या, ब्राईट यांनी सकाळच्या उन्हात व प्रचंड उकाड्यात भारतीय गोलंदाजांचा यशस्वी सामना करत ३० धावा काढल्या. चार वर्षापासून ऑस्ट्रेलियासाठी खेळत असलेल्या ब्राईट यांनी आपल्या खेळीने जणूकाही हेच दर्शवून दिले की, “होय मलाही फलंदाजी करता येते.”
ब्राईट बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार बॉर्डर यांनी जोन्स यांच्यासमवेत मोठी भागीदारी करण्याचा मनसुबा दाखवत, भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.
जोन्स धावांची रास लावत होते मात्र त्यांना उन्हाचा त्रास होत होता. आधी हाताला, नंतर पायाला, त्यानंतर दुसऱ्या पायाला त्यांना पेटके आले. रवी शास्त्री यांच्या विरुद्ध स्विप मारताना त्यांच्या पाठीत तीव्र वेदना झाल्या. चेन्नईच्या ४० अंश सेल्सिअस तापमानात व ८० टक्क्यांच्या पुढे गेलेला आर्द्रतेत फलंदाजी करणे म्हणजे, अंगावर लोकरीचे कपडे घालून उन्हात उभे राहण्यासारखे होते.
अनेक वर्षांनंतर एका मुलाखतीत आपल्या खेळीविषयी सांगताना जोन्स म्हणतात,
“मी दुसरे शतक अवघ्या ६६ चेंडूत केले होते कारण, मी पळूच शकत नव्हतो. शरीरातील सर्व त्राण निघून गेला होता. मी चांगल्या चेंडूवर बचाव व खराब चेंडूवर आक्रमण हे धोरण अवलंबिले होते. १७० धावसंख्येचा आसपास मी माझ्या शरीरावरील नियंत्रण गमावले होते. तुम्हाला खोटे वाटेल पण मी, पॅन्टमध्ये लघवी केली होती. मात्र, मला ही गोष्ट जाणवतच नव्हती. मी बॉर्डर यांना सांगितले की, मी पुढे खेळू शकणार नाही. मला उलटी होतेय. मात्र, बॉर्डर यांना वाटले की, ही साधी अन्नाची विषबाधा किंवा थोडासा उष्माघाताचा त्रास असेल. त्यांनी मला तात्पुरता दिलासा दिला.”
पुढे, काही षटकांनंतरच, जोन्स यांनी आपले पहिलेवहिले द्विशतक पूर्ण केले. भारतात येऊन कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाने झळकलेले ते पहिले द्विशतक होते.
त्यावेळचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक बॉब सिम्पसन सांगतात,
“त्या खेळीदरम्यान, डिनो जेव्हा-जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये येत तेव्हा तेव्हा त्याच्या सेवेसाठी आम्ही काही खेळाडू नियुक्त केले होते. जसे की, कोणी त्याचे हेल्मेट काढत, कोणी ग्लोव्हज काढत तर कोणी त्याचे पॅड सोडत. एखाद्या लहान बाळाप्रमाणे, कपडे काढून त्याला आइस-बाथ दिला जात व पुन्हा नव्याने कपडे घालून, पॅड बांधून फलंदाजीला पाठवले जात.”
२१० धावांची धैर्ययुक्त खेळी करून जेव्हा जोन्स बाद झाले तेव्हा, ड्रेसिंग रूममध्ये येऊन कोसळले. दुपारी एक वाजता त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले व सलाईन लावली गेली. सुदैवाने ते लवकर बरे झाले. पुढे दुसर्या डावात त्यांनी फलंदाजी देखील केली. तो सामना नाट्यमयरित्या टाय झाला. डीन जोन्स यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याला आजही क्रिकेटप्रेमी मनापासुन सलाम ठोकतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा- श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….