आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग सलग दुसऱ्यांदा बंद दाराआड आणि विनाप्रेक्षक पार पडेल. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्रथमच ही स्पर्धा जिंकण्यासाठी आतुर आहे.
गत हंगामात आरसीबीने प्ले ऑफपर्यत मजल मारली होती. यावर्षी आरसीबीने आपल्या संघात डॅन ख्रिस्टीयन, ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, मोहम्मद अझहरुद्दीन, फिन ऍलन यासारख्या खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना संघाकडून मोठी अपेक्षा असेल.
एबी डिव्हिलियर्स
आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावे अनेक शानदार विक्रम आहेत. आयपीएल कारकीर्दीत त्याने जगभरातील दिग्गज गोलंदाजांसमोर धावा केल्या आहेत. मागील हंगामातही त्याने आपला संघ आरसीबीसाठी बऱ्याच धावा केल्या होत्या आणि तो संघाचा तिसरा सर्वाधिक यशस्वी फलंदाज बनलेला. त्याने १५ सामन्यांत २८६ चेंडूंचा सामना करत ४५४ धावा केल्या होत्या. यावेळी डिव्हिलियर्सला फलंदाजीची पुरेपूर संधी मिळाल्यास तो या हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा करू शकतो.
देवदत्त पडीक्कल
आयपीएल २०१९ च्या लिलावात कर्नाटकचा युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलला आरसीबीने विकत घेतले होते. त्या मोसमात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नसली तरी, घरगुती क्रिकेटमधील उत्तम कामगिरीमुळे त्याला आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पडीक्कलने पदार्पणाचा हंगाम संस्मरणीय केला आणि गेल्या हंगामात तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. पडीक्कलने १५ डावांमध्ये ५ अर्धशतके झळकावत ४७३ धावा केल्या होत्या. या हंगामापूर्वी पडीक्कल चांगल्या लयीमध्ये आहे आणि तो पुन्हा एकदा आरसीबीसाठी सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून सिद्ध होऊ शकतो.
विराट कोहली
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या व्यतिरिक्त विराट आपल्या संघासाठी प्रत्येक हंगामात उत्तम प्रदर्शन करत, आपल्या संघाची फलंदाजी मजबूत करतो. मागील हंगामात विराट १५ सामन्यांत ४६६ धावा काढून संघाचा दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज बनलेला. आगामी आयपीएल हंगामात विराट पुन्हा एकदा आपल्या संघाचा अग्रणी फलंदाज बनू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक डॉट बॉल खेळणारे फलंदाज, एकाने तर जिंकली होती ऑरेंज कॅप
आयपीएल रेकॉर्ड्स – एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणारे खेळाडू
भविष्यातील स्टार! ६ वर्षांच्या चिमुकल्याची फटकेबाजी पाहून व्हाल थक्क; माजी कर्णधारानेही केलंय कौतुक