२००८ मध्ये आयपीएलचा शुभारंभ झाला. भारतीय क्रिकेटपटूं सोबतच मोठे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भारतातील शहरांच्या नावाने असलेल्या संघांसाठी खेळू लागले. तीन तासांच्या खेळात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत. भारतातील अनेक तरुण खेळाडू आंतरराष्ट्रीय दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरत. अशातच, अनेक लहान मुले बॉलबॉय म्हणून सीमारेषेवर थांबत असत. आपल्या क्रिकेट संघटनेने निवडलेली ही मुले एखादा चेंडू आपल्याकडे आला तर पुन्हा मैदानात टाकण्यासाठी धावपळ करत. यात, मुंबईत होणाऱ्या सामन्यांत एक तेरा वर्षाचा खेळाडू बॉलबॉयचे काम पाहत. एखाद्या खेळाडूची स्वाक्षरी देखील त्याला मिळत. २००८ मध्ये बॉलबॉय असणारा तो मुलगा २०२० आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसणार आहे. हा बॉलबॉय ते आयपीएलचा खेळाडू असा प्रवास करणारा मुलगा म्हणजे मुंबईकर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे.
कल्याणच्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात करत तुषारने क्रिकेटचा श्रीगणेशा केला. कल्याणच्या युनियन क्रिकेट क्लबमध्ये तो वयाच्या ९ व्या वर्षापासून नियमित सरावाला जात. सुरुवातीला तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा तुषार वेगवान गोलंदाज कसा बनला याची कहाणी खरच मजेदार आहे.
२००७ च्या अखेरीस मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाची निवड शिवाजी पार्कवर होणार होती. इतर सहकार्यांसोबत, तुषार आपली किटबॅग घेऊन कल्याणवरून शिवाजी पार्कवर पोहोचला. तिथे पाहतो तर काय, फलंदाजीच्या ट्रायलसाठी तब्बल ६०-७० जण तयारीत, एका रांगेत उभे होते. तुषार त्या रांगेत उभा राहिला असता तर त्याचा नंबर लागण्याची शक्यता अत्यंत कमी होती.
दुसरीकडे, वेगवान गोलंदाजांच्या रांगेत उणेपुरे २०-२२ खेळाडू होते. लवकर घरी जायचे म्हणून तुषारने फलंदाजांच्या रांगेत न थांबता वेगवान गोलंदाजांच्या रांगेत थांबायचा निर्णय घेतला. त्याने जेव्हा ट्रायल दिली तेव्हा तो इतर सर्व वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत असलेला दिसला. तेव्हा निवडकर्ते असलेल्या पद्माकर शिवलकर यांनी त्याची मुंबईच्या तेरा वर्षाखालील संघात निवड केली. तेथून पुढे मुंबईच्या प्रत्येक वयोगट तसेच वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व तुषारने केले.
तुषारचे आई-वडील दोघेही सरकारी कर्मचारी असले तरी ते कल्याण सोडून मुंबईमध्ये स्थायिक होऊ शकत नव्हते. त्यामुळे छोट्या तुषारला रोज कल्याण ते शिवाजी पार्क असा प्रवास करून यावे लागत. वडिलांची आपला मुलगा मोठा क्रिकेटपटू व्हावा अशी इच्छा होती म्हणून ते तुषारला कशाचीही कमी पडणार नाही याची काळजी घेत. तुषारने आपल्या धारदार गोलंदाजीने मुंबई क्रिकेट दणाणून सोडत वडिलांच्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.
तुषारच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुवर्णदिन तेव्हा आला जेव्हा, त्याने २०१६-१७ रणजी हंगामात मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळचा, मुंबईचा कर्णधार व सर्वात्तम वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याच्या हातून तुषारला रणजी पदार्पणाची टोपी देण्यात आली. २०१८-१९ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पाच बळी घेऊन मुंबईला एकहाती विजय त्याने मिळवून दिला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली संघाचा कर्णधार व माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीरला पहिल्या षटकात बाद करत त्याने सामना मुंबईच्या बाजूने झुकवला. अवघ्या एका वर्षात तो भारत अ तसेच दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया ब्ल्यू संघात निवडला गेला.
देशांतर्गत क्रिकेटमधील गेले तीन हंगाम गाजवल्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये आयपीएलसाठीच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला ३० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. आयपीएलमधील निवडीच्या व दिल्ली संघाविषयी बोलताना तुषार सांगतो,
“दिल्ली व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. रबाडा व इशांत सारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा कडून शिकण्यासारखे खूप काही असेल. दिल्लीचे प्रशिक्षक असलेले रिकी पॉंटिंग यांच्याकडून ती ऑस्ट्रेलियन आक्रमक शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल.”
सातत्याने १४० च्या वेगाने गोलंदाजी करत, वीस रणजी सामन्यात पन्नास बळी घेऊन, सध्या मुंबईचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज असलेला तुषार संधी मिळाल्यास आपल्या धारदार यॉर्करने भल्याभल्यांची भंबेरी उडवायला व यूएईतील आयपीएलमध्ये धमाका करायला एकदम सज्ज झाला आहे.
वाचा-
-ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार
-दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
-हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार