---Advertisement---

गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…

On: बुधवार, ऑक्टोबर 14, 2020 7:56 PM
---Advertisement---

इंग्लंडला जरी क्रिकेटचे माहेरघर समजले जात असते, तरीही क्रिकेटची सर्वाधिक वाढ आणि विस्तार झाला तो भारतीय उपखंडातच. त्यातही भारताचा विचार केल्यास मुंबई क्रिकेट असोसिएशनने देशाला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू दिले आहे. मुंबई क्रिकेटने भारताला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला शेकडो खेळाडू दिलेत. मात्र, मुंबई ज्या राज्यात येते त्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाकडून मात्र देशाला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच क्रिकेटपटू मिळाले आहेत.

महाराष्ट्राच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर तितकीशी संधी कधी दिलीच गेलेली नाही. असा कायम आरोप होतो. या आरोपात काहीसे तथ्यदेखील वाटते. महाराष्ट्राचे असे बरेच क्रिकेटपटू आहेत, ज्यांना मर्यादित संधी देऊन नंतर राष्ट्रीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या अशाच दुर्दैवी खेळाडूंपैकी एक होते, कोल्हापूरचे सदाशिव पाटील.

महाराष्ट्र संघाकडून रणजी खेळताना सदाशिव पाटील पहिल्याच सामन्यात चमकले
दत्तात्रय आणि सदाशिव या पाटील बंधूंचा जन्म कोल्हापुरातील शेतकरी आणि गुळाच्या व्यापाऱ्याच्या घरात झाला. सदाशिव यांनी मोठे भाऊ दत्तात्रय यांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. भावाप्रमाणे, त्यांचीदेखील महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली. सदाशिव यांनी पदार्पणाच्या सामन्यातच प्रभाव पाडला. महाराष्ट्र आपल्या पहिल्या डावात १६७ धावांवर बाद झाला असताना, पदार्पण करणाऱ्या सदाशिव यांनी ४५ धावा देऊन ५ बळी घेत, मुंबईचा डाव ११२ धावांवर गुंडाळला. दुसऱ्या डावात देखील त्यांनी तीन बळी मिळवत, महाराष्ट्राला निर्णायक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

लाला अमरनाथांनी हेरली गुणवत्ता
लाला अमरनाथ यांनी सर्वप्रथम पाटील यांच्यातील गुणवत्ता हेरली. १९५५ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात पश्चिम विभाग संघात त्यांना स्थान दिले. पाटील यांनी लालाजी व निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवत, त्या प्रथमश्रेणी सामन्यातील पहिल्या डावात त्यांनी तीन तर, दुसऱ्या डावात चार बळी मिळवत, भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्या सामन्यातील  दमदार कामगिरीच्या जोरावर, त्यांची निवड ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात झाली.

भारतासाठी खेळलेली ती एकमेव कसोटी
पाटील यांनी विजय मेहरा आणि नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह पदार्पण केले. भारतीय कर्णधार पॉली उम्रीगर यांनी घेतलेला फलंदाजीचा निर्णय विनू मंकड यांनी सार्थ ठरवला. मंकड यांनी २२३ धावांची विक्रमी खेळी केली. दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाटील १४ धावांवर नाबाद राहिले. त्यांनी दत्तू फडकर यांच्यासमवेत नाबाद ४४ धावांची भागीदारी केली. कर्णधार उम्रीगर यांनी भारताचा डाव ४२१ धावांवर घोषित केला.

त्यानंतर मात्र, संपूर्ण सामन्यावर सुभाष गुप्ते यांनी वर्चस्व गाजवले. त्यांनी पहिल्या डावात ८३ धावांत तीन तर, दुसऱ्या डावात ४५ धावांवर ५ बळी टिपले. पाटील यांनी दोन्ही डावात जॉन रीड यांना बाद केले. भारताने सामन्यात, डावाने विजय मिळवला. भारताने विजय मिळवला असला तरी, पुढील सामन्यात पाटील यांना संघातून वगळण्यात आले. त्यांच्या जागी गुंडीबेल सुंदरम यांना संधी देण्यात आली. यानंतर मात्र, पाटील यांना पुन्हा कधीही भारतीय संघात खेळवण्यात आले नाही.

निवृत्तीनंतरचे कार्य
पाटील यांनी १९६३-६४ पर्यंत महाराष्ट्रासाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. १९५९ मध्ये चर्च तर १९६१ मध्ये त्यांनी लँकेशायर लीगमध्ये बाकप संघाचे प्रतिनिधित्व केले. सदाशिव पाटील हे वेगवान गोलंदाजीसोबत तळाचे उपयुक्त फलंदाज देखील होते. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत ते अवघे, ३६ प्रथमश्रेणी सामने खेळले. या दहा वर्षात, ते काही रणजी हंगामात चमकले. भारताकडून खेळलेला एक कसोटी सामना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण राहीला. पाटील यांनी आपल्या छोट्याशा कारकिर्दीत ८३ प्रथमश्रेणी बळी मिळवले. सोबतच, २७.०६ च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह ८६६ धावा केल्या आणि २० झेल पकडले.

क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर, पाटील यांनी कोल्हापूरमध्ये युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले. १५ सप्टेंबर २०२० मध्ये कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील आपल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

वाचा-

-शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून

-शेन वॉर्नच्या ‘त्या’ चेंडूला रिची बेनो यांनीच म्हटले होते शतकातील सर्वोत्तम चेंडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---