१८७७ पासून सुरु झालेल्या कसोटी क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत ७३००० विकेट्स पडल्या आहेत. क्रिकेटमध्ये साधारणत: फलंदाज ११ पद्धतीने बाद होऊ शकतो.
त्यातील त्रिफळाचीत, झेलबाद, यष्टीचीत, धावबाद अशा पद्धतीने फलंदाज साधारण बऱ्याचदा बाद होतो. पण दोनदा चेंडू फटकावल्याने, वेळेत मैदानात न पोहचल्याने (टाईम आऊट), हिट विकेट, खेळात अडथळा आणल्याने, रिटायर्ड आऊट, चेंडू हाताळल्याने बाद होणे, अशा पद्धतीने फलंदाज होताना पहाणे खूप दुर्मिळ आहे.
क्रिकेटमधील नियम तयार करण्याचे किंवा बदलण्याचे अधिकार लंडनमधील मेरिलबॉन क्रिकेट क्लबकडे (एमसीसी) आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज सर्वात कमी वेळा बाद होणाऱ्या ३ पद्धतींचा घेतलेला हा आढावा –
चेंडू हाताळल्याने बाद होणे –
क्रिकेटमध्ये चूकीच्या हेतूने उदाहर्णार्थ फलंदाजी करताना चेंडू स्टंपला लागू नये म्हणून जर फलंदाजाने बॅट ऐवजी हाताने चेंडू आडवला किंवा हाताळला तर त्याला बाद देण्यात येते. अशा प्रकारे सर्वात आधी १९५७ ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात केपटाऊन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे रसेल एन्डीन बाद झाले होते.
त्यानंतर आत्तापर्यंत एकूण ७ फलंदाज अशा प्रकारे बाद झाले आहेत. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन अशा प्रकारे बाद होणारे शेवटचे फलंदाज. ते २००१ मध्ये बंगळुरु येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान असे बाद झाले होते.
रिटायर्ड आऊट –
रिटायर्ड आऊट म्हणजे जर एखादा खेळाडू सामना सुरु असताना पंचांची परवानगी न घेता मैदानाबाहेर गेला किंवा रिटायर झाला आणि जर त्याला प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने त्याची खेळी पून्हा सुरु करण्याची परवानगी दिली नाही तर त्याला रिटायर्ड आऊट दिले जाते.
जर प्रतिस्पर्धी संघाच्या संघाच्या कर्णधाराने त्याला पुन्हा खेळण्याची परवानगी दिली तरच तो खेळू शकतो. अन्यथा त्याला रिटायर्ड आऊट म्हटले जाते. १४३ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत अशाप्रकारे केवळ २ खेळाडू बाद झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू एकाच सामन्यात असे बाद झाले आहेत.
२००१ ला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात कोलंबो येथे झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचे फलंदाज मार्वन अट्टापट्टू आणि माहेला जयवर्धने अनुक्रमे २०१ आणि १५० धावा पूर्ण केल्यानंतर पंचांची संमती न घेताच मैदानाबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांना रिटायर्ड आऊट देण्यात आले होते.
अनेकदा रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्ट या क्रिकेटमधील संज्ञांमध्ये अनेकांची गल्लत होऊ शकते. पण या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. रिटायर्ड हर्ट म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू दुखापतीमुळे किंवा आजारी असल्याने मैदान सोडतो. कारण त्याला मैदानाबाहेर उपचाराची गरज असते. तेव्हा तो खेळाडू उपचारानंतर पुन्हा खेळायला जाऊ शकतो. पण जर तो खेळाडू पुन्हा मैदानात येऊ शकला नाही तर त्याला ‘रिटायर्ड नॉट आऊट’ दिले जाते.
वेस्ट इंडिजचे गोर्डन ग्रिनिज हे रिटायर्ड आऊट या नियमासाठी अपवाद ठरले होते. झाले असे की १९८३ ला वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान दिवसाखेर १५४ धावांची खेळी केल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीची तब्येत बिघडल्याचे समजल्याने ते बार्बाडोसला परतले होते. त्यानंतर ते हा सामना खेळले नाहीत. या सामन्यानंतर २ दिवसांनी त्यांच्या २ वर्षाच्या मुलीचे निधन झाले. त्यामुळे त्या सामन्यात त्यांच्या सन्मानार्थ त्यांना ‘रिटायर्ट नॉट आऊट’ देण्यात आले होते.
खेळात अडथळा आणल्याने बाद होणे –
कसोटी क्रिकेटमध्ये अशा प्रकारे केवळ १ फलंदाज बाद झाला आहे. १९५१ मध्ये द ओव्हल, लंडन मध्ये इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या सामन्यात सर लिओनार्ड हटन हे इंग्लंडचे फलंदाज खेळात अडथळा आणल्यामुळे बाद झाले होते.
झाले असे की १०० वा कसोटी सामना खेळणारे हटन फ्रँक लावसनसह विजयासाठी १६३ धावांचा पाठलाग करत होते. त्यावेळी त्यांनी ५३ धावांची सलामी भागीदारीही रचली होती. परंतू दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू ऍथॉल रोवनने टाकलेला एक चेंडू हटन यांच्या ग्ल्व्हजला लागून त्यांच्या हातावर पडून मागे उडाला.
त्यावेळी त्यांनी चेंडू स्टंपला लागण्यापासून वाचवला पण याचदरम्यान त्यांनी नकळत दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक रसल एन्डीनलाही झेल घेण्यापासून रोखले. त्यामुळे अखेर त्यांना बाद देण्यात आले.
ट्रेंडिंग घडामोडी –
बापरे! एमएस धोनीला कूल कॅप्टन्सीसाठी मिळाला होता सामनावीर पुरस्कार
ऑस्ट्रेलियाने ६ महिन्यासाठी बंद केल्या सीमा, भारताचा हा महत्त्वाचा दौरा होणार रद्द
आणि फिल्डरला अद्भुत कामगिरीसाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच