भारत आणि श्रीलंका (IND vs SL Test Series) यांच्यातील कसोटी मालिका शुक्रवारी (४ मार्च) सुरू होईल. पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाणार आहे, जो विराट कोहली (Virat Kohli) याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असणार आहे. विराट कोहलीसाठी हा सामना अनेक कारणांमुळे महत्वाचा ठरणार आहे, कारण तो यावेळी अनेक मोठे विक्रम करू शकतो.
या सामन्यात विराट कसोटी क्रिकेटमधील त्याच्या ८००० धावा पूर्ण करू शकतो. तसेच त्याच्या शतकाचा दुष्काळ संपून रिकी पॉंटिंगच्या ७१ आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरीही करू शकतो. आपण या लेखात विराटच्या अशाच १० विक्रमांवर नजर टाकणार आहोत.
१. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये राखली ५० पेक्षा अधिकची सरासरी
विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू आहे, ज्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) ५० पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. ४५७ आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर विराटची कसोटी क्रिकेटमधील सरासरीने ५०.३९ आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५८.०७ आहे आणि टी-२० मधील सरासरी ५१.५० ची आहे.
२. भारतासाठी सर्वाधिक द्विशतक करणारा खेळाडू
विराट कोहली एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ७ वेळा द्विशतक ठोकली आहेत. त्याने या प्रदर्शनाने सिद्ध केले आहे की, तो जास्त वेळापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहू शकतो. असे असले तरी, टी-२० क्रिकेटमध्ये त्याला अद्याप एकही शतक करता आलेले नाही.
३. सर्वात जास्त कसोटी शतके ठोकणारा दुसरा कर्णधार
विराट कोहली कर्णधाराच्या रूपात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतके करणारा जागातील दुसरा खेळाडू आहे. कर्णधाराच्या रूपात त्याने २० कसोटी शतक केले आहेत. दक्षिण अफ्रिकी दिग्गज ग्रॅमी स्मिथ यांनी कसोटी कर्णधाराच्या रूपात सर्वात जास्त २५ शतके केले आहेत.
४. सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये यशाच्या शिखरावर
सध्यास्थितीत भारतीय संघासाठी सर्वात जास्त कसोटी शतक करणारा खेळाडू विराट कोहली आहे. त्याने आतापर्यंत २७ कसोटी शतके केले आहेत. सध्यास्थितीत जे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत, त्यापैकी स्टीव स्मिथ एकमेव आहे, जो विराटच्या बरोबरीत आहे. त्यानेही २७ कसोटी शतके केली आहेत.
५. कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पण सामन्यात दोन शतके करणारा पहिला भारतीय
विराट कोहली जगातील दुसरा कर्णधार आहे, ज्याने कसोटी कर्णधारपदाच्या पहिल्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी केली होती. या विक्रमामध्ये विराटने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपलची बरोबरी केली होती. २०१४ मध्ये नियमित कर्णधार एमएस धोनीला दुखापत झाल्यानंतर विराटने कसोटी संघाची कमान सांभाळली होती आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी केली होती.
६. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार
विराट कोहली भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. याबाबतीत त्याने भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि एसमएस धोनी यांना मागे टाकले आहेत. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ६८ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ४० सामने जिंकले आहेत.
७. जागतिक क्रिकेटमध्ये एका वर्षात दोन वेळा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
जागतिक क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी विराट कोहलीने दोन वेळा केली आहे. अशी कामगिरी करणारा तो भारतीय संघाचा पहिला खेळाडू आहे. २०१७ मध्ये त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये मिळून २८१८ धावा केल्या होत्या, तसेच २०१६ मध्ये २५९५ धावा केल्या होत्या.
८. सर्वात जास्त वेळा १५० धावांपेक्षा मोठी खेळी करणारा कर्णधार
विराट कोहली जगातील पहिला कर्णधार आहे, ज्याने कर्णधाराच्या रूपात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा १५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे. कर्णधाराच्या रूपात त्याने ९ वेळा १५० पेक्षा मोठी खेळी केली आहे.
९. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे विराट
विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही प्रकरांमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज राहिला आहे. भारतीय संघासाठी ही कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. तो सर्वप्रथम २०१३ मध्ये एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. त्याने पुढच्या दोन वर्षात टी-२० क्रमवारीतही त्याने पहिले स्थान मिळवले. कसोटी क्रमवारीत २०१८ मध्ये विराटने स्टीव स्मिथची बादशाहत संपवत पहिला क्रमांक मिळवला होता.
१०. दोन संघाविरुद्ध लागोपाठ तीन वेळा शतक ठोकणारा खेळाडू
विराट जागतिक क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे, ज्याने दोन संघांविरुद्ध सलग ३ शतके ठोकली आहेत. त्याने ही कामगिरी वेस्ट इंडीज आणि श्रीलंका संघासोबत खेळताना केली आहे.