दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा २०१३ मध्ये काय पो छे ! नावाचा सिनेमा आला होता. टेलिव्हिजन क्षेत्र गाजवल्यानंतर सुशांतने या चित्रपटाद्वारे फिल्मी जगतात पाऊल ठेवले होते. २००० च्या आसपास गुजरातमध्ये घडलेल्या अनेक घटनांवर आधारित या चित्रपटात, तीन मित्रांच्या मैत्रीची कहानी दाखवली गेली होती. सुशांत सिंगने साकारलेले इशान हे पात्र एका क्रिकेट प्रशिक्षकाचे होते. हा प्रशिक्षक अनेक गरजू मुलांना क्रिकेट शिकवत असतो. त्याने शोधलेला अली हाश्मी हा प्रतिभावंत मुलगा असंख्य संकटांना तोंड देत तरूणपणी भारतीय क्रिकेट संघात खेळू लागतो, अशी काहीशी या चित्रपटाची कथा होती.
पण, काय पो छे ! मधील अली हे पात्र साकारणारा मुलगा आज खरंच क्रिकेट खेळत आहे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तोडीचे असलेल्या आयपीएलमध्ये मात्र तो नक्कीच खेळताना दिसणार आहे. होय, सुशांत सिंग राजपूतचा चित्रपटातील शिष्य असलेला अली म्हणजेच दिग्विजय देशमुख १९ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होत आहे.
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईत जन्मलेल्या दिग्विजयचे वडील शिक्षक आहेत. इतर अनेक सामान्य माणसांसारखे दिग्विजयने देखील क्रिकेटपटू व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला एका क्लबमध्ये दाखल केले. तो, मुंबईत १४ वर्षाखालील स्पर्धेत खेळत असताना अचानकपणे त्याला चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली. लहानग्या दिग्विजयने होकार देत काय पो छे मध्ये मध्यवर्ती भूमिका साकारत सर्वांची मने जिंकली. अभिनय व क्रिकेट याविषयी दिग्विजयला विचारले असता तो म्हणाला,
“अभिनय माझी पहिली आवड कधीच नव्हती. काय पो छे नंतर मला अनेक मालिका व चित्रपटांचे प्रस्ताव आले मात्र मी ते स्वीकारले नाहीत. मला पहिल्यापासून क्रिकेटपटू व्हायचे होते. या सर्वात माझ्या घरच्यांचा मला खूप पाठिंबा मिळाला.”
चित्रपटात काम केल्यानंतरही दिग्विजयने क्रिकेट न सोडता अधिक जोमाने सरावाला सुरुवात केली. आपल्या क्लबसाठी खेळताना त्याने महाराष्ट्राच्या युवा संघाच्या निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. कूच बिहार ट्रॉफी तसेच विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये शानदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघाच्या दिशेने आपली पावले टाकली. सी.के.नायडू करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दिग्विजयला वरिष्ठ संघात स्थान मिळाले. तो सातत्याने १३०-१३५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो तसेच दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची त्याची क्षमता आहे. गोलंदाजी सोबत खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत तो आक्रमक फटकेबाजी देखील करू शकतो. आपल्या कामगिरीचे श्रेय तो महाराष्ट्रचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांना देतो.
२०१९-२० च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ७ सामने खेळताना नऊ बळी त्याने आपल्या नावे केले. १७ डिसेंबर २०१९ रोजी जम्मू-काश्मीर विरुद्ध रणजी पदार्पण करत त्याने ८५ धावा व ६ बळी घेण्याची कामगिरी केली. अवघ्या दोन दिवसानंतर झालेल्या, तेराव्या हंगामासाठीच्या लिलावात कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांच्या किमतीत त्याला संघात सामील करून घेतले.
आयपीएल लिलावानंतर, त्याच्यावर अवैध गोलंदाजी शैलीचा ठपका ठेवण्यात आला. मात्र, लवकरच आपली शैली सुधारत, २०२० ची डी.वाय. पाटील ही प्रमुख टी२० स्पर्धा त्याने आपल्या गोलंदाजीने गाजवली. स्पर्धेत ९ बळी मिळवत त्याने रिलायन्स अ संघाला अंतिम फेरीत घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
बीडसारख्या जिल्ह्यातून पुढे येऊन अल्पावधीत महाराष्ट्र संघाचा, प्रमुख खेळाडू झालेला दिग्विजय आयपीएलमध्ये संधी मिळाल्यास मुंबई इंडियन्ससाठी सर्वोत्तम कामगिरी करत भविष्यात भारतीय संघासाठी खेळण्यास आतुर आहे.
वाचा-
-‘कल्याण एक्सप्रेस’ युएईत धावणार सुसाट
-दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
-हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार