---Advertisement---

आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालवणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…

---Advertisement---

क्रिकेटविश्वात सर्वोत्तम वेगवान गोलंदाज निर्माण करणारा प्रमुख देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर ‘ऑस्ट्रेलिया’ म्हणून क्रिकेटप्रेमी लगेच सांगतील. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकाहून एक सरस वेगवान गोलंदाजांनी आपल्या तुफानी वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या काळजात धडकी भरवली आहे. चार्ली टर्नर, डेनिस लिली, जेफ थॉम्पसन यांच्यापासून सुरू झालेली वेगवान गोलंदाजीची परंपरा ग्लेन मॅकग्रा, क्रेग मॅकडरमॉट, जेसन गिलेस्पी, ब्रेट ली, शॉन टेट यांनी जोपासली. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड हे अस्सल वेगवान गोलंदाज जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. खऱ्या अर्थाने वेगवान म्हणता येईल असा, एक गोलंदाज २००५-२०१५ अशी दहा वर्ष ऑस्ट्रेलिया साठी खेळला. त्याने आपल्या गोलंदाजीने अक्षरशः दहशत माजवली होती. हा पक्का ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज म्हणजे मिचेल जॉन्सन.

टेनिसपटू ते क्रिकेटपटू

जॉन्सनचा जन्म क्वीन्सलँडमधील टाऊनस्विले येथे झाला. पीट सॅम्प्रसचा खेळ पाहिल्यानंतर लहानपणी त्याने टेनिसपटू होण्याचे ठरवले होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्याला टेनिस कारकिर्दी पुढे नेण्यासाठी ब्रिस्बेनला जाण्याची संधी मिळाली. पण, काही कारणाने त्याने ती त्याने नाकारली. जॉन्सनने १७ व्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू होण्याचे बालपणीचे स्वप्न सोडून दिले आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली.

डेनिस लिली यांचे मार्गदर्शन

वयाच्या सतराव्या वर्षी जॉन्सन ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला. त्याने ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. जॉन्सनला पहिल्यांदा गोलंदाजी करताना पाहून लिली म्हणाले, “हा एकमेवाद्वितीय गोलंदाज ठरणार आहे.”

लिली यांनी आपले संघसहकारी राहिलेले रॉडनी मार्श यांच्याशी संपर्क साधला. मार्श त्यावेळी, युवा ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीचे संचालक होते. त्यांनी जॉन्सनला अकादमीत प्रवेश मिळवून देण्यास सांगितले.

एकोणिस वर्षाखालील संघात खेळला भविष्यातील संघ सहकार्‍यांसोबत

ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळाल्यानंतर, जॉन्सनने लवकरच ऑस्ट्रेलियाच्या एकोणीस वर्षाखालील संघात स्थान मिळवले. २००० मध्ये झालेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. त्या संघात खेळलेले शेन वॉटसन, मायकल क्लार्क, नॅथन हॅरीत्झ, शॉन मार्श, एड कोवान, अँड्रू मॅकडोनाल्ड हे पुढे ऑस्ट्रेलियन संघात त्याचे संघसहकारी झाले.

पहावे लागले वाईट दिवस

एकोणीस वर्षाखालील संघाकडून चांगली कामगिरी केल्यानंतर, त्याला क्वीनलँडकडून प्रथमश्रेणी पदार्पण करण्याची संधी मिळाली. याचदरम्यान, तो दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर झाला. त्याला क्लीनलँडने देखील करारमुक्त केले. आर्थिक तंगीमुळे त्याने प्लंबिंग व्हॅन चालवण्याचे काम देखील केले. सोबतच, काही स्थानिक संघांसाठी तो ब्रिस्बेनमध्ये फलंदाज म्हणून खेळायचा.

आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि एकदिवसीय कारकिर्दीला झोकात सुरुवात

दुखापतीतून सावरल्यानंतर, काही प्रथमश्रेणी सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. २००५ च्या पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ संघात त्याची निवड झाली. त्या दौऱ्यात सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डिसेंबर २००५ मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आपल्या सातव्याच सामन्यात त्याने भारताविरुद्ध ११ धावा देऊन ४ भारतीय फलंदाज बाद करत, आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. जॉन्सनने आपल्या गोलंदाजीच्या बळावर २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी संघात जागा पटकावली.

मॅकग्राच्या हातून मिळाली बॅगी ग्रीन

एकदिवसीय क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे, जॉन्सनला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात जागा मिळाली. २००७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने आपले कसोटी पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाचा ३९८ वा कसोटी खेळाडू होण्याचा मान त्याला मिळाला. ऑस्ट्रेलियात प्रतिष्ठेची समजली जाणारी ‘बॅगी ग्रीन’ त्याला त्यावेळचा सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याच्या हस्ते मिळाली होती. जॉन्सनने आपला पहिला कसोटी सामना आपले घरचे मैदान असलेल्या, ब्रिस्बेन येथे खेळला.

२००९ ठरले ‘गोल्डन इयर’

जॉन्सनसाठी २००९ हे वर्ष अप्रतिम गेले. यावर्षी त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा राहिला. गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारी तो द्वितीय स्थानी होता. जॉन्सनने २००९ चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक बळी मिळवले. याच वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने अष्टपैलू कामगिरी केली. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने १६ बळींसह २५० धावा काढल्या. जॅक कॅलिस आणि ग्रॅमी स्मिथ यांना आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने जायबंदी केले होते. जॉन्सनला आयसीसीच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार याचवर्षी मिळाला.

‘बार्मी आर्मी’ सोबतचा वाद

जॉन्सन २००९ पासून ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला होता. मॅकग्राची निवृत्ती व ब्रेट लीच्या सततच्या दुखापतीमुळे, त्याला मुख्य गोलंदाजची भूमिका बजावावी लागत. २०११ नंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये दाखल झालेल्या वेगवान गोलंदाजांच्या फळीचे नेतृत्व जॉन्सनने केले. जॉन्सन ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी गोलंदाज बनला होता तरी, त्याला कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे, इंग्लिश प्रेक्षकांचा समूह असलेल्या ‘बार्मी आर्मी’ ने त्याला चिडवण्यासाठी एक गाणे बनवले होते. ‘बार्बी आर्मी’ चा हा प्रताप इंग्लिश फलंदाजांना २००३ ऍशेसमध्ये निस्तरावा लागला.

२०१३-२०१४ ऍशेस फक्त जॉन्सनसाठी ओळखली जाते

सन २०१३-१४ ची ऍशेस ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार होती. या मालिकेपूर्वी, जॉन्सनने आपल्या मिश्यांना वेगळे वळण दिले होते. ओठांवरून खालच्या बाजूलाला आलेल्या, या मिशीतील अवताराने इंग्लिश फलंदाजांची भंबेरी उडवली. मालिकेतील पाचही सामने खेळताना, जॉन्सनने तब्बल ३७ बळी मिळवले. त्या मालिकेत जॉन्सनने नियमितपणे १५० किमी प्रतितास या वेगाने चेंडू टाकले. इंग्लंडचे फलंदाज धावा करण्यापेक्षा, जॉन्सनच्या चेंडूने दुखापत होऊ नये म्हणून सावधगिरीने खेळत. जॉन्सनच्या गोलंदाजीची इतकी दहशत इंग्लिश फलंदाजांमध्ये बसली होती की, संपूर्ण मालिकेत इंग्लंडकडून अवघे एक शतक ठोकले गेले. ऑस्ट्रेलियाने मालिकेत ५-० अशा फरकाने विजय मिळवत, ऍशेस आपल्याकडे घेतली. जॉन्सनला त्याच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. आजही २०१३-२०१४ ऍशेस जॉन्सनच्या कामगिरीसाठी ओळखली जाते.

विश्वचषक विजेता

जॉन्सनच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण तेव्हा आला; जेव्हा ऑस्ट्रेलियाने २०१५ क्रिकेट विश्वचषक जिंकला. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान ताफ्याचे नेतृत्व जॉन्सनने केले होते. मिचेल स्टार्कनंतर सर्वाधिक बळी घेणारा तो ऑस्ट्रेलियन गोलंदाज होता. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकल्यानंतर मायकल क्लार्क व ब्रॅड हॅडिन यांच्यासोबत जॉन्सनने देखील एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच वर्षाखेरीस, न्यूझीलंड विरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.

जॉन्सनने आपल्या कारकीर्दीत ७३ कसोटी खेळताना ३१३ बळी मिळवले. सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी विराजमान आहे. एकदिवसीय व टी२० क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावे २३९ आणि ३८ बळी जमा आहेत.

आयपीएल चॅम्पियन

जॉन्सनला व्यवसायिक टी२० लीगमध्ये चांगले यश मिळाले. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स व किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचे प्रतिनिधित्व केले. यापैकी २०१३ व २०१७ यावर्षी तो मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला. लसिथ मलिंगा व जसप्रीत बुमराह यांच्यासोबतीने त्याने मुंबईसाठी अनेक सामन्यात दिमाखदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये तो पर्थ स्कॉर्चर्स संघाला देखील त्याने विजेतेपद मिळवून दिले.

आपल्या तुफानी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा जॉन्सन, वेळप्रसंगी चांगली फलंदाजी देखील करायचा. जॉन्सनचे आगगोळ्याप्रमाणे येणारे चेंडू, प्रतिस्पर्धी फलंदाजांना घाबरवून टाकण्यास पुरेसे होते. चेंडू टाकल्यानंतर, फलंदाजाच्या नजरेला नजर भिडवून अनोख्या पद्धतीने स्लेजिंग करायची त्याची शैली क्रिकेटप्रेमी विसरले नाहीत.

वाचा- एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---