भारतीय क्रिकेट वर्तुळ जितके मोठे आहे तितकेच मोठे ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश क्रिकेट वर्तुळदेखील आहे. या तीनही देशांचे देशांतर्गत क्रिकेट संघटन इतके मजबूत आहे की, हे देश आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सातत्याने दर्जेदार क्रिकेटपटू देत असतात. मात्र, या मोठ्या क्रिकेट संस्कृतीचा एक तोटादेखील आहे तो म्हणजे, यामुळे काही शानदार खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळायची संधी मिळत नाही किंवा एकदम मर्यादित संधी मिळाते. भारतीय क्रिकेटमध्ये अमोल मुजुमदारसारखा खेळाडू अकरा हजार धावा बनवून देखील राष्ट्रीय संघात जागा मिळवू शकला नाही. सदगोपन रमेश हे सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही, एका मालिकेतील अपयशानंतर पुन्हा भारतासाठी खेळू शकले नाहीत. अशाच, प्रकारचा एक क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियात देखील झाला. जो ऑस्ट्रेलियासाठी फक्त एक कसोटी व ५४ एकदिवसीय सामन्यात खेळू शकला. तो खेळाडू म्हणजे ‘स्टुअर्ट लॉ’.
आश्वासक प्रथमश्रेणी आकडेवारी
क्वींसलँड या ऑस्ट्रेलियातील प्रथमश्रेणी संघासाठी १९८८-१९८९ मध्ये प्रथमश्रेणी पदार्पण करत लॉ यांनी वरिष्ठ स्तरावरील क्रिकेटचा शुभारंभ केला. तत्पूर्वी, क्वींसलँडच्याच युवा संघासाठी त्यांनी दोन हंगाम चांगलेच गाजवले होते. आपल्या दुसऱ्याच प्रथमश्रेणी सामन्यात १७९ धावांची आश्वासक खेळी करून त्यांनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले. १९९०-९१ च्या ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शील्ड या मानाच्या स्पर्धेत ७५ पेक्षा जास्तच्या सरासरीने १,२०० धावा त्यांनी काढल्या. प्रथमश्रेणी सोबतच एकदिवसीय क्रिकेटला साजेसा आक्रमक खेळ ते करत असल्याने, त्यांच्या नावाचा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघासाठी विचार होऊ लागला.
‘वन टेस्ट वंडर’
अखेरीस, वयाच्या २६ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात त्यांची निवड झाली. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाचे त्यांनी नेतृत्व देखील केले. एकदिवसीय संघात जागा पक्की झाली असली तरी, कसोटी पदार्पण त्यांना करता येत नव्हते. एकदिवसीय क्रिकेटच्या चांगल्या खेळाडूचा शिक्का त्यांच्यावर बसला होता. १९९५ च्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टीव वॉ अखेरच्या क्षणी दुखापतग्रस्त झाल्याने, लॉ यांना आपल्या डोक्यावर ‘बॅगी ग्रीन’ चढवायची संधी मिळाली. या सामन्यात त्यांनी ५४ धावांची खेळी केली. वॉ यांनी पुढील सामन्यात पुनरागमन केल्याने, लॉ यांना पुन्हा बाकावर बसवण्यात आले. हीच त्यांची पहिली आणि अखेरची कसोटी ठरली.
१९९६ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याचा हिरो
कसोटी क्रिकेटमध्ये एकच संधी मिळाली तरी, एकदिवसीय संघासाठी त्यांनी आपले भरपूर योगदान दिले. सहा वर्षाच्या काळात त्यांनी ५३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. ज्यात १९९६ विश्वचषकाचा देखील समावेश होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या उपांत्य सामन्यात, ऑस्ट्रेलियाचे अवस्था ४ बाद १४ अशी असताना इयान बिशप्स, कर्टनी वॉल्श, कर्टली अंब्रोज यासारख्या गोलंदाजांचा सामना करत त्यांनी ७२ धावांची खेळी करून, ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. आपल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी १,२३७ धावा केल्या. झिम्बाब्वे विरुद्ध सलामीला उतरत, केलेले एकमेव आंतरराष्ट्रीय शतक त्यांच्या नावे आहे.
देशांतर्गत क्रिकेटचा ‘दादा’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादीत संधी मिळाली असली तरी, देशांतर्गत क्रिकेट व काउंटी क्रिकेट त्यांनी भरपूर गाजवले. क्वींसलँडने लॉ यांच्या नेतृत्वात पाच शेफील्ड शील्ड विजेतेपदे आणि दोन एकदिवसीय स्पर्धांची विजेतेपदे जिंकली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील, देशांतर्गत क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी त्यांची ख्याती आहे. इसेक्स, लँकेशायर व डर्बीशायर या तीन काउंटी क्लबसाठी खेळत त्यांनी धावांचे इमले रचले. यात त्यांनी इसेक्सला दोन वेळा वनडे चॅम्पियनशिप जिंकून देण्यात हातभार लावला.
यशस्वी प्रशिक्षक
स्टुअर्ट लॉ यांनी २००९ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीलाच त्यांना श्रीलंकेचा राष्ट्रीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी मिळाली. २०११ मध्ये बांगलादेशने त्यांना राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले. पाकिस्तान संघानेही त्यांना प्रशिक्षक बनवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, शेवटी मिकी आर्थर यांनी ते पद पटकावले.२०१७ ते २०१९ या काळात ते वेस्ट इंडिजच्या संघासोबत जोडले गेले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादीत संधी मिळूनही, त्यामध्ये छाप पाडण्यात ते यशस्वी ठरले. लॉ ज्यावेळी ऑस्ट्रेलियन संघात खेळत होते, त्याचवेळी मायकल बेवन हे ऑस्ट्रेलियासाठी फिनिशरची भूमिका निभावत. कदाचित, याच कारणामुळे लॉ यांना अपेक्षित आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले नाहीत. तरीही, आधी देशांतर्गत क्रिकेट व निवृत्तीनंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
ट्रेंडिंग लेख-
त्याने खुद्द धोनीला म्हणायला भाग पाडले की, ‘तो माझ्यासाठी गोलंदाजीतला सचिन आहे’