कोणत्याही क्रिकेटप्रेमीला जर विचारले की, श्रीलंकेचे सर्वोत्तम पाच फलंदाज कोण ? तर, बहुतांश लोकांचे उत्तर असेल माहेला जयवर्धने, कुमार संगकारा, अर्जुन रणतुंगा, सनथ जयसूर्या व अरविंद डिसिल्वा. परंतु, श्रीलंकन क्रिकेटमध्ये असाही एक फलंदाज होऊन गेला, ज्याची आकडेवारी आणि मैदानावरील उपस्थिती या महान फलंदाजां इतकीच प्रभावी होती. श्रीलंकन क्रिकेटची सतरा वर्षे सेवा करणारा हा क्रिकेटपटू म्हणजे तिलकरत्ने दिलशान.
दिलशानने किशोरवयातच धर्मांतर केलेले
श्रीलंकेतील जाफना प्रदेशातील कालुतारा याठिकाणी मुस्लिम परिवारात दिलशानचा जन्म झाला. कालुतारा विद्यालयात शिकत असताना, त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे क्रिकेट खेळणे घरच्यांना पसंद नव्हते. अशातच, त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्यानंतरही त्याचे क्रिकेटकडे दुर्लक्ष झाले नाही. कालुतारा टाऊन क्लब व सिंघा स्पोर्ट्स क्लब यांच्यासाठी नियमितपणे तो चांगले प्रदर्शन करत होता. देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला लवकरच मिळाले होते.
चांगली सुरुवात करून देखील, मिळाली नाही नियमित संधी
श्रीलंकन संघ जेव्हा १९९९ मध्ये झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला, तेव्हा दिलशानने वनडे व कसोटी अशा क्रिकेटचा दोन्ही प्रकारात पदार्पण केले. वनडेमध्ये त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. मात्र, दुसऱ्याच कसोटीत त्याने १६३ धावांची खेळी करत, सर्वांची मने जिंकली. यानंतर मात्र, त्याला श्रीलंकेच्या संघात आपली जागा नियमित करता आली नाही. तो नेहमीच संघाच्या आत-बाहेर होत राहिला. त्यावेळच्या श्रीलंकन संघात अनेक उत्तम खेळाडू असल्याने त्याची जागा बनत नव्हती.
दिलशानला खरी ओळख मिळाली ती, २००६-२००७ पासून. श्रीलंकेचे बरेचसे वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यामुळे, तो संघाचा सलामीवीर बनला. २००९ भारत दौऱ्यावर राजकोट वनडेत, भारताने ठेवलेल्या ४१४ धावांचा पाठलाग करताना, त्याने श्रीलंकेसाठी धमाकेदार फलंदाजी केली. जोपर्यंत दिलशान फलंदाजी करत होता, तोपर्यंत श्रीलंका आरामात सामना जिंकू शकेल असे वाटत होते. पण, हरभजन सिंहने त्याला बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. दिलशानच्या १६० धावांच्या सर्वांगसुंदर खेळी नंतरही, श्रीलंकेला तो सामना अवघ्या ३ धावांनी गमवावा लागला. २००९ टी२० विश्वचषकात तो सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता.
दिलशानचे व्हर्जन २.०
कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत खेळणारा दिलशान, जेव्हापासून सलामीला येऊ लागला, तेव्हापासून त्याच्या खेळात कमालीचा बदल झाला. २००७ पासून सलामीवीर बनलेला दिलशान, निवृत्तीपर्यत श्रीलंकेचा सर्वोत्तम सलामीवीर राहिला. २००९ आयपीएलमध्ये त्याने, मारलेला ‘दिलस्कूप’ अजूनही युवा क्रिकेटपटू मारण्याचा प्रयत्न करतात. भारतीय उपखंडात झालेल्या २०११ विश्र्वचषकात तो ५०० धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. श्रीलंकेला विश्र्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला होता.
श्रीलंकेचा २०११ विश्वचषकात पराभव झाल्यानंतर, कुमार संगकाराने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याचा उत्तराधिकारी म्हणून दिलशानची निवड करण्यात आली. दिलशान चांगला कर्णधार होऊ शकत नाही, असा सूर काहींनी आळवला होता. लॉर्ड्सच्या मैदानावर १९३ धावांची खेळी करत त्याने, टीकाकारांची तोंडे बंद केली. द. आफ्रिकेत कसोटी विजय मिळवणारा तो पहिला श्रीलंकन कर्णधार होता. मात्र, इंग्लंड, पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलगपणे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागल्याने, त्याला कर्णधार पदावरून पायउतार करण्यात आले. दिलशानला अनुभवी खेळाडूंनी योग्य साथ न दिल्याने, दिलशान कर्णधार म्हणून यशस्वी होऊ शकला नाही, असे काही क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.
दिलशानने २०१३ मध्ये कसोटीमधून निवृत्ती घेत, मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे आपले पूर्ण लक्ष केंद्रीत केले. २०१४ मध्ये, बांगलादेशात आयोजित टी२० विश्वचषकात श्रीलंकेने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत देखील दिलशानने सलामीवीराची भूमिका समर्थपणे सांभाळली. मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच धडाकेबाज कामगिरी करणारा दिलशान २०१५ विश्वचषकात सुद्धाचमकला. त्याने या स्पर्धेत दोन शतके झळकावली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात, मिचेल जॉन्सनच्या एकाच षटकात सलग सहा चौकार मारण्याचा, पराक्रम दिलशानने केला आहे.
… आणि त्याने निवृत्ती जाहीर केली
विश्र्वचषकात श्रीलंकेला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्याने जयवर्धने व संगकारा यांनी आपली निवृत्ती जाहीर केले. दिलशानला निवृत्तीविषयी विचारले असता, त्याने उत्तर दिले होते की, श्रीलंकेला एक उत्तम सलामीवीर मिळेपर्यंत मी खेळत राहिल. २०१६ च्या इंग्लंड दौऱ्यातून, त्याने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली. त्याचवेळी प्रसारमाध्यमांनी दिलशान व श्रीलंकन क्रिकेट बोर्डात दिलशानच्या निवृत्तीवरून वाद सुरू असल्याची बातमी दिली. या बातमीनंतर व्यथित होऊन, आपण ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे सांगितले.
दमदार आकडेवारी
दिलशान क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक करणारा पहिला श्रीलंकन खेळाडू होता. त्याने ८७ कसोटीत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना ४०.९८ च्या सरासरीने ५,४८९२ धावा काढल्या. यात १६ शतकांचा समावेश होता. दिलशानची एकदिवसीय आकडेवारी कोणत्याही दिग्गजापेक्षा कमी नाही. ३३० सामन्यात त्याच्या नावे १०,२९० धावा आहेत. २२ शतकांसह १०६ बळी देखील त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळवले आहेत. दिलशानने श्रीलंकेसाठी ८० टी२० सामने खेळत १,८८९ धावा चोपल्या आहेत. आजही, दिलशान श्रीलंकेसाठी सर्वाधिक टी२० धावा काढणारा फलंदाज आहे.
सामाजिक जबाबदारी निभावणारा नागरिक दिलशान
निवृत्तीनंतर, दिवसाने काही चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका देखील साकारली. श्रीलंकेत अमली पदार्थ विकणाऱ्या, लहान मुलांची तस्करी करणाऱ्या तसेच बलात्काऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी, त्याने श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना पत्र लिहिले होते. मुथय्या मुरलीधरनसोबत तो श्रीलंकेत किडनीच्या आजारांविषयी जनजागृती करत असतो.
एकदिवसीय व टी२० क्रिकेटमधील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून, श्रीलंका क्रिकेटला सेवा दिलेला दिलशान आपल्या समकालीन असणाऱ्या महान खेळाडूंच्या छत्रछायेखाली कायमच झाकोळला गेला.
वाचा- गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…