भारत आणि वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू हे समीकरण आजतागायत तितकसं नीट जमलं नाही. कपिल देव यांच्यानंतर अजित आगरकर, इरफान पठाण हीच दोन नावे प्रकर्षाने समोर येतात. सध्या, हार्दिक पांड्या प्रामुख्याने फलंदाज असला तरी मध्यमगती गोलंदाजी करत पाचव्या गोलंदाजाची भूमिका बजावतो. पण, खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाजी करणारा पहिला अष्टपैलू खेळाडू कोण याचे उत्तर जास्त कोणी देऊ शकणार नाही. तर, या प्रश्नाचे उत्तर आहे सय्यद आबिद अली.
९ सप्टेंबर १९४१ मध्ये हैदराबाद संस्थानात आबिद अली यांचा जन्म झाला. त्यावेळी भारत पारतंत्र्यात असल्याने इतर देशी खेळांइतकेच क्रिकेट देखील तितकेच प्रसिद्ध होते. ऑल सेंट हायस्कूल येथे शिकत असताना, १९५६ मध्ये अली यांच्या क्षेत्ररक्षणाने प्रभावित होऊन त्यांची निवड, हैदराबाद संस्थानच्या शालेय संघात करण्यात आली. त्या स्पर्धेत अली यांनी केरळ विरुद्ध ८२ धावांची खेळी तसेच सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार पटकावला. आबिद यांच्या कामगिरीने प्रभावित होत स्टेट बँक ऑफ हैदराबादने त्यांना नोकरीचा प्रस्ताव दिला. स्टेट बँक ऑफ हैदराबादसाठी खेळताना त्यांनी यष्टीरक्षण करण्यास सुरुवात केली.
१९५९ मध्ये हैदराबादसाठी त्यांनी रणजी पदार्पण केले. खरं सांगायचं तर, अली त्यावेळी अत्यंत साधारण खेळाडू होते. १९६२ पर्यंत त्यांनी एकदाही गोलंदाजी केली नव्हती. त्यावेळी त्यांनी एक षटक टाकले आणि तिथून पुढे हैदराबादचे प्रमुख गोलंदाज झाले. अपघाताने गोलंदाज झालेल्या अली यांच्या नावे क्रिकेट सोडताना ३९७ प्रथमश्रेणी बळी होते.
ज्याप्रमाणे, आपल्यामध्ये गोलंदाजी कौशल्य आहे हे त्यांना जसे अपघाताने समजले तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पणदेखील अपघाताने झाले. १९६७ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या संघात त्यांची कोणाच्या ध्यानीमनी नसताना निवड करण्यात आली. ॲडलेड येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची आशा तर शून्यात होती. पण, अचानक मन्सूर अली खान पतौडी यांनी आपण हा सामना खेळणार नसल्याचे जाहीर केले आणि त्यांच्या जागी अली यांची वर्णी लागली. तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका निभावताना त्यांनी, बिल लॉरी व बॉबी सिम्पसन यांच्यासह ५५ धावांत ६ बळी आपल्या नावे केले. मोहम्मद निसार व विवि कुमार यांच्या नंतर पदार्पणात पाच बळी मिळवणारे ते अवघे तिसरे गोलंदाज होते. १९६८ मध्ये कसोटी आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधील अष्टपैलू प्रदर्शनासाठी अली यांना वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. अली वेस्टइंडीजला वेस्टइंडीजमध्ये पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य देखील होते.
अली १९६७ ते १९७५ या दरम्यान भारतीय संघासाठी खेळले. २९ कसोटी सामन्यात १,००० हून अधिक धावा व ४७ बळी त्यांच्या खात्यात जमा झाले. अली यांचे दुर्दैव म्हणजे, ते अशा काळात भारतीय संघाचा भाग होते ज्यावेळी बेदी-प्रसन्ना-चंद्रशेखर ही फिरकीची तिकडी जगभर धुमाकूळ घालत होती. त्यामुळे या गोलंदाजांचे बदली गोलंदाज म्हणून अली यांना संधी मिळत. अली हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू होते. सलामीवीर फलंदाजी, मध्यक्रमात फलंदाजी, गोलंदाजी, कर्णधार सांगेल तिथे क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण करण्यात देखील त्यांचा हातखंडा होता.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अली यांनी हैदराबादच्या युवा संघाला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. १९८० मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले. पुढे मालदीव व युएईच्या राष्ट्रीय संघांना त्यांनी मार्गदर्शन केले. भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांची मुलगी निशाद फातिमा व अली यांचा मुलगा फाकर यांचा विवाह झाल्याने हे भारताचे दोन्ही माजी खेळाडू एकमेकांचे नातलग झाले.
१९९५ मध्ये एक हास्यास्पद घटना घडली. अचानकपणे वृत्तपत्रांमध्ये अली यांचे निधन झाल्याची बातमी आली. त्यावर, अली जाम वैतागले. खरंतर, अली यांचे माजी सहकारी फारूक इंजिनियर ही बातमी वृत्तसंस्थांना दिली होती. त्यावेळी अली यांनी पुढे येऊन, या वृत्ताचे खंडन केले व आपली फक्त बायपास सर्जरी झाली आहे असे सांगितले. २०१४ व २०१९ मध्ये देखील त्यांच्या निधनाची खोटी अफवा पसरवली गेली होती. त्यावेळी त्यांचे नातलग असलेले सय्यद किरमाणी यांनी हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले.
२००८ मध्ये अली यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अली यांचा एकुलता एक मुलगा फाकर यांचे युनायटेड क्रिकेट क्लब, कॅलिफोर्निया येथे खेळत असताना चालू सामन्यात हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.
निरस क्रिकेटच्या जमान्यात आपल्या चपळ क्षेत्ररक्षकाने, वेगवान गोलंदाजी व आक्रमक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणणारे, गावसकर, बेदी, पतौडी यासारख्या दिग्गजांच्या सोबतीने भारतीय क्रिकेटसाठी अमूल्य योगदान देणारे अली आज अमेरिकेत एक विदेशी नागरिक म्हणून जीवन जगत आहेत.
वाचा-
-…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला
-आणि बालपणी ऑटोग्राफ देणाऱ्या क्रिकेटरने पेन नेल्यामुळे ढसाढसा रडलेल्या स्टारची गोष्ट
-तमिळनाडूचा मेकॅनिकल इंजिनीयर आयपीएलमध्ये करोडपती होतो तेव्हा…