आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईमध्ये अपेक्षेप्रमाणे जोरदार सुरुवात झाली आहे. १२ दिवसात दोन सुपर ओव्हर व बरेच सामने अखेरच्या षटकापर्यंत गेले आहेत. मैदानात प्रेक्षक नसले तरी, टेलिव्हिजनवर सामने पाहणारे प्रेक्षक आयपीएलसाठी तितकेच उत्साहित आहेत. यूएईमधील, क्रिकेट कायमचं रोमांचक राहिले आहे. दुबईमधील नवीन स्टेडियम तसेच अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियम होईपर्यंत, यूएई क्रिकेटचा समानार्थी शब्द शारजा होता. ८० व ९० च्या दशकात, जगातील सर्वात थरारक क्रिकेटचे सामने शारजाच्या मैदानावर होत. फलंदाजांसाठी नंदनवन असणाऱ्या, शारजाच्या खेळपट्टीवर सचिन तेंडुलकरने केलेल्या अनेक खेळ्या दंतकथा म्हणून सांगितल्या जातात. असे असताना, अचानक भारतीय संघाला शारजामध्ये क्रिकेट खेळायला बंदी घातली गेली. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले शारजा क्रिकेटचा अचानक रसातळाला गेले होते. पण असे काय घडले, ज्यामुळे शारजामध्ये क्रिकेट खेळणे जवळपास बंदच झाले ?
शारजा स्टेडियम दुबई शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे. ८० च्या दशकात दुबईतील प्रसिद्ध उद्योजक अब्दुल रहमान बुखातीर यांनी हे स्टेडियम बांधले होते. एकेकाळी क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंतर्फे सर्वाधिक पसंत केले जाणारे हे मैदान होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर मुद्द्यावरून होणारा तणाव जगजाहीर आहे. त्यामुळे, भारत व पाकिस्तान हे दोन्ही संघ, एकमेकांच्या देशात जाऊन द्विपक्षीय मालिका खेळत नसत. अशावेळी, शारजामधील आयोजकांनी भारत-पाकिस्तान सामने शारजामध्ये आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. शारजाच्या या मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या योजनेवर दोन्ही क्रिकेट मंडळांनी सहमती दर्शवली.
बुखातीर यांनी शारजाह येथे चौरंगी मालिकेचे नियोजन केले. हे स्वरूप इतके प्रभावी ठरले की, भारत आणि पाकिस्तानचे बरेच संस्मरणीय सामने या मैदानावर पार पडले. प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम आणि जगभरातील टीव्हीला चिकटलेले क्रिकेटप्रेमी क्रिकेटचा आनंद लुटत. दुबईतील लोक वर्षातून एकदा किंवा दोन वर्षात एकदा ही स्पर्धा होण्याची वाट पाहत. याचमुळे, शारजातील सट्टाबाजारही गरम झाला. दिलीप वेंगसरकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की,
” १९८७ मध्ये जेव्हा भारतीय संघ शारजामध्ये खेळत होता तेव्हा एक माणूस भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आला आणि म्हणाला की, जर भारताचा संघ शारजा कप जिंकला तर मी सर्व खेळाडूंना टोयोटा मोटारी भेट देईल. तेव्हा भारतीय कर्णधार, कपिल देव यांनी त्या माणसाला ड्रेसिंग रूममधून अक्षरशः हाकलून लावले. नंतर माहित पडले की, तो इसम अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता.”
शारजामध्ये क्रिकेटचा खेळ जितका लोकप्रिय झाला तितका तो अंडरवर्ल्ड आणि सट्टेबाजारासाठी जवळचा झाला. १९८४ ते २००० पर्यंत शारजा क्रिकेटसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण होते. भारताने शारजाच्या मैदानावर आपला शेवटचा सामना ३९ ऑक्टोबर २००० रोजी खेळला. श्रीलंकेविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील हा सामना होता. या सामन्यात भारताला २४५ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. याचनंतर, जेव्हा २००० मध्ये क्रिकेटमधील फिक्सिंगचे अक्राळविक्राळ रुप जगाने पाहिले तेव्हा, सर्वांच्या नजरा शारजाच्या मैदानाकडे वळल्या. पाकिस्तानचे माजी कर्णधार सलीम मलिक यांचे नाव फिक्सिंगमध्ये आले आणि याचा तपास करण्यासाठी न्यायमूर्ती कय्यूम कमिशनची स्थापना केली गेली. त्यात काही सामने गमावण्यासाठी सलीम यांनी लाच घेतल्याचे आढळले. याच आयोगाला दिलेल्या जबाबात पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज सरफराज नवाज म्हणाले होते की, पाकिस्तान क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार काही नवीन नाही. याची सुरूवात १९७९ मध्ये भारत-पाकिस्तान मालिकेपासून झाली होती, फिक्सिंगचे जाळे शारजामध्ये अधिक पसरले. त्याचवेळी पाकिस्तानचा आणखी एक माजी कर्णधार आमिर सोहेलनेही शारजा हे फिक्सिंगचे माहेरघर असल्याचे म्हटले. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएनेही कबूल केले की, मॅच फिक्सिंग संदर्भातील चर्चा शारजा येथे झाली होती.
या चौकशीत पायजी नावाचा एक सट्टेबाज ही समोर आला. ज्याने असे सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना गमवावा म्हणून त्याने पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना दोन लाख डॉलर्स दिले. जेव्हा मॅच फिक्सिंगचा राक्षस बाहेर आला तेव्हा, भारत सरकारने २००१ मध्ये भारतीय संघाला शारजामध्ये खेळू दिले नाही. यामुळे शारजातील क्रिकेट ठप्प झाले. इतर देश ही तेथे जाण्यास तयार नव्हते. यामुळे २००३ ते २०१० या काळात शारजामध्ये कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने झाले नाहीत. सात वर्षाच्या दीर्घ काळानंतर २०१० मध्ये अफगाणिस्तानने कॅनडाविरुद्ध दोन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली.
२००९ मध्ये जेव्हा पाकिस्तानमध्ये लाहोर कसोटीदरम्यान श्रीलंकेच्या संघाला दहशतवादी हल्ला झाला तेव्हा, पाकिस्तानसाठी आणखी एक संकट उभे राहिले. कोणताही संघ पाकिस्तानमध्ये येऊन खेळण्यास तयार नव्हता. त्यानंतर २०११ मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला युएईमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी राजी केले. अशाप्रकारे, त्या मालिकेची पहिली कसोटी शारजामध्ये, दुसरी अबूधाबी आणि तिसरी दुबईमध्ये खेळली गेली. क्रिकेटच्या दृष्टीकोनातून शारजाचे मैदान इतके लोकप्रिय आहे की, २०१४ साली जेव्हा भारतात लोकसभा निवडणुकांमुळे, आयपीएल देशाबाहेर करण्याचे ठरले तेव्हा, शारजाला पहिली पसंती दिली गेली. त्यावर्षी आयपीएलचा प्रारंभिक भाग शारजाहध्ये खेळला गेला.
२०१८ मध्ये एशिया चषकाच्या निमित्ताने, जवळपास १८ वर्षानंतर भारतीय संघ शारजामध्ये खेळला. आताही, आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सामने शारजाच्या या ऐतिहासिक मैदानावर खेळवले जात आहेत.
वाचा-
-मुरलीधरनला ‘फेकी गोलंदाज’ ठरवणारे डॅरेल हेयर
-इरफान पठानच्या तालमीत तयार झालेला अब्दुल समद
-तेराव्या वर्षी पायाची तीन बोटे गेली तरी, तो न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बनला