---Advertisement---

ऐश्वर्याची मीस वर्ल्ड म्हणून निवड ते वॉर्नर-स्मिथची चोरी पकडणार अवलिया क्रिकेटर डिविलियर्स

On: बुधवार, फेब्रुवारी 10, 2021 2:08 PM
---Advertisement---

वर्णभेदाच्या कारणामुळे १९७० मध्ये द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे आयसीसीने निलंबन केले. एक-दोन वर्षाचे निलंबन होईल असे वाटत असताना, द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाला तब्बल २२ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आले नाही. दरम्यानच्या काळात अशा अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द संपली, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू होऊ शकले असते. ग्रीम पोलॉक, पीटर पोलॉक, माईक प्रॉक्टर, बॅरी रिचर्ड्स ही त्यापैकीच काही नावे. तर, टोनी ग्रेग,ऍलन लॅम्ब, रॉबिन स्मिथ यांनी इंग्लंडसाठी खेळून नाव कमावले.

आफ्रिकेवर १९७० मध्ये लादलेले निलंबन १९९१ मध्ये उठवले गेले आणि एक नवा द. आफ्रिका संघ सर्वांना पाहायला मिळाला. केपलर वेसेल्स, हॅन्सी क्रोनिए, डेव्ह रिचर्डसन, ऍलन डोनाल्ड, शॉन पोलॉक हे खेळाडू अनेकांचे आदर्श झाले. निलंबनानंतर तयार झालेल्या नव्या द. आफ्रिका संघात डोनाल्ड व पोलॉक यांच्या साथीला अजून एक वेगवान गोलंदाज होता, ज्याने बरीच वर्ष द. आफ्रिका क्रिकेटची सेवा केली. डोनाल्ड आणि पोलॉक यांच्या बरोबरीने वेगवान गोलंदाजी त्रिकूट पूर्ण करणारा तो तिसरा गोलंदाज होता फॅनी डिव्हिलियर्स.

भालाफेकपटू ते क्रिकेटपटू
फॅनी यांचा जन्म फ्री स्टेटमधील अफ्रिकानेर भाषिक कुटुंबात झाला. आजूबाजूची अनेक मुले रग्बी खेळत असल्याने त्यांनी देखील रग्बी खेळण्यास सुरुवात केली. रग्बीसोबतच ते कधीतरी क्रिकेट खेळत. फ्री स्टेट या ग्रामीण भागातून क्लायव्ह राईस, ग्रीम पोलॉक आणि गॅर्थ ले रॉक्स हे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तयार झाले होते. ज्यांची नावे मात्र, फॅनी यांना चांगली माहीत होती. शाळेत गेल्यानंतर, फॅनी यांना भालाफेकीचे प्रचंड वेड लागले. ते उत्तम भालाफेकपटू झाले असते. पण, लहान वयातच त्यांना पाठीची दुखापत झाल्याने त्यांनी भालाफेक बंद केली

भालाफेक सोडल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवला. ते आपल्या शाळेकडून क्रिकेट खेळू लागले. चांगली उंची असल्याने त्यांना संघाचा, वेगवान गोलंदाज बनवण्यात आले. फॅनी हे असे पहिले आफ्रिकन असतील, त्यांना वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत नेल्सन मंडेला कोण आहेत हे माहीत नव्हते. कॉलेजमधील एका कार्यक्रमात त्यांना मंडेला यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मंडेला यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. फॅनी अतिशय वेगात गोलंदाजी करत असल्याने सहकाऱ्यांनी त्यांचे नाव ‘विजी फॅनी’ असे ठेवले होते.

लेफ्टनंट फॅनी डिव्हिलियर्स
फॅनी हे वयाचे वीस वर्ष पूर्ण करण्याअगोदरच द. आफ्रिका सैन्यात लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचले होते. सैन्यातील कडक शिस्तीचा फायदा आपल्याला भविष्यात खूप झाला असे, फॅनी कबूल करतात. फॅनी सैन्यात असताना त्यांचा एक अपघात झाला होता. या अपघातामुळे त्यांना कायमचे अंधत्व आले असते. रस्ता बनवण्याच्या काम सुरु असताना तेथून जात असलेल्या फॅनीच्या डोळ्यात उकळता चुना उडाला. ऐनवेळी डोळे बंद केल्याने ते थोडक्यात बचावले. आजही जेव्हा ते डोळे मिटतात, तेव्हा त्या जखमेचे डाग त्यांच्या डोळ्यांवर दिसून येतात. सुरुवातीच्या काळात फॅनी यांना इंग्लिश भाषेविषयी प्रचंड तिटकारा होता. ते जास्त करून आपली पारंपारिक आफ्रिकन भाषा बोलत. द. आफ्रिकेकडून खेळत असतानाच १९९५ मध्ये त्यांनी मिस वर्ल्ड या सौंदर्य स्पर्धेचे ज्युरी म्हणून काम केले होते. महत्त्वाचे म्हणजे ही स्पर्धा भारताच्या ऐश्वर्या राय यांनी जिंकली होती.

सैन्यात असतानाच, फॅनी यांनी ट्रान्सवाल ब संघाकडून खेळताना नाताळ ब संघाविरुद्ध प्रथमश्रेणी पदार्पण केले. त्या सामन्यातील दुसऱ्या डावात त्यांनी बळींचे पंचक मिळवले. त्या पाच बळींपैकी एक राहिलेले अँड्र्यू हडसन पुढे बरीच वर्ष त्यांचे सहकारी होते.

नव्या द. आफ्रिका क्रिकेट संघाचे स्तंभ
द. आफ्रिका क्रिकेट संघावरील निलंबन उठल्यानंतर, संघाची नव्याने बांधणी केली जात होती. १९९२ मध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांना आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात ते बळी मिळविण्यात अपयशी ठरले. मात्र, त्यांनी अत्यंत कंजुषीने गोलंदाजी केली. पुढील एका वर्षातच त्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण देखील केले.

त्यांची पदार्पणाची कसोटी तितकीशी चांगली गेली नाही. पण, दुसऱ्या कसोटीत ते संघाच्या विजयाचे नायक ठरले. सिडनीच्या मैदानावर झालेल्या या कसोटीत, शेन वॉर्नने पहिल्या डावात पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाला १२३ धावांची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात देखील त्याने पाच बळी आपल्या नावे केले. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघे ११७ धावांचे आव्हान होते. पण, त्यानंतर फॅनी यांच्या ऑफकटर व आउट स्विंगची जादू चालली. त्यांनी ४३ धावांत ६ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव १११ धावांवर गुंडाळला. सामनावीर अर्थातच फॅनी ठरले होते.

याच सामन्याच्या अखेरच्या दिवशी टोनी ग्रेग म्हणाले होते, ‘द. आफ्रिका संघाला सामना जिंकण्याची चांगली संधी आहे.’ सामना जिंकल्यानंतर, फॅनी यांनी ग्रेग यांना त्यांच्या विधानाची आठवण करून देत म्हटले होते, ‘आफ्रिकन कधीच हार मानत नाहीत.’

नव्वदच्या दशकात जगभरातील सर्वच गोलंदाजांचा कर्दनकाळ ठऱलेला सचिन तेंडुलकर मात्र फॅनी यांची गोलंदाजी खेळताना अडखळत. फॅनी यांचे ऑफकटर चेंडू सचिनसाठी त्रासदायक ठरत. सचिनच नव्हे तर, सर्वच फलंदाजांना फॅनी यांचे ऑफकटर खेळायला अवघड जात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘चेंज ऑफ पेस’ ही गोलंदाजीची कला सुरु करण्याचे श्रेय फॅनी यांना जाते. १४० च्या वेगाने गोलंदाजी करणारे फॅनी मधेच ११० अशा वेगाने चेंडू टाकत.

फॅनी यांनी १८ कसोटी आणि ८३ एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कसोटीत २४.२७ च्या सरासरीने ८५ बळी घेतले. खालच्या स्थानावर येऊन ते उपयुक्त फलंदाजी देखील करत. त्यांच्या नावे दोन कसोटी अर्धशतके देखील आहेत. आपल्या एकदिवसीय कारकीर्दीत त्यांनी २४. ७४ च्या सरासरीने ९५ गडी बाद केले. त्यांनी घेतलेल्या बळींपेक्षा त्यांचा ३.५७ चा इकॉनॉमी रेट अत्यंत प्रभावी होता.

महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

दानशूर फॅनी
निवृत्तीनंतर फॅनी हे समालोचक बनले. माजी द. आफ्रिकन खेळाडू अँड्र्यू हॉल याच्यासोबत त्यांनी कर्णबधिर मुलांसाठी ‘हियर’ ही सामाजिक संस्था सुरू केली आहे. या संस्थेसाठी निधी उभारला जावा म्हणून, ते अनेक स्पर्धांचे आयोजन करत असतात.

…आणि फॅनी यांनी स्मिथ, वॉर्नर यांची चोरी पकडली
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ व कॅमेरून बॅनक्रॉफ्ट हे खेळाडू २०१८ च्या बॉल टेम्परिंग प्रकरणात सापडण्याचे प्रमुख कारण फॅनी हेच होते. त्या सामन्यात समालोचन करत असताना फॅनी यांना प्रश्न पडला की, सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळीच नवीन चेंडू इतका रिव्हर्स स्विंग कसा होत आहे ? या शंकेचे निरसन करण्यासाठी, त्यांनीच कॅमेरामनला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर नजर ठेवण्यास सांगितले होते.‌ फॅनी याची शंका खरी ठरली आणि हे प्रकरण उजेडात आले.

सध्या फॅनी ५६ वर्षांचे असून ते क्रिकेटशी संबंधीत वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतात.

वाचा-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज

-जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---