रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बंगलोर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा २३८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या दिवस-रात्र कसोटीत भारताने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला आहे. श्रीलंकेवरील या विजयामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्येही खूप मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ आता एका स्थानाने वर म्हणजेच चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यापूर्वी भारत पाचव्या स्थानावर होता, परंतु श्रीलंकेला २-० ने क्लीन स्वीप दिल्यानंतर भारताचे १२ गुण झाले आहेत आणि विजयाची सरासरी ५८.३३ वर गेली आहे.
तसेच, श्रीलंका संघाला दोन पराभवांचा सामना करत कसोटी मालिकेत क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता श्रीलंका संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी ५० इतकी कमी झाली आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारत सध्या ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघानंतर चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ७७.७७ आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानची विजयाची टक्केवारी ६६.६६ आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ६० आहे. भारताने आतापर्यंत एकूण चार मालिकेत ११ सामने खेळले आहेत. यापैकी २०१४ मध्ये भारताने यश मिळवले, तर ३ सामन्यांत भारताला अपयश आले आहे. उरलेले २ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
दुसरी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी २०२३ मध्ये खेळली जाईल. याअगोदर भारताला आणखी ७ सामने खेळायचे आहेत. भारत इंग्लंडसोबत एक, तर बांगलादेशविरुद्ध २ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात ४ कसोटी खेळणार आहे. भारताने हे सामने जिंकले तर ते सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतात. २०२१ मध्ये भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला अंतिम सामना खेळला होता. परंतु न्यूझीलंडकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी कराचीमध्ये खेळली जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना जिंकला, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ पाकिस्तानच्या वर जाईल आणि प्रथम तीनमध्ये स्थान मिळवेल.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितसेनेचा ऐतिहासिक विजय.! निर्णायक कसोटीत श्रीलंकेला २३८ धावांनी धूळ चारत रचला इतिहास
आर अश्विनचा डेल स्टेनला ‘४४०’चा झटका, अद्वितीय कारकिर्दीत जोडली आणखी एक सोनेरी किनार