आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेला अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहे. ही स्पर्धा तब्बल ५ वर्षांनी खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे शेवटचे आयोजन २०१६ साली झाले होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी अनेक संघांनी आपला १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला.
त्यातच नुकतेच भारतीय संघाने देखील बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली, तर असेही काही खेळाडू आहेत ज्यांना या संघातून वगळण्यात आले. मात्र निवडण्यात आलेल्या या संघात असेही काही खेळाडू आहेत, जे २०१४ आणि २०१६ सालच्या टी२० विश्वचषकातही खेळले. याच खेळाडूंबद्दल आढावा घेऊ.
विराट कोहली –
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची ही चौथी टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे. याआधी कोहलीने २०१२, २०१४ आणि २०१६ साली टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली होती. २०१४ साली कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला होता. कोहलीने त्या स्पर्धेत ४ अर्धशतकांच्या मदतीने तब्बल ३१९ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याची सरासरी १०६.३३ इतकी होती. तसेच कोहलीची या स्पर्धेत ७७ धावांची सर्वोच्च खेळी होती.
त्यानंतर कोहली २०१६ साली सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने या स्पर्धेत ५ सामन्यात १३६ च्या सरासरीने २७३ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे तेव्हा कोहलीचा स्ट्राइक रेट देखील १४६ च्यावर होता.
आता ही कोलीची चौथी टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे. कोहलीच्या नेतृत्वपदात भारतीय संघाने आतापर्यंत एकदाही आयसीसीचे जेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत कोहलीकडे ही स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
रोहित शर्मा –
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा त्याची सातवी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. सर्वात प्रथम रोहितने २००७ साली ही स्पर्धा खेळली होती. त्यावेळी रोहितने दमदार प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधले होते. रोहित सलग ७ टी२० विश्वचषक स्पर्धा खेळणार पहिला आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.
रोहितने २०१४ साली खेळलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत २०० धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने २ अर्धशतक लगावले होते. तर ६२ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी होती. त्यानंतर मात्र २०१६ सालच्या स्पर्धेत रोहित फारशी कमाल करता आली नाही. या स्पर्धेत रोहितने ५ सामन्यात १७.८ च्या सरासरीने केवळ ८८ धावा केल्या होत्या.
रवींद्र जडेजा –
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या रवींद्र जडेजाने २०१४ सालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ सामन्यांमध्ये केवळ ५ विकेट घेतल्या होत्या. तर २०१६ साली जडेजाने ५ सामन्यात केवळ ४ च विकेट घेतल्या होत्या. यंदा टी२० विश्वचषकात खेळण्याची जडेजाची ५ वी वेळ आहे. तो सर्वप्रथम २००९ साली या स्पर्धेत भारतीय संघात होता.
रविचंद्रन अश्विन –
फिरकीपटू गोलंदाज अश्विनची यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या टी२० संघात तब्बल ४ वर्षांनी वर्णी लागली. अश्विन तब्बल ४ वर्षांनंतर मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघातून पुनरागमन करणार आहे. तेही सरळ टी-२० विश्वचषक स्पर्धेत.
यापूर्वी अश्विनने २०१४ साली खेळलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत कमालीची गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत स्पर्धेत तब्बल ११ विकेट्स घेतल्या होत्या. त्यातील हाशिम आमलाची घेतलेली ती विकेट आजही चाहत्यांच्या मनात वेगळेच घर करून आहे.
यानंतर अश्विनने २०१६ साली खेळलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ५ सामन्यात केवळ ४ विकेट घेतल्या होत्या.
मोहम्मद शमी –
२०१४ सालची टी-२० विश्वचषक स्पर्धा मोहम्मद शमीसाठी तितकीशी चांगली गेली नाही. यामध्ये त्याला केवळ ३ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्यातही तो भारतीय संघाकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला. ज्यानंतर शमीने २०१६ साली देखील टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली होती.
सध्या शमी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तसेच शमीने आयपीएलमध्ये देखील आपले गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याला टी-२० विश्वचषक स्पर्धेत कमाल करण्याची चांगली संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्याचे कळताच कशी होती राहुल चाहरची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
–“संघात निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन, पण मला चहल व शिखरची निवड न झाल्याचे दु:ख”
–एमएस धोनीला मेंटर केल्यानंतर सुनील गावसकरांना आनंदाबरोबर सतावतेय ‘या’ गोष्टीची चिंता