इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम स्थगित झाल्यानंतर सर्वांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. १८ ते २२ जून या कालावधीत साउथम्पटन येथील द रोज बाउल स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हा सामना रंगणार आहे. तत्पुर्वी ७ मे रोजी भारतीय नियामक मंडळाने २० सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. सोबतच ४ राखीव खेळाडूंना संधी दिली आहे.
परंतु भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या खेळाडूंपैकी असे काही खेळाडू आहेत, ज्यांचे मागील काही काळातील प्रदर्शन पाहता त्यांची निवड करत संघ व्यवस्थापनाने आपल्याच पायावर दगड मारुन घेतल्यासारखे झाले आहे. चला तर पाहूया, कोण आहे ते खेळाडू आणि त्यांची निवड चुकीची ठरण्यामागील कारणे..
शुबमन गिल- गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून २१ वर्षीय शुबमन गिलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. मेलबर्न कसोटी सामना हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना ठरला होता. या कसोटी मालिकेत ३ सामने खेळताना त्याने २५९ धावा करत आपल्या प्रतिभेची छाप पाडली होती. याच कामगिरीच्या बळावर त्याला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत संधी दिली गेली होती. परंतु इंग्लंडविरुद्ध तो सपशेल फ्लॉप ठरला. त्याने ४ कसोटी सामने खेळताना इंग्लंडविरुद्ध फक्त ११९ धावा केल्या.
एवढेच नव्हे तर, आयपीएल २०२१ मध्येही त्याची फलंदाजी थंडावल्याचे दिसले. अशात खराब फॉर्ममध्ये असलेल्या गिलला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संधी देणे हा एक जोखमीचा निर्णय ठरू शकतो.
हनुमा विहारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या मागील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत टेस्ट स्पेशलिस्ट हनुमा विहारी लौकिकास साजेशी कामगिरी करु शकला नव्हता. ३ सामन्यात फलंदाजी करताना त्याने अवघ्या ७२ धावा केल्या होत्या. सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात दुखापतीवर दुर्लक्ष करत त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत चिवट झुंज दिली होती. त्याच्या योगदानामुळे भारतीय संघ तो सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला होता. परंतु या सामन्यात १६१ चेंडूंचा सामना करताना त्याने अवघ्या नाबाद २३ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२१ लिलावात अनसोल्ड राहिल्याने त्याने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी काउंटी क्रिकेट खेळण्याचे ठरवले. परंतु तिथेही त्याचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिले. त्याने आतापर्यंत काउंटी क्रिकेटमध्ये वार्विकशायर संघाचे प्रतिनिधित्व करताना केवळ १०० धावा केल्या आहेत. दरम्यान तो दोन वेळा शून्यावर बाद झाला आणि दोन वेळा ८ धावा करु शकला आहे. केवळ ऍसेक्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ३२ चेंडूत ५२ धावांची चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे विहारीची निवड नक्कीच संघ व्यवस्थापनाचा चुकीचा निर्णय असू शकतो.
वॉशिंग्टन सुंदर- भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदर याने मागील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु गोलंदाजीत तो प्रभावी कामगिरी करु शकला नव्हता. दोन्ही संघाविरुद्ध मिळून एकूण ४ कसोटी सामने खेळताना त्याने फक्त ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यातही आयपीएल २०२१ मध्ये तर त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही वाईट राहिली.
तसेच तर वॉशिंग्चनची कसोटीतील सरासरी प्रशंसनीय आहे. परंतु कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या अंतिम सामन्यात त्याला संधी देण्यापुर्वी संघ व्यवस्थापनाने सध्याचा त्याचा फॉर्म लक्षात घ्यायला हवा होता.
शार्दुल ठाकूर- आयपीएल २०२१ मध्ये अष्टपैलू शार्दुल ठाकूरचे प्रदर्शन अतिशय सरासरी राहिले आहे. चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करताना त्याने ७ सामन्यात १ धाव आणि ५ विकेट्सची निराशाजनक कामगिरी केली आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शार्दुलने लक्षवेधी प्रदर्शन केले होते. परंतु सध्या तो आऊट ऑफ फॉर्म असल्याने अतिशय महत्त्वाच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात त्याला संधी देण्याची जोखीम संघ व्यवस्थापनाने घ्यायला नको होती.
उमेश यादव– भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापतीमुळे अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवला माघार घ्यायला घ्यावी लागली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर हा खेळाडू लयीत नसल्याचे दिसून आले. याच कारणामुळे आयपीएल २०२१ मध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अशात यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देणे अधिक सोईचे ठरले असते. परंतु संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वरला न निवडता उमेशला संधी दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड आणि इंग्लंडशी दोन हात करण्यास ‘या’ दिवशी टीम इंडिया होणार रवाना; पाहा कसे असेल सर्व नियोजन
“खूप दु:ख होतं, जेव्हा आयपीएलमध्ये ७ वर्षे कोणीही खरेदीदार मिळत नाही,” पुजाराने व्यक्त केल्या भावना
धोनी तो धोनीचं, ‘ते’ कौतुकास्पद कार्य एकटा ‘कॅप्टनकूल’च करु शकतो; माजी क्रिकेटरने केली स्तुती