प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ किंवा त्यापेक्षा अधिक दिवस खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांचा समावेेश होतो. भारतात रणजी ट्रॉफी ही सर्वात मोठी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. याबरोबरच भारतात इराणी कप, दुलीप ट्रॉफी या प्रथम श्रेेणी स्पर्धा होतात.
या स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची संधीही असते. या लेखात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
पण या यादीत प्रथम श्रेणीमध्ये २४ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या रणजीत सिंग यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कारण ते इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळले आहेत. त्यांच्या नावावरुन रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळवली जाते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
१०. मोहम्मद अझरुद्दीन – (संघ – भारत, हैद्राबाद)
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १० व्या क्रमांकावर भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आहे. अझरुद्दीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २२९ सामने खेळताना ५१.९८ च्या सरासरीने १५८५५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ५४ शतकांचा आणि ७४ अर्धशतकांचा समावेश आहे. यातील ६२१५ धावा आणि २२ शतके अझरुद्दीनने ९९ कसोटी सामने खेळताना केल्या आहेत.
हैद्राबादकडून सर्वाधिक धावा करण्यामध्ये अझरुद्दीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये कारकिर्दीच्या पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतके करणारा अझरुद्दीने पहिला भारतीय खेळाडू आहे.
९. पॉली उम्रीगर – (संघ – भारत, पारसी,गुजरात, बॉम्बे)
४०, ५० आणि ६० च्या दशकात आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित करणारे पॉली उम्रीगर यांनी २४३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी खेळलेल्या ५९ कसोटी सामन्यांचाही समावेश आहे. त्यांनी ५२.२८ च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६१५५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या ४९ शतकांचा आणि ८० अर्धशतकांचा समावेश आहे. यातील ३६३१ धावा आणि १२ शतके आणि १४ अर्धशतके त्यांनी ५९ कसोटी सामन्यांमध्ये केली आहेत.
त्यांनी त्यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इंग्लंड क्रिकेट दौऱ्यावर असताना कँब्रिज युनिवर्सिटी विरुद्ध नाबाद २५२ धावांची खेळी केली होती. ही त्यांनी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तसेच ते कसोटीमध्ये द्विशतक करणारे पहिले क्रिकेटपटू आहेत.
एवढेच नाही तर त्यांनी गोलंदाजी करतानाही ३२५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या नावाने बीसीसीआयकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूला दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो.
८. दिलीप वेंगसरकर – (संघ – भारत, मुंबई,स्टाफर्डशायर)
भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८ व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १९७५-७६ ला प्रथम श्रेणी क्रिकेेटमध्ये पदार्पण केले होते. ते १९९२ पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होते.
त्यांनी २६० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५२.८६ च्या सरासरीने १७८६८ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या ५५ शतकांचा आणि ८७ अर्धशतकांचा समावेश आहे. यातील १७ शतके आणि ३५ अर्धशतकांसह ६८६८ धावा त्यांनी ११६ कसोटी सामने खेळताना केल्या आहेत.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची खेळी १९९१ ला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईकडून हरियाणा विरुद्ध खेळताना केली होती. त्यावेळी अंतिम सामन्यात ७० षटकात मुंबईला ३५५ धावांचे आव्हान होते. यावेळी त्यांनी नाबाद १३९ धावा केल्या होत्या मात्र विजयासाठी केवळ ३ धावा हव्या असतानाच शेवटचा फलंदाज अभी कुरुविल्ला धावबाद झाला.
पण वेंगसरांनी या शतकी खेळी नंतर १९९२ ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवले. त्या दौऱ्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली.
७. गुंडप्पा विश्वनाथ – (संघ – भारत, कर्नाटक, म्हैसुर)
७० आणि ८० दशकात भारतीय फलंदाजीचा महत्त्वाचा भाग असलेल्या गुंडप्पा विश्वनाथ यांनी १९६७-६८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३०८ प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्यांनी ४०.९३ सरासरीने १७९७० धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी ४४ शतके आणि ८९ अर्धशतके केली आहेत.
त्यातील ६०८० धावा आणि १४ शतके त्यांनी ९१ कसोटी सामने खेळताना केले आहेत. ते कर्नाटककडून सर्वाधिक धावा करणारे राहुल द्रविड नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे क्रिकेटपटू आहेत.
६. विजय हजारे – (संघ – भारत, बडोदा, महाराष्ट्र, मध्य भारत)
भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज फलंदाज म्हणजे विजय हजारे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बडोदा आणि महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट सामने खेळले आहेत. तसेच ते १९४५-१९५३ च्या दरम्यान भारताकडून ३० कसोटी सामने देखील खेळले आहेत.
त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २३८ सामन्यात ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावा केल्या आहेत. यात त्यांनी ६० शतके आणि ७३ अर्धशतके केली आहेत. त्यातील ७ शतके आणि २१९२ धावा त्यांनी ३० कसोटी सामने खेळताना केले आहेत. त्यांच्या नावाने भारतात देशांतर्गत वनडे स्पर्धाही खेळवण्यात येते.
५. वासिम जाफर – (संघ – भारत, मुंबई, विदर्भ, पश्चिम विभाग)
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज जाफरने अनेक वर्षे मुंबईकडून क्रिकेट खेळले. तो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे काही मोसम विदर्भाकडूनही खेळला. जाफरने भारताचेही २००० ते २००८च्या दरम्यान ३१ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते.
जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २६० सामने खेळताना ५०.६७ च्या सरासरीने १९४१० धावा केल्या आहेत. यात ५७ शतकांचा आणि ९१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यातील ५ शतके आणि १९४४ धावा त्याने ३१ कसोटी सामन्यांत केल्या आहेत. तसेच १२०३८ त्याने केवळ रणजी ट्रॉफीत खेळतानाच केल्या आहेत.
४. व्हीव्हीएस लक्ष्मण – (संघ – भारत, हैद्राबाद, लँकाशायर)
भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने २६८ प्रथम श्रेणी सामने खेळताना ५१.६४ च्या सरासरीने ५५ शतके आणि ९८ अर्धशतकांसह १९७३० धावा केल्या आहेत.
यातील १७ शतके आणि ५६ अर्धशतकांसह ८७८१ धावा त्याने १३४ कसोटी सामने खेळताना केले आहेत. तसेच त्याने हैद्राबादकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. त्याने १९९९-०० च्या रणजी ट्रॉफीमध्ये १४१५ धावा केल्या होत्या.
३. राहुल द्रविड – (संघ – भारत, कर्नाटक, कॅन्टरबरी)
‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेला राहुल द्रविडने अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या खेळी भारताकडून आणि कर्नाटक संघाकडून खेळताना केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९९०-९१ च्या मोसमात कर्नाटककडून पदार्पण केले होते.
त्याने त्याच्या कारकिर्दीत २९८ सामने खेळले आहेत. यात त्याने ५५.३३ च्या सरासरीने २३७९४ धावा केल्या असून यात त्याच्या ६८ शतकांचा आणि ११७ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच यातील ३६ शतके आणि ६३ अर्धशतकांसह १३२८८ धावा त्याने १६४ कसोटी सामने खेळताना केल्या आहेत.
द्रविड हा वनडे आणि कसोटी दोन्हीमध्ये १० हजारांहून अधिक धावा करणारा सचिन नंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू आहे.
२. सचिन तेंडुलकर – (संघ – भारत, मुंबई, यॉर्कशायर)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाकडूनच नाही तर मुंबईकडून खेळतानाही मोठे विक्रम केले आहेत. त्याने १९८८-८९ च्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत ३१० प्रथम श्रेणी सामने खेळताना ५७.८४ च्या सरासरीने २५३९६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८१ शतकांचा आणि ११६ अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच यातील ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांसह १५९२१ धावा त्याने भारताकडून कसोटी सामने खेळताना केल्या आहेत. तो कसोटीमध्ये जगातील सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
१. सुनील गावसकर – (संघ – भारत, मुंबई, सोमरसेट)
‘लिटिल मास्टर’ सुनील गावसकर यांनी ७०-८० चे दशक त्यांच्या शानदार फलंदाजीने गाजवले आहे. १९६६ ला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गावसकरांनी त्यांच्या कारकिर्दीत ३४८ प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्यांच्या १२५ कसोटी सामन्यांचा समावेश आहे.
त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५१.४६ च्या सरासरीने २५८३४ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या ८१ शतकांचा आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे. यातील १०१२२ धावा आणि ३४ शतके त्यांनी भारताकडून कसोटीमध्ये खेळताना केले आहेत.
तसेच ते कसोटीमध्ये १०, ००० धावा करणारे पहिले क्रिकेटपटू आहेत. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू आहेत.
ट्रेंडिग लेख –
रणजी ट्रॉफी इतिहासात फक्त एकदाच एकाच वर्षात झाल्या होत्या दोन फायनल
७ असे खेळाडू ज्यांच्याबरोबर रोहित खेळला आहे क्रिकेट, पण नाव कुणालाही नाही आठवत
ड्रीम ११: लग्न न झालेल्या क्रिकेटपटूंची टीम इंडिया