क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २००८ मध्ये सुरू झाली. आयपीएलमुळे अनेक असे भारतीय क्रिकेटपटू प्रसिद्धीझोतात आले, ज्यांना यापूर्वी कोणी ओळखत नव्हते. खेळाडूंच्या हातामध्ये कोटीने पैसे येऊ लागले. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले अनेक क्रिकेटपटू, रातोरात मालामाल होऊन करोडपती झाले. याच आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळालेला सौराष्ट्राचा वेगवान गोलंदाज म्हणजे जयदेव उनाडकत.
२०१० अंडर-१९ विश्र्वचषक आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण
गुजरातच्या पोरबंदर येथे जन्मलेल्या, जयदेवने क्रिकेट कारकीर्दीची सुरूवात पोरबंदर येथील स्थानिक क्लबपासून केली. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाजी हे जयदेवचे बलस्थान होते. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तो वेगाने प्रगती करत राहिला. २०१० च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी गेलेल्या भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली. याच संघात, मयंक अगरवाल, मंदीप सिंह, संदीप शर्मा, केएल राहुल या खेळाडूंचा समावेश होता. पुढे जाऊन, हे सर्व खेळाडू भारतीय संघाचे सदस्य बनले.
विश्वचषकातून परतल्यानंतर, जयदेवने धमाकेदार प्रथमश्रेणी पदार्पण केले. भारत अ संघाकडून वेस्टइंडीज अ संघाविरुद्ध खेळताना त्याने १०३ धावा देत १३ बळी आपल्या नावे केले. याच वर्षी, द. आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या, भारतीय कसोटी संघात त्याची निवड करण्यात आली. सेंचूरियनच्या मैदानावर त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्या सामन्यात, द. आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजांसमोर त्याची डाळ शिजली नाही आणि संपूर्ण सामन्यात तो बळी मिळविण्यात अपयशी ठरला.
वसिम अक्रमने केले होते कौतुक
याच वर्षी, कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी दिली. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या वसिम अक्रमने जयदेवचे तोंडभरून कौतुक केले होते. २०१३ च्या आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला मोठ्या रकमेत आपल्या संघात सामील करून घेतले. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध २५ धावा देत त्याने पाच बळी मिळवत, टी२० मधील सर्वात्तम कामगिरी नोंदवली. २०१४ मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचा भाग होता. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर, त्याने झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवले.
२०१७ आयपीएलमध्ये केली दमदार कामगिरी
आठ वर्षापासून आयपीएलमध्ये खेळत असलेल्या, जयदेवसाठी २०१७ चा आयपीएल हंगाम आत्तापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट हंगाम राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स यांच्या निलंबनामुळे, दोन वर्षासाठी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या, रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने, १२ सामन्यात २४ बळी मिळवले. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध हॅट्रिक देखील घेतली होती. त्या हंगामात भुवनेश्वर कुमार पाठोपाठ सर्वाधिक बळी मिळवणारा तो गोलंदाज होता.
साधारण कामगिरीनंतरही बनत राहिला ‘करोडपती’
आयपीएलमुळे, ज्या भारतीय खेळाडूंच्या घरात सर्वाधिक ‘लक्ष्मी’ आली, त्या खेळाडूमध्ये जयदेवचे नाव शीर्षस्थानी आहे. २०१८ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांना मागे टाकत राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी तब्बल ११.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात दाखल करून घेतले. बेन स्टोक्सनंतर सर्वाधिक किंमत जयदेववर लागली होती. त्यावर्षी त्याचे प्रदर्शन अत्यंत साधारण राहिले. संपूर्ण हंगामात तो फक्त ११ बळी मिळवू शकला. पुढच्या वर्षी पुन्हा, राजस्थानने त्याच्यासाठी ८ कोटी मोजले. यावेळीही तो अपयशी ठरला.
सौराष्ट्राला बनवले ‘रणजी चॅम्पियन’
जयदेवच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाच्च क्षण २०१९-२० रणजी ट्रॉफीमध्ये आला. त्याने हंगामात १० सामने खेळत ६७ बळी मिळवत डोडा गणेश यांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. या हंगामात तो सौराष्ट्राचा कर्णधार देखील होता. सौराष्ट्राने, १९४४ नंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकली.
सध्या युएईमध्ये सुरु असलेल्या, आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. स्पर्धेतील त्याची कामगिरी आत्तापर्यंत संमिश्र राहिली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर तो, आयपीएलमध्ये अपयशी ठरत असला तरी, तो सर्वाधिक मागणी असलेला वेगवान गोलंदाज दरवर्षी ठरत आहे.