आयपीएल 2020 स्पर्धेचा शेवट मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा विजयासह केला. पाचव्यांदा आयपीएल किताब जिंकण्याचा विक्रम मुंबईने त्यांच्या नावावर केला आहे. आणि आता मुंबई हा आयपीएल मधील एकमात्र यशस्वी व बलाढ्य संघ ठरला आहे. 2020 चा अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
आयपीएल 2020 च्या हंगामात संघाला पुढे नेण्यामागे काही खेळाडूंनी आपला सिंहाचा वाटा उचलला आहे. या खेळाडूंनी संघाला दिलेले योगदान व केलेला खेळ हा जबरदस्त व बहारदार होता.
असे ५ खेळाडू ज्यांनी 2020 च्या हंगामात केली महत्त्वपूर्ण कामगिरी
1. शिखर धवन
शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीला खेळताना 2020 च्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या सामन्यांत मोठी धावसंख्या न करू शकणाऱ्या धवनने पुढे मोठ- मोठ्या खेळी केल्या. त्याने या हंगामात सलग दोन शतके आणि 4 अर्धशतकेदेखील केली आहेत. त्याने 17 सामन्यांत 618 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या यादीत तो के एल राहुल (670) नंतर दुसऱ्या स्थानी आहे.
2. कागिसो रबाडा
दिल्लीच्या संघातून या हंगामातही कागिसो रबाडाने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने महत्त्वाच्या क्षणी बळी घेत संघाला मजबूत परिस्थितीत आणून सामने जिंकवून दिले आहेत. रबाडाने 17 सामन्यांत सर्वाधिक 30 बळी मिळवले आहेत. यासह तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. मात्र अंतिम सामन्यात त्याला फक्त एकच बळी मिळवता आला.
3. जसप्रीत बुमराह
आयपीएल 2020 च्या हंगामातही मुंबईच्या संघासाठी बुमराहच महत्त्वाचा गोलंदाज ठरला आहे. ट्रेंट बोल्ट समवेत यंदाच्या हंगामात त्याने विरोधी संघावर हल्ला चढवला आहे. पर्पल कॅपच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. बुमराहने 15 सामन्यांत 27 बळी घेतले आहेत.
4. सूर्यकुमार यादव
मुंबईच्या संघात तिसऱ्या स्थानी फलंदाजी करून सूर्यकुमारने उत्तम खेळ केला आहे. सलामीचा फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर त्याने संघाचा मोर्चा टिकून धरण्याचे काम केले होते. सूर्यकुमारने 16 सामन्यांत 480 धावा केल्या असून त्यात 4 अर्धशतकी खेळ्या समाविष्ट आहेत.
5. एबी डिविलियर्स
एबी डिविलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना या हंगामातही उत्तम खेळ केला. सुरुवातीला साधारण खेळ करणाऱ्या डिविलियर्सने पुढे अफलातून कामगिरी केली आणि आपली 360 डिग्रीची झलकही दाखवून दिली. डिविलियर्सने या हंगामात 15 सामन्यांत 5 अर्धशतकांसह 454 धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: एकेकाळी मैदान गाजवणारे ५ मोठे खेळाडू; या हंगामात ठरले सपशेल फ्लॉप
-मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी
-गोलंदाजीचे शेर! आयपीएलच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे ३ गोलंदाज