आयपीएल २०२१ च्या मिनी लिलावासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहेत. जगभरातील अनेक प्रसिद्ध खेळाडूंवर या लिलावात बोली लावण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये क्रिकेटविश्वातील सर्व नामांकित खेळाडू खेळण्यासाठी आतुर असतात. यामागील कारण म्हणजे करोडोंमध्ये मिळणारा पैसा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष अशा खेळाडूंकडे असेल ज्यांच्यावर यावर्षी मोठी बोली लागू शकते. उद्याच्या लिलावात ज्या ५ विदेशी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होऊ शकतो, त्याविषयी आपण जाणून घ्या.
१) ग्लेन मॅक्सवेल
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व क्रिकेटप्रेमींची नजर ग्लेन मॅक्सवेलवर असेल. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत तीन संघांचे प्रतिनिधित्व केलेला मॅक्सवेल २०१४ आयपीएल व्यतिरिक्त आपली छाप पाडू शकला नाही. तरीही, दर वेळी त्याच्यावर करोडोंची बोली लावली जाते. आयपीएल २०२० मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी १३ सामने खेळताना तो अवघ्या १०८ धावा काढू शकला होता.
मात्र, तरीही मॅक्सवेलची मोठे फटके मारण्याची क्षमता, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दीर्घ अनुभव व उपयुक्त ऑफस्पिन गोलंदाजी हे कौशल्य पाहून अनेक संघात यावर बोली लावण्यासाठी पुढे येतील. या लिलावात मॅक्सवेलला ५-८ कोटी दरम्यान रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
२) शाकिब अल हसन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला बांगलादेशचा शाकिब अल हसन यावर्षी लिलावासाठी उपलब्ध आहे. आयसीसीने लादलेल्या निलंबनामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने मागील वर्षी त्याला करारमुक्त केले होते. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज व कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करण्याची क्षमता यामुळे शाकिब या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो.
निलंबनानंतर परत आलेल्या शाकिबने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळवत यशस्वी पुनरागमन केले. आगामी लिलावात किंग्स इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स हे संघ त्यावर बोली लावण्याची शक्यता आहे. शाकिबची बोली १० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
३) स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ या लिलावातील सर्वात मागणी असलेला खेळाडू ठरू शकतो. गतवर्षी राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद भूषविलेल्या स्मिथला यावर्षी चांगली बोली लागू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा अनुभव तसेच वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विश्वासू फलंदाज म्हणून तो बर्याच संघांसाठी फायदेशीर ठरेल.
सध्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ संक्रमणाच्या काळातून जातोय. तसेच त्यांना अनुभवी फलंदाजाची आवश्यकता आहे. अशीच अवस्था रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे असल्याने हे दोन्ही संघ स्मिथला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी आतुर असतील. स्मिथ ही पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम या लिलावात मिळवू शकतो.
४) ख्रिस मॉरिस
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी अष्टपैलू ख्रिस मॉरिस गावातील महागड्या खेळाडूंमध्ये मोजला जाण्याची शक्यता आहे. मॉरीसला आयपीएल खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना त्याने आपली छाप सोडली होती. मात्र, त्यानंतरही आरसीबी संघ व्यवस्थापनने त्याला करारमुक्त केले.
आपल्या आक्रमक फलंदाजीने तसेच वेगवान गोलंदाजीने तो कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे पलटवू शकतो. वेगवान गोलंदाज शोधत असलेले राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स हे संघ त्याच्यावर बोली लावू शकतात. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील तो लिलावात कोट्यावधी रुपये मिळवणार हे नक्की आहे.
५) डेव्हिड मलान
सध्या फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडच्या डेव्हिड मलानवर लिलावात सर्व फ्रेंचायजींची नजर असेल. मलान या वर्षी प्रथमच आयपीएल लिलावात सहभागी होत आहे. सातत्यपूर्ण कामगिरीसाठी प्रसिद्ध असणारा मलान या लिलावात कोट्यावधी रुपये मिळवून प्रथम आयपीएलमध्ये खेळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलाव २०२१ : कधी आणि कुठे होणार लिलाव, कोणकडे आहेत सर्वाधिक पैसे? जाणून घ्या सर्वकाही
आयपीएल लिलाव : १४ व्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूंना संघात सामील करु शकतो बेंगलोर संघ