भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी आयपीएल २०२१ चा हंगाम स्थगित केला आहे. हा निर्णय घेण्यापुर्वी या हंगामातील एकूण २९ सामने झाले होते. या सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कित्येक क्रिकेटपटूंनी आपल्या प्रदर्शनाची छाप सोडली.
याच प्रदर्शनाच्या जोरावर बऱ्याचशा भारतीय क्रिकेटपटूंची मायदेशात होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषक २०२१ साठी निवड केली जाऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात टी२० विश्वचषक होणार आहे.
भारतीय टी२० संघातील सलामीवीरांविषयी बोलायचे झाले तर, हिटमॅन रोहित शर्माचे सलामीचे स्थान जवळपास ठरल्यात जमा आहे. परंतु त्याचा दुसरा सलामी जोडीदार कोण असेल, हा संघ व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठा प्रश्न असेल. या लेखात आम्ही, रोहितसोबत टी२० विश्वचषकात डावाची सुरुवात करण्यासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या क्रिकेटपटूंचा आढावा घेतला आहे. जगप्रसिद्ध टी२० लीग अर्थातच आयपीएल २०२१ मधील फलंदाजी कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील आकडेवारीच्या जोरावर खालील खेळाडू सलामी जोडीदाराच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
चला तर पाहूयात…
शिखर धवन- भारतीय संघातील दिग्गज सलामीवीरांपैकी एक असलेला शिखर धवन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलच्या या हंगामात खेळताना त्याने आकर्षक खेळी केल्या आहेत. ८ सामन्यात प्रशंसनीय ५४.२८ च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने ३८० धावा चोपल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही १३४ पेक्षा जास्त राहिला आहे. याबरोबरच त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर टी२० क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे तो आगामी टी२० विश्वचषकात रोहितचा सलामी जोडीदार बनण्याचा प्रबळ दावेदार आहे.
केएल राहुल- पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल याची आयपीएल कारकिर्द अतिशय विशेष राहिली आहे. मागील पाच वर्षांपासून राहुलने आयपीएलच्या प्रत्येक हंगामात कमीतकमी ३०० धावांचा आकडा गाठला आहे. आयपीएल २०२१ मध्येही त्याने अवघे ७ सामने खेळताना ३३१ धावा केल्या आहेत. दरम्यान नाबाद ९१ ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमदील त्याची आकडेवारीही चांगली आहे. सध्या तो अपेडिंक्सच्या ऑपरेशनमुळे क्रिकेटपासून दूर आहे. परंतु टी२० विश्वचषकात तो रोहितसोबत सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.
विराट कोहली- भारतीय संघाचा आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघनायक असलेला विराट कोहली एक चांगला सलामीवीरही आहे. आयपीएल २०२१मध्ये देवदत्त पडीक्कलसोबत मिळून डावाची सुरुवात करताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. ७ सामन्यात सलामीला फलंदाजी करताना त्याने १९८ धावा केल्या आहेत. दरम्यान नाबाद ७२ ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. याबरोबरच अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्धच्या टी२० सामन्यात विराट-रोहितमध्ये झालेली सलामीची भागिदारी कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे विराटही टी२० विश्वचषकात रोहितचा सलामी जोडीदार असू शकतो.
पृथ्वी शॉ- युवा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करताना आयपीएल २०२१ मध्ये त्याने अवघ्या ८ सामन्यात त्याने ३०८ धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ८२ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटचा अनुभव नाही. कारण अद्याप त्याचे टी२० पदार्पण झालेले नाही. परंतु त्याचा फॉर्म पाहता त्याला टी२० विश्वचषकाद्वारे पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! मायदेशी परतण्यापुर्वी केकेआरचा ‘हा’ क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह, चेन्नईत केले जाणार उपचार