हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया महिला टी20 विश्वचषक 2024 मधील पहिली पायरी पार करू शकली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने भारताने मोहिमेची सुरुवात केली आहे. दुबईच्या मैदानावर न्यूझीलंडने 58 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने 160/4 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 19 षटकांत 102 धावांवर आटोपला. चला या बातमीद्वारे जाणून घेऊयात हरमनप्रीत ब्रिगेडच्या पराभवाची महत्त्वाची कारणे कोणती होती?
दीप्ती शर्मा महागडी
भारतीय गोलंदाजांनी खूप निराश केले. रेणुका सिंग (चार षटकात 27 धावांत 2 बळी) वगळता कोणीही फारसा प्रभाव टाकू शकला नाही. स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा पूर्णपणे फ्लाॅप ठरली. तिने ना बॉलने जादू दाखवली ना बॅटने. तिला सर्वाधिक धावा पडल्या. दीप्तीने चार षटकांत 45 धावा दिल्या. जे की भारताला महागात पडले. तिला एकही विकेट मिळाली नाही. तर फलंदाजीत तिने 18 चेंडूत केवळ 13 धावा केल्या.
रिचा घोषने झेल सोडला
सुझी बेट्स (27) आणि जॉर्जिया प्लिमर (34) यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भक्कम भागीदारी केली. अरुंधती रेड्डीने पॉवरप्लेमध्ये भारताला जवळपास यश मिळवून दिले पण यष्टिरक्षक रिचा घोषने बेट्सचा सोपा झेल सोडली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बेट्स बाद झाली असती तर भारतीय संघ दडपण निर्माण करण्यात यशस्वी ठरला असता. तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 50 पेक्षा कमी होती.
भारताची टॉप ऑर्डर कोलमडली
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची टॉप ऑर्डर कोलमडली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच चोख गोलंदाजी केली. सलामीवीर शफाली वर्मा (4 चेंडूत 2) दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतली. पाचव्या षटकात स्मृती मानधना (13 चेंडूत 12) पॅव्हेलियनमध्ये परतली. तिसऱ्या क्रमांकावर आलेली कर्णधार हरमनप्रीत (14 चेंडूत 15) देखील स्वस्तात बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्जकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण 11 चेंडूंचा सामना केल्यानंतर तिला केवळ 13 धावा करता आल्या.
तीन किवी खेळाडूंनी भारतीय संघाला सर्वाधिक त्रास दिला. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन, गोलंदाज रोझमेरी मायर आणि ली ताहुहू यांनी भारताला बॅकफूटवर ठकलले. डेव्हाईनने 36 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची खेळी करत न्यूझीलंडला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. तिने ब्रूक हॅलिडे (16) सोबत चौथ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, मायरने चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 19 धावा दिल्या आणि चार विकेट घेतल्या. तर ताहुहूने 15 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा-
INDW vs NZW; सलामी सामन्यातच टीम इंडिया बॅकफूटवर, न्यूझीलंडचा सोपा विजय
भारतासाठी सर्वाधिक टी20 सामने जिंकणारे टाॅप-5 कर्णधार
IND vs BAN; टी20 सामन्यावर धोका! पोलिसांचा कडक बंदोबस्त, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण