साल १९५८ ते १९६५ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघात ‘नॉर्म ओ नील’ नावाचा क्रिकेटपटू खेळत असत. १९५९ च्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील एक कसोटी लाहोरमध्ये झाली होती. त्या सामन्यात, ओ नीलने १३४ धावांची सुंदर खेळी केली व त्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. ओ नीलची खेळी कराचीतील एका इसमाला खूप आवडली होती. चार वर्षांनी जेव्हा त्याला मुलगा झाला तेव्हा, नोर्म ओ नीलशी मिळतेजुळते अनिल हे नाव त्याने आपल्या मुलाचे ठेवले.
एका क्रिकेटपटूच्या खेळाने प्रभावित होऊन ठेवलेले नाव त्या सार्थ करत, तो मुलगा पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. इतकेच नाही तर, पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला हिंदू खेळाडू म्हणून तो ओळखला जाऊ लागला. हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक अनिल दलपत.
अनिल यांचे वडील दलपत सोनवारीया हे हाडाचे क्रिकेटप्रेमी होते. कराचीत, ‘पाकिस्तान हिंदूज’ नावाने ते क्रिकेट अकादमी चालवत. पाकिस्तानमध्ये चांगल्या होतकरू क्रिकेटपटूंना ते अनेकदा मोफत प्रशिक्षण देत. त्यांना कायम वाटत आपला मुलगा पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळावा. अनिल यांचे क्रिकेटकडे वळण्याचे मुख्य कारण सुद्धा वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे होते.
साल १९८३-८४ च्या पाकिस्तानमधील क्रिकेट हंगामात यष्टीरक्षणात व फलंदाजीत चमकदार कामगिरी करत त्यांनी चांगले नाव कमावले होते. त्यांनी ५०० हून अधिक धावा व यष्ट्यांमागे ६७ बळी टिपले होते. याच काळात पाकिस्तानचे दिग्गज यष्टीरक्षक वासिम बारी हे खराब फॉर्मशी झुंजत होते. पाकिस्तानमध्ये इतर चांगले यष्टिरक्षक नसल्याने अनिल हे पाकिस्तानसाठी खेळू शकतात अशी चर्चा सुरू झाली. अखेरीस, बारी यांनी निवृत्ती जाहीर केली व अनिल यांची पाकिस्तान संघात निवड करण्यात आली.
सन १९८४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कराची कसोटीत अनिल पाकिस्तानी संघ व झेंड्यासह कराचीतील आपल्या घरगुती मैदानावर उतरले. २ मार्च १९८४ ही तारीख पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात कायमची लिहिली गेली. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू क्रिकेटपटू म्हणून अनिल यांची नोंद झाली.
त्यावेळी, अब्दुल कादिर तुफान फॉर्ममध्ये होते. कादिर यांचे चेंडू इतके वळण घेत की, फलंदाजच नाहीतर यष्टीरक्षकदेखील अनेकदा चकत. त्या सामन्यात देखील तसेच झाले, इंग्लंडचे फलंदाज कादिर यांचा सामना करण्यात असमर्थ दिसत होते. मात्र, अनिल यांच्याकडून एकही चेंडू सुटत नव्हता. कादिर यांनी पाच बळी आपल्या नावे केले होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना, अनिल यांनी नांगर टाकत ५२ चेंडूत १२ धावा केल्या. सलीम मलिक यांच्या ७४ धावांमुळे पाकिस्तानने ९५ धावांची आघाडी मिळवली. पुन्हा एकदा कादिर व तौसिफ अहमद यांच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडचा डाव १५९ धावात कोसळला.
पाकिस्तानला विजयासाठी ६६ धावांचे आव्हान मिळाले. निक कुक यांनी पाच बळी मिळवत पाकिस्तानची अवस्था ६ बाद ४० अशी दयनीय केली. शेवटी, अनिल एका बाजूने उभे राहिले व पाकिस्तानला विजयी लक्ष्य गाठून दिले. पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी करून देखील पुढील दोन सामन्यात त्यांना नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आले.
न्यूझीलंड दौर्यावर एका अर्धशतका व्यतिरिक्त ते जास्त काही करू शकले नाहीत. ९ कसोटीत ते १६७ धावा आपल्या नावापुढे लावू शकले. १५ एकदिवसीय सामन्यात सुद्धा ३७ व २१ अशा दोनवेळीच ते दुहेरी धावसंख्या गाठू शकले. न्यूझीलंड दौर्यानंतर अनिल यांना पाकिस्तान संघातून डच्चू देण्यात आला. यानंतर ते पुन्हा कधीही पाकिस्तानकडून खेळले नाहीत.
साल २००२ मध्ये एका क्रिकेट मालिकेद्वारे निधी गोळा करून तो माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना देण्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ठरवले. त्या खेळाडूंच्या यादीमध्ये अनिल दलपत यांचे देखील नाव होते. मात्र, अनिल यांनी ती मदत स्वीकारण्यास नकार दिला. त्यामागील कारण सांगताना ते म्हणाले,
“संघातील अंतर्गत राजकारणामुळे मला जास्त क्रिकेट खेळायला मिळाले नाही. इम्रान खान यांची इच्छा नव्हती की, मी पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे. मला संधी मिळाली असती तर मी अजून चांगली कामगिरी करु शकलो असतो.”
खरंतर त्यावेळी, इतर यष्टिरक्षकांच्या तुलनेत अनिल यांची कौशल्ये मर्यादित होती. सोबतच, त्यांची आकडेवारी सुद्धा त्यांच्या विरोधात जात होते.
अनिल यांच्या परिवारातील अनेक जण क्रिकेटमध्ये सक्रिय होते. त्यांचे दोन चुलतभाऊ भारतकुमार व महेंद्रकुमार हे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया हादेखील अनिल दलपत यांच्या परिवारातील होता. त्यानेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, आपण हिंदू असल्याने आपल्यावर अन्याय केला जात होता अशी टीका केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी
‘आय सब्जी नही पोहे बनेंगे’, शिखर धवन-पृथ्वी शॉ जोडीचा भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल
रोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का? कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर