१६ एप्रिल २०१९ ला इंग्लंडमध्ये आयोजित २०१९ क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपद विराट कोहलीच्या हाती होते. तर, दिमतीला रोहित शर्मा, एमएस धोनी, शिखर धवन, दिनेश कार्तिक, केएल राहुल या अनुभवी फलंदाजांसोबत जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी असे वेगवान गोलंदाज होते. फिरकीची जबाबदारी चहल व कुलदीप यादव या विश्वासू जोडीवर होती. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, केदार जाधव यांच्या साथीला तामिळनाडूचा युवा विजय शंकर होता.
संघनिवड झाली, अनेक वाहिन्यांवर माजी खेळाडू, समीक्षक संघाचे विश्लेषण करू लागले. निवडसमिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. युवा विजय शंकरविषयी विचारले असता प्रसाद म्हणाले,
“तो थ्रीडी खेळाडू म्हणजेच फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात योगदान देणारा खेळाडू आहे.”
पत्रकार परिषद संपली, चर्चा संपली आणि काही वेळातच एका भारतीय खेळाडूने ट्विट केले,
“विश्वचषक पाहण्यासाठी मी थ्रीडी गॉगल्स मागवले आहेत”
Just Ordered a new set of 3d glasses to watch the world cup 😉😋..
— ATR (@RayuduAmbati) April 16, 2019
आपल्याला जाणीवपूर्वक डावलले गेले म्हणून, त्या खेळाडूने उपहासात्मक टीका करण्यासाठी हे ट्विट केले होते. सरळ सरळ बीसीसीआय व निवडसमिती अध्यक्षांना भिडणारा हा खेळाडू होता अंबाती रायडू.
वयाच्या सातव्या वर्षी छोटा अंबाती आपल्या वडिलांच्या स्कूटरवर बसून पहिल्यांदा विजय पॉल यांच्या अकादमीत दाखल झाला. अंबातीचे दोन्ही प्रशिक्षक विजय पाॅल व अब्दुल अझीम सांगतात,
“संबाशिवा (रायडूचे वडील) हे तासनतास आपल्या मुलाचा खेळ पाहत. मैदानापासून ५० मीटर अंतरावर थांबून ते आपल्या मुलाचा खेळ पाहत. त्यांना कायम वाटे की, आपल्या मुलाने देशासाठी क्रिकेट खेळावे.”
९० च्या उत्तरार्धात, रायडूने हैदराबादच्या वयोगट संघांकडून खेळण्यास सुरुवात केली. हैदराबादसाठी १५ वर्षाखालील संघात चमकदार कामगिरी केल्याने तो भारताच्या १५ वर्षाखालील संघात निवडला गेला. २००० सालच्या १५ वर्षाखालील मुलांच्या आशिया चषक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. रायडूमधील कौशल्ये पाहत त्याचा अवघ्या सोळाव्या वर्षी हैदराबादच्या रणजी संघात समावेश करण्यात आला. पुढे तो भारताच्या १७ व १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार देखील झाला. १७ वर्षाखालील संघासोबत इंग्लंड दौरा गाजवल्यानंतर, २००२-२००३ च्या रणजी हंगामात ६९८ धावा काढल्या. आंध्रप्रदेश विरुद्ध दुहेरी शतक झळकावून रणजीच्या इतिहासात द्विशतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला. चॅलेंजर ट्रॉफी व भारत अ संघाकडून दमदार कामगिरी करत, भारतीय संघासाठी त्याने आपली दावेदारी ठोकली.
अंबाती रायडू हे नाव प्रसारमाध्यमात, तेव्हा पहिल्यांदा उचलले गेले, जेव्हा २००४ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी त्याची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकला. मात्र, आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तो उपांत्य सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता.
एकोणीस वर्षाखालील विश्वचषकानंतर रायडूच्या आयुष्यातील बॅडपॅच सुरू झाला. २००४-२००५ च्या रणजी हंगामात तो फ्लॉप ठरला. संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त ठरलेल्या रायडू चा पहिला वाद २००५ मध्ये झाला. हैदराबादचे प्रशिक्षक राजेश यादव यांच्याशी मतभेद झाल्याने तो आंध्रप्रदेश रणजी संघात सामील झाला. आंध्र प्रदेश विरुद्ध हैदराबाद या सामन्यात हैदराबादच्या अर्जुन यादव याला मारण्यासाठी भर मैदानात स्टंप त्याने उचलला. ही बातमी त्यावेळी खूपच चर्चिली गेली. २००६ चा रणजी हंगामात देखील तो केवळ एकच शतक करू शकला.
भारतीय संघात निवड होत नसल्याने निराश झालेल्या, रायडूच्या कारकिर्दीला नाटकीय वळण तेव्हा आले जेव्हा त्याने, बीसीसीआयशी बंडखोरी करून सुरू झालेल्या, इंडियन क्रिकेट लीग म्हणजेच आयसीएलमध्ये हैदराबाद हिरोज संघाशी करार केला. आयसीएलशी करारबद्ध झालेल्या तब्बल ७९ खेळाडूंशी बीसीसीआयने संबंध तोडले होते. आपल्या आयसीएलशी जोडण्यामागील कारणे सांगताना रायडू म्हणतो,
“मी जवळपास दहा वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळत होतो व मला विना कोणी ओळखता माझी कारकीर्द संपवायची नव्हती. आयसीएलमधून पैसाही मिळणार होता, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमवेत खेळण्याचा अनुभव देखील मिळणार होता व टीव्हीवर सामने असल्याने लोक ओळखणार सुद्धा होते.”
२००९ मध्ये बीसीसीआयने आयसीएलशी निगडित सर्व खेळाडूंना पुन्हा मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. २०१० आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने रायडूला आपल्या संघात स्थान दिले व त्याचे नशीब पालटले. त्यावर्षी मुंबईला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात रायडूने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे मुंबईने त्याला २०१७ पर्यंत आपल्या संघात कायम ठेवले. अर्थातच, यामागे त्याचे प्रदर्शन हेच कारण होते. यादरम्यान तो तीन वेळा मुंबईच्या संघासोबत आयपीएल विजेता राहिला.
२०१२ मध्ये निवडसमिती अध्यक्ष झालेल्या संदीप पाटील यांनी रायडूचा समावेश भारतीय संघात केला. मात्र, आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी त्याला जुलै २०१३ ची वाट पहावी लागली. झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय पदार्पण करत, त्याने अर्धशतक ठोकून आपल्याला उशिरा संधी दिली गेल्याचे ठासून सांगितले.
पहिल्याच मालिकेत दमदार कामगिरी केल्याने रायडू भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित सदस्य बनला. सलग तीन वर्षे राष्ट्रीय संघात खेळल्याने २०१५ क्रिकेट विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला, पण रायडूला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. प्रमुख संघांविरुद्ध त्याला तितक्याश्या संध्या मिळत नव्हत्या. मात्र जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो त्याचे सोने करत असत. २०१८ च्या अखेरपर्यंत तो भारतीय संघाचा सदस्य होता.
रायडू आपल्या कारकीर्दीत अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. २००५ मधील अर्जुन यादव प्रकरण, आयसीएल प्रकरणाव्यतिरिक्त २०१२ आयपीएलमध्ये हर्षल पटेल याला केलेली शिवीगाळ, २०१६ आयपीएलवेळी संघसहकारी हरभजन सिंह सोबत झालेली बाचाबाची व २०१८ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान पंचांच्या निर्णयाविरुद्ध उघड नाराजी व्यक्त करत मैदानातून बाहेर न पडण्याचा निर्णय असे अनेक वाद त्याच्याशी जोडले गेले आहेत.
२०१८ आयपीएल व आशिया चषक स्पर्धा गाजवल्यानंतर ही, त्याची २०१९ विश्वचषकासाठी निवड झाली नाही. तेव्हा त्याने, निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना ट्विटरवरून टोला हाणताना बहुचर्चित “थ्रीडी” ट्विट केले. या ट्विटनंतर, बीसीसीआयने राखीव म्हणून रायडू संघात आहे व एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याला संधी मिळू शकते, असे स्पष्टीकरण दिले. शिखर धवन स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने रायडूला संधी मिळेल असे वाटत असताना, रिषभ पंतला निवडले गेले. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात विजय शंकर देखील पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाल्याने, रायडू विश्वचषक संघात निवडला जाईल, अशी आशा असताना, पुन्हा एकदा एकही एकदिवसीय सामना न खेळलेल्या मयंक अगरवालला इंग्लंडला पाठवण्यात आले.
आपल्यावर अन्याय होतोय हे पाहून व्यथित झालेल्या, रायडूने २ जुलै २०१९ ला तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर करताच, आइसलँड संघाने त्याला आपल्या देशासाठी खेळण्याचा प्रस्ताव दिला. मात्र त्याने तो नाकारत आयपीएलमध्ये खेळण्यास प्राधान्य दिले. भारताकडून ५५ एकदिवसीय सामने खेळत ४७.०६ च्या लाजवाब सरासरीने त्याने १,६९४ धावा जमवल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येदेखील ६,००० होऊन अधिक धावा त्याच्या नावे आहेत.
आयपीएलमधील रायडूची कामगिरी पाहून, आजही अनेक दिग्गज खेळाडू, भारताने एक अविश्वसनीय गुणवत्ता असलेल्या खेळाडूवर अन्याय केला असे वारंवार म्हणताना दिसतात. संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिला असला तरी आपल्या खेळाने क्रिकेट शौकिनांच्या मनावर राज्य करणाऱ्या अंबाती रायडूला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.
वाचा-
-आयर्लंड-इंग्लंड-आयर्लंड असा प्रवास करणारा एड जॉयस