आज न्यूझीलंड क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या चार संघात आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात न्यूझीलंडला एक तगडा संघ म्हणून ओळखले जाते. स्टीफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम, डॅनियल व्हेटोरी, केन विल्यमसन यांसारखे न्यूझीलंडचे खेळाडू आज कित्येकांचे आदर्श आहेत. मात्र जेव्हा न्यूझीलंडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा, न्युझीलंड तितकासा शक्तिशाली संघ नव्हता. १९३० मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर, १९५६ मध्ये त्यांनी आपला पहिला कसोटी विजय प्राप्त केला होता. १९८० पर्यंत न्युझीलंड एक साधारण संघ म्हणूनच ओळखला जात. जॉन राईट, रिचर्ड हॅडली यांच्यासारखे काही दोन-तीनच खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करू शकले होते.
साल १९८० नंतर न्यूझीलंड संघात अनेक बदल झाले. अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यानंतर बऱ्याच युवा खेळाडूंना संधी मिळाली. असाच, १९८२ मध्ये एक एकोणीस वर्षाचा फलंदाज न्यूझीलंड संघात सामील झाला. त्यावेळी त्या फलंदाजाला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून नावाजले जात होते. ज्या काळात जेफ थॉमसन, डेनिस लिली, माल्कम मार्शल व मायकेल होल्डिंग यांसारखे दिग्गज गोलंदाज आपल्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने भल्या-भल्यांच्या नाकात दम करत होते तेव्हा हा मुलगा, या दिग्गजांना कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, पूल मारत सर्वांची वाहवा मिळत होता. हा तरुण खेळाडू म्हणजे पुढे जाऊन न्यूझीलंडचा सर्वकालीन महान फलंदाज बनलेला मार्टिन क्रो. आज (३ मार्च) त्याचा ६ वा स्मृतीदिन आहे.
घरातून मिळाले क्रिकेटचे बाळकडू…
क्रो यांचे वडील डेव्ह केंटरबरी व वेलिंग्टनसाठी क्रिकेट खेळत. मोठा भाऊ जेफ क्रो हा देखील न्युझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला. हॉलिवूड अभिनेता रसेल क्रो मार्टिन यांच्याच परिवारातील सदस्य आहे. एकूणच एका संपन्न परिवारात मार्टिन यांचा जन्म झाला. भावासोबत तोदेखील ऑकलंडमधील कॉर्नवॉल क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवू लागला.
मार्टिन जणू काही दैवीशक्ती घेऊनच जन्माला आला होता. वयाच्या १७ व्या वर्षी, त्याने ऑकलंडसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केले. त्याचा खेळ पाहून मेरीलबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीने सहा महिने मोफत प्रशिक्षण देण्याचे ठरवले. एमसीसीसोबतचा कार्यकाल पूर्ण करून आल्यानंतर, केंटरबरी विरुद्ध त्यांनी आपले पहिले प्रथमश्रेणी शतक झळकावले. यासोबत त्यावर्षीचा, सर्वोत्कृष्ट युवा न्यूझीलंड क्रिकेटपटूचा पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केला. क्रो यांच्या प्रगतीचा आलेख इतका चढता होता की त्यांनी, एकोणिसाव्या वर्षी राष्ट्रीय संघात जागा मिळवली.
विश्वचषकात अफलातून कामगिरी
क्रो जितके आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होते, तितकेच आपल्या उत्तम बचावासाठी देखील त्यांनी प्रसिद्धी मिळवली. व्हिव्ह रिचर्ड्स यांच्याबद्दल असे म्हटले जात की, जर त्यांनी संरक्षणात्मक खेळायचा निर्णय घेतला तर कोणीही त्याला बाद करू शकत नाही. क्रो यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे १९८५ मध्ये झालेली कसोटी याचे उत्तम उदाहरण आहे. रिचर्ड हॅडली यांच्या तुफानी गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना दोन्ही डावात सर्वबाद करण्याची किमया केली. हॅडली यांनी एकूण १४ बळी मिळवले. पण क्रो त्याच खेळपट्टीवर उभे राहिला, जी खेळपट्टी गोलंदाजांचे नंदनवन बनली होती. सुमारे आठ तास त्यांनी ३२८ चेंडूंचा सामना करत १८८ धावांची अविस्मरणीय खेळी केली. हा सामना न्यूझीलंडने एक डाव आणि ४१ धावांनी जिंकला. यावर्षी क्रो विस्डेनचे ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ ठरले.
साल १९८७ च्या विश्वचषकात ते न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते. १९९० मध्ये क्रो यांच्याकडे न्यूझीलंडचे कर्णधारपद देण्यात आले आणि न्यूझीलंड क्रिकेटचा सुवर्णकाळ सुरू झाला. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणारे पहिले क्रिकेटपटू होण्याचा मान त्यांना मिळाला.
साल १९९२ मध्ये क्रो यांच्या प्रसिद्धीचा आलेख शिगेला पोहोचला. त्यावर्षीच्या विश्वचषकात क्रो यांनी नऊ सामन्यात ५५ च्या सरासरीने ४५६ धावा केल्या आणि आपल्या फलंदाजी आणि कल्पक नेतृत्वाने न्यूझीलंडला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचविले. ज्यांना हा विश्वचषक आठवत असेल त्यांना मार्टिन क्रो यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाहीं. न्युझीलंडने पहिल्याच सामन्यात माजी विजेते ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. क्रो यांच्या शानदार शतकी खेळीमुळे हे शक्य झाले होते. त्याच सामन्यात फिरकीपटू दीपक पटेलला सामन्यातील पहिले षटक देऊन त्यांनी नवीन परंपरासुद्धा सुरू केली. त्या विश्वचषकातील सर्वात्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देखील क्रो यांना दिला गेला होता.
क्रो यांची कारकीर्द एकूण १३ वर्षाची राहिली. कारकीर्दीच्या अखेरीस ते जवळपास एका पायाने खेळले. कारण दुसर्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला त्रास होत असे. या दुखापतीमुळे वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून १९९५ मध्ये भारताविरुद्ध कसोटी खेळून ते निवृत्त झाले. निवृत्तीवेळी, त्यांचे वय अवघे ३३ वर्ष होते. त्यांनी ७७ कसोटी सामने खेळले आणि ४५.३६ च्या सरासरीने ५,४४४ धावा केल्या. तसेच, १४३ एकदिवसीय सामन्यांत ३८.५५ च्या सरासरीने ४,७०४ धावा काढल्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी सुमारे वीस हजार धावांचा डोंगर उभा केला होता.
निवृत्तीनंतर क्रिकेटशी संबंध कायम…
निवृत्ती नंतरही त्यांचा क्रिकेटशी असलेला संबंध तुटला नाही. समालोचक आणि लेखक म्हणून ते सक्रिय होते. क्रिकेटचा नवीन आणि सर्वात प्रसिद्ध प्रकार टी२० ची पायाभरणी करण्यातही क्रो यांचा मोलाचा वाटा आहे. निवृत्तीच्या एका वर्षानंतर १९९६ मध्ये त्यांनी क्रिकेटचे छोटे प्रारूप विकसित केले आणि त्याला क्रिकेट मॅक्स असे नाव दिले. हा खेळाबद्दल त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा होता. २०१५ विश्वचषकादरम्यान, क्रो यांना क्रिकेटच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले.
वयाच्या ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सन २०१२ मध्ये पहिल्यांदा क्रो यांना कर्करोग असल्याचे निदान झाले होते. मात्र एका योध्याप्रमाणे, त्यांनी त्याचा पराभव केला होता. परंतु, २०१५ मध्ये त्यांना पुन्हा कॅन्सरने ग्रासले. यानंतर क्रो यांची प्रकृती खालावली आणि ३ मार्च २०१६ रोजी अवघ्या ५३ व्या वर्षी क्रो यांनी ऑकलंडमध्ये शेवटचा श्वास घेतला.
क्रो यांचे स्थान न्यूझीलंड क्रिकेटमध्ये किती आदराचे होते हे न्यूझीलंडमधील युवा खेळाडूंशी बोलताना दिसून येते. प्रत्येक खेळाडू त्यांना आपला आदर्श मानतो. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याचे क्रो यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. टेलर क्रो यांचे बोट धरून क्रिकेटमध्ये दाखल झाला होता.
मागीलवर्षी जानेवारी महिन्यात, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना टेलरने न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी धावा काढणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला होता. त्यावेळी, आपल्या भावना प्रकट करताना त्याला अश्रू अनावर झाले. क्रो यांची आठवण सांगताना तो म्हणाला, “मार्टिनचे माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. मी स्वतःला मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी तयार करत असताना, मार्टिनने मला सांगितले होते की, तुला न्युझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज व्हायचंय. आज तो असता तर त्याला खूप आनंद झाला असता.”
खऱ्या अर्थाने न्यूझीलंड क्रिकेटला नवसंजीवनी देणारे, आपल्या लाजवाब फलंदाजीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे क्रो ध्रुव तार्यासारखे क्रिकेटप्रेमींच्या हृदयात कायम अढळ राहिले.
वाचा-
-पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू अनिल दलपत
साल १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे ‘मार्टिन क्रो’
‘त्या’ भीषण घटनेची १३ वर्षे! आजच्याच दिवशी श्रीलंकन संघावर पाकिस्तानमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला