---Advertisement---

भारतीय संघात ‘या’ तिघांचे स्थान सर्वात मजबूत, २०२३ विश्वचषकापर्यंत संघाबाहेर होण्याची शक्यता कमीच

On: बुधवार, नोव्हेंबर 24, 2021 3:06 PM
team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. रवी शास्त्रींनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांनी स्वीकारले आहे. संघ द्रविडच्या मार्गदर्शानात चांगली कामगिरी करण्याची भारतीय संघाकडून अपेक्षा आहे. तसेच रोहित शर्माच्या रूपात नवीन टी२० कर्णधार मिळाला आहे. संघाच्या या नव्या पर्वात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंनी जास्त संधी दिल्या जातील, असे म्हटले जात आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सध्या खेळल्या जाणाऱ्या मालिकेत हे बदल पाहायला मिळू लागले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत दोन युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली गेली, तर संघातील वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर आहेत. ज्या युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे, ते स्वतःला सिद्ध करण्यास पात्र ठरले आहे.

दुसरीकडे, शिखर धवन, कुलदीप यादव, अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या दिग्गजांना संघात स्थान मिळवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्याला देखील पर्यायी खेळाडू समोर येऊ लागले आहेत.

अशात सध्याच्या संघात असे काही खेळाडू आहेत जे अजून दीर्घ काळापर्यंत संघात स्वतःचे स्थान कायम ठेवू शकतात. आपण या लेखात अशाच तीन भारतीय खेळाडूंंबाबत विचार करणार आहोत, जे पुढे बऱ्याच काळापर्यंत संघातील त्यांचे स्थान कायम ठेऊ शकतात.

१. रोहित शर्मा
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मैदानावर प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे. त्याला आव्हान देणारा कोणताच युवा खेळाडू अजूनपर्यंत भारतीय संघात आलेला नाही. अशात विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितवर टी२० संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली आहे. संघाने रोहितच्या नेतृत्वात पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे.

याबरोबरच अशीही शक्यता आहे की, जर विराटने एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला, तर रोहित एकदिवसीय संघाची देखील कमान सांभाळू शकतो. अशात आगामी विश्वचषकात जर, तो संघाचे नेतृत्व करताना दिलसा, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

रोहित सध्याच्या भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी ४३ कसोटी सामने, २२७ एकदिवसीय सामने आणि ११९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. सध्याच्या स्थितीत कोणताच असा सलामीवीर फलंदाज नाही, जो रोहितची जागा घेऊ शकतो.

२. विराट कोहली-
भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली मागच्या काही काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. त्याने मागच्या दोन वर्षांमध्ये एकही शतक केले नाही. असे असले तरी, या दरम्यान त्याने जेव्हा जेव्हा चांगली खेळी केली आहे, तेव्हा नवीन व्रिकम बनले आहेत किंवा इतरांचे विक्रम तुटले आहे. विराट आजही जगभरातील दिग्गज गोलंदाजांना घाम फोडतो.

सध्या अजून एकही खेळाडू समोर आलेला नाही, जो आगामी काळात विराटची जागा घेऊ शकेल. विराट भारतासाठी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर तर कसोटीत चौथ्या खेळतो, तसेच तो वेळप्रसंगी पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावर देखील खेळू शकतो. विराटची फिटनेस पाहून हेच दिसते की, तो अजून खूप काळ क्रिकेट खेळू शकतो. अशात २०२३ विश्वचषकापर्यंत त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे.

३. रिषभ पंत
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दिवसेंदिवस संघाचा महत्वाचा खेळाडू बनत चालला आहे. एमएस धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पंत संघात धोनीची जाग घेत आहे. यादरम्यान रिषभ पंत अनेकदा अपयशी देखील ठरला होता, पण संघ व्यवस्थापनाने त्याला अनेकदा संधी दिल्या आणि सध्या तो संघाचा महत्वाचा सदस्य आहे.

पंत यष्टीरक्षणासोबतच फलंदाजीत महत्वाची भूमिका पार पाडत आहे. त्याने अनेकदा अंतिम षटकांतील दबावाच्या स्थितीत संघाला विजय मिळवून दिला आहे. अशात सध्याच्या स्थितीत रिषभ पंतची जागा घेईल, असा एकही युवा खेळाडू दिसत नाही. पंतला आगामी विश्वचषकात संघासाठी खेळताना पाहिले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कानपूर कसोटीसाठी ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची ‘प्लेइंग इलेव्हन’

हरमनप्रीत कौरने उंचावली कोट्यवधी भारतीयांची मान! बीबीएल स्पर्धेत पटकावला ‘मोठा’ पुरस्कार

केव्हा आणि कुठे सुरू होणार आयपीएल २०२२ स्पर्धा? मोठी अपटेड आली समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---