जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी गेलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा प्रमुख संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. कोरोना या साथीच्या आजारामुळे ब्रिटनने तयार केलेल्या नियमावलीमूळे भारतीय संघ ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी तेथे राहूनच करेल.ॉ़टड
अशा परिस्थितीत भारताचा आणखी एक संघ शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेला पोहोचला आहे. हा संघ श्रीलंकेत १३ जुलैपासून तीन वनडे व तीन टी२० सामने खेळेल. या २० सदस्यीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यापैकी या दौऱ्यामध्ये आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकणाऱ्या तीन खेळाडूंवर आपण नजर टाकूया.
१) ऋतुराज गायकवाड
मागील वर्षभरात ज्या युवा खेळाडूंची सर्वाधिक चर्चा झाली, त्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याला या दौऱ्यासाठी संघात संधी मिळाली आहे. आयपीएल २०२० पासून प्रसिद्धीझोतात आलेल्या ऋतुराजने आयपीएल २०२१ मध्ये देखील दमदार कामगिरी केली. त्याने आत्तापर्यंत आपल्या आयपीएल कारकिर्दीत १३ सामने खेळताना ३६.४० च्या अप्रतिम सरासरीने ५ अर्धशतकांसह ४०० धावा जमविल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १२४.६० असा राहिला.
अनेक आजी-माजी खेळाडूंनी नावाजलेल्या ऋतुराज याला श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. या संघात पृथ्वी शॉ, कर्णधार शिखर धवन व देवदत्त पडिक्कल हे सलामीसाठी इतर पर्याय आहेत.
२) चेतन सकारिया
आयपीएल २०२१ च्या स्थगित झालेल्या हंगामात ज्या गोलंदाजाने सर्वाधिक कौतुक वसूल केले तो गोलंदाज म्हणजे राजस्थान रॉयल्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया होय. आयपीएल २०२१ मध्ये सात सामने खेळताना चेतनने ८.२२ च्या लाजवाब इकॉनॉमी रेटने ७ बळी आपल्या नावे केले. त्याच्या धारदार यॉर्कर व स्लोअर चेंडूचे प्रत्युत्तर अनेक मोठ्या फलंदाजांकडे नव्हते. त्याच्या याच खासियतेमुळे त्याची भारतीय संघात निवड झाल्याचे बोलले जात आहे. तो आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण टी२० मालिकेतून करू शकतो.
३) वरूण चक्रवर्ती
दोन वेळा भारतीय संघात निवड होऊनही केवळ दुर्दैवामुळे आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यास मुकलेला तमिळनाडूचा वरूण चक्रवर्ती हा श्रीलंका दौऱ्यावर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतो. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना त्याने आपल्या फिरकीच्या तालावर अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले आहे.
‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूणने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २१ सामने खेळताना ७.३४ अशा मामुली इकॉनॉमी रेटने २५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्याची यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी व त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी तो दुखापतग्रस्त झाला तर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी तो यो-यो टेस्ट पास करू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
–जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
–“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया