भारतीय क्रिकेट संघाने २००४ मध्ये केलेला पाकिस्तान दौरा म्हणजे एखाद्या चित्रपटाचे कथानक फिके पडेल असा होता. कारगिल युद्धानंतर भारतीय संघ प्रथमच पाकिस्तानमध्ये खेळणार होता. पाच वनडे व तीन कसोटी सामन्यांची मालिका या दौऱ्यावर उभय संघ खेळणार होते. आधी वनडे मालिका झाली ज्यात भारताने पाकिस्तानला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. पुढे कसोटी मालिका तर ऐतिहासिकच ठरली. सेहवागचे त्रिशतक, द्रविडचा डाव घोषित करण्याचा वादग्रस्त निर्णय, द्रविडची मॅरेथॉन खेळी आणि इरफानची आग ओकणारी गोलंदाजी. भारतीय संघाने पाकिस्तानच्या मैदानांवर उच्च कोटीचा खेळ दाखवत कसोटी मालिका देखील खिशात घातली.
बरं, हे झाले मोठ्या खेळाडूंचे आणि संघाचे पराक्रम मात्र, हा संपूर्ण दौरा एका भारतीय वेगवान गोलंदाजाने सरासरी कामगिरी करून देखील गाजवला. एक-दोन घटनांमुळे तो पाकिस्तानात एवढा प्रसिद्ध झाला की, चक्क पाकिस्तानी मुलींनी त्याला प्रपोज केले होते. इतकेच नाही तर, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ हेदेखील त्याचे चाहते झाले होते. एकदिवसीय मालिकेदरम्यान, पेशावर वनडेत शोएब अख्तरसारख्या जगातील सर्वात वेगवान गोलंदाजाला या पठ्ठ्याने षटकार मारला होता. षटकार मारताना त्याची बॅट तुटली, पण ही तुटलेली बॅट आणि तो षटकार त्याच्या कारकिर्दीची ओळख ठरला. अख्तरचा चेंडू प्रेक्षकांत पाठवणारा हा भारताचा ‘फलंदाज’ होता लक्ष्मीपथी बालाजी.
चेन्नईत जन्मलेला बालाजी लहानपणापासून अत्यंत खोडकर होता. रजनीकांत यांचे चित्रपट पाहून, त्यांच्यासारखे स्टंट करताना त्याला बऱ्याच दुखापती झाल्या. त्याच्या जबड्याची या ‘रजनीकांत’ प्रेमापोटी सर्जरी करावी लागली होती. तो जितका खोडकर होता तितकाच खेळकर देखील होता. इम्रान खान यांची वेगवान गोलंदाजी पाहून तो तशीच गोलंदाजी करायला पाहत. गल्लीत क्रिकेट खेळताना तो वेगवान गोलंदाज म्हणूनच खेळत. १३ वर्षाचा असताना, बालाजी समोरच्या संघात असल्यास आपण जिंकणार नाही, हे माहीत असल्याने विरोधी संघाने त्याचे तीन तासासाठी अपहरण केले होते.
बालाजीने आपल्या वेगवान गोलंदाजीने चेन्नईच्या वयोगट क्रिकेटमध्ये चांगलेच नाव कमावले होते. लवकरच त्याची चेन्नईच्या १९ वर्षाखालील संघात निवड झाली. २००१ मध्ये एम. जे. गोपालन चषक या स्थानिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी श्रीलंकेवरून कोलंबो डिस्ट्रीक्ट असोसिएशनचा संघ आलेला. त्या संघात तिलकरत्ने दिलशान, थिलन समरवीरा, रंगना हेराथ, उपुल चंदना हे आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. त्या सामन्यात बालाजीने १६ षटकांत १० षटके निर्धाव टाकत फक्त १६ धावा देऊन ४ बळी आपल्या नावे केले. आधीच तामिळनाडू रणजी संघाच्या दारावर टकटक करत असलेला बालाजी या एका सामन्यातील कामगिरीच्या जोरावर रणजी संघात दाखल झाला.
रणजी पदार्पणात गोव्याविरूद्ध दोन्ही डावात मिळून त्याने ७ बळी मिळवले. दुसऱ्या सामन्यात एक पाऊल पुढे जात, कर्नाटकविरुद्ध एकाच डावात ७ बळी मिळवण्याची किमया त्याने केली. आपल्या पहिल्याच रणजी हंगामात त्याने ३२ बळी मिळवत आपले नाणे खणखणीत वाजवले. तो त्या रणजी हंगामात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी राहिला.
रणजीतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघात निवडला गेला. २००२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध वडोदरा येथील पाचव्या एकदिवसीय सामन्यात बालाजीला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. भारताने पहिली फलंदाजी करताना २९० धावा फलकावर लावल्या. मात्र, ख्रिस गेल व वॅवेल हिंड्स यांच्या तुफानी फटकेबाजीसमोर हा धावांचा डोंगर मातीच्या ढिगाऱ्यासारखा झाला. गेल व हिंड्स यांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. बालाजी देखील यातून सुटू शकला नाही. त्याच्या चार षटकात ४४ धावा कुटल्या गेल्या. पहिल्याच सामन्यात मनमुराद धावा लुटवल्यानंतर बालाजीची संघातून हकालपट्टी झाली.
पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला एक वर्ष वाट पहावी लागली. बालाजीला ऑक्टोबर २००३ मधील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात बोलावले गेले. मधल्या काळात त्याने, रणजी ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली. अवघ्या ७ सामन्यात त्याने ४४ बळी मिळवले होते. वनडे पदार्पणाप्रमाणे त्याचे कसोटी पदार्पणही मनासारखे झाले नाही. दोन सामन्यात त्याला फक्त १ बळी मिळवता आला. बालाजी अपयशी ठरला तरी, ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्ट्यांवर तो चांगली कामगिरी करेल असा विश्वास ठेवून, त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेण्यात आले. त्या दौऱ्यावर तिरंगी मालिकेत १० सामने खेळताना त्याने १२ गडी तंबूत पाठवले. ब्रेट लीने बालाजीला एका हाताने मारलेला सुप्रसिद्ध षटकार देखील याच मालिकेतला.
ऑस्ट्रेलियातील चमकदार कामगिरीनंतर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्याला संधी देण्यात आली. शोएब अख्तरला मारलेला षटकार व तुटलेली बॅट याव्यतिरिक्त त्याने, एकदिवसीय मालिकेत ६ तर कसोटी मालिकेत १२ बळी मिळवत गोलंदाज म्हणून आपली भूमिका योग्यरीतीने बजावली. बालाजी पाकिस्तानमध्ये इतका प्रसिद्ध झाला होता की, तो जेथे जाईल तेथे लोक त्याला “बालाजी जरा धीरे चलो” असे म्हणत. त्याच्या नैसर्गिक हास्याचे करोडो चाहते झाले होते. पुढच्या, आशिया चषक व व्हिडिओकॉन एकदिवसीय मालिकेत देखील त्याने बर्यापैकी कामगिरी केली. त्यानंतर मात्र तो, दुखापतीमुळे संघाबाहेर गेला.
२००५ मध्ये पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला आणि बालाजीला पुन्हा पाचारण करण्यात आले. बालाजीने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत, तीन कसोटीत १४ पाकिस्तानी फलंदाजांना बाद केले. त्यानंतर मात्र, त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा उचल खाल्ली. यावेळी तो बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर गेला.
बालाजी बाहेर झाला त्याच दरम्यान आरपी सिंह, जोगिंदर शर्मा, प्रवीण कुमार, श्रीसंत हे युवा गोलंदाज भारतीय संघात दाखल झाले. त्यामुळे, बालाजीला भारतीय संघात जागा बनवणे कठीण होऊन बसले. अशातच, आयपीएलची घोषणा झाली व बालाजीला त्याच्याच राज्याच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली. आयपीएलचा इतिहासातील पहिली हॅटट्रिक घेण्याचा मानदेखील बालाजीला मिळाला. आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शनाच्या जोरावर त्याने २००९ मध्ये पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले. पुनरागमनानंतर २००९ मध्ये भारताकडून तो केवळ १ वनडे खेळला.भारताकडून खेळलेल्या ८ कसोटी सामन्यांत २७ बळी आणि ३० एकदिवसीय सामन्यांत ३४ बळी अशी त्याची एकूण कामगिरी राहिली.
भारतीय संघातून बराच काळ बाहेर राहूनही, आयपीएलमध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे श्रीलंकेत झालेल्या २०१२ च्या टी २० विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. विश्वचषकात ९ बळी मिळवत तो, भारतातर्फे दुसरा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. या स्पर्धेत त्याने द. आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या षटकात १४ धावांचा बचाव करत भारताला एका धावेने सामना जिंकून दिला होता.
२०१२ मध्ये केकेआरला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर मात्र तो, सततच्या दुखापतींनी त्रस्त राहिला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत पण, त्याला भारतीय संघात पुनरागमन करत आले नाही. २०१५ मध्ये त्याने तमिळनाडूकडून आपला शंभरावा प्रथमश्रेणी सामना खेळला. त्याचवर्षी, तमिळनाडू क्रिकेट संघटनेने सुरू केलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये टूटी पॅट्रीयट्स संघाला विजेते बनवून त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
निवृत्तीनंतर तो प्रशिक्षक म्हणून काम करू लागला. सर्वप्रथम तमिळनाडू क्रिकेट संघटनेशी प्रशिक्षक म्हणून तो जोडला गेला. २०१७ आयपीएलसाठी केकेआरने त्याला आपला गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त केले. २०१८ मध्ये जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघ दोन वर्षाचे, निलंबन पूर्ण करून पुन्हा आयपीएलमध्ये दाखल झाला तेव्हा बालाजी, आपल्या पहिल्या आयपीएल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनला. आजही तो चेन्नई व तमिळनाडूच्या गोलंदाजांना प्रशिक्षण देण्याचे काम करतो.
वाचा-
-सेहवाग, गेल, डिविलियर्स या दिग्गजांमध्येही आपले वेगळेपण जपणारा मॅक्यूलम